संगमनेरात ‘मॉर्निंग वॉक’ही बनले असुरक्षित! भल्या पहाटे चोरट्यांची भिती; गुंजाळवाडीत वृद्धाला लुटले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलिसांच्या हद्दित नियमित घडणार्या गंठण चोरीच्या घटनांची व्याप्ती आणखी वाढली असून शून्य तपासाच्या कारणांनी मनोबल उंचावलेल्या चोरट्यांनी आता भल्या पहाटे ‘मॉर्निंग वॉक’ करणार्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अशीच धक्कादायक घटना शनिवारी पहाटे शहर हद्दितील गुंजाळवाडी शिवारात घडली असून एका 65 वर्षीय निवृत्त कर्मचार्याला रस्त्यात आडवून तीन ते चार चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवित त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने घेवून पोबारा केला. या घटनेने एकीकडे शहर पोलिसांचे वाभाडे निघाले असताना दुसरीकडे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणार्या शेकडों नागरिकांच्या मनात चोरट्यांची भिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी तुळशीराम खेमनर या निवृत्त शिक्षकाच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना शनिवारी (ता.22) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास गुंजाळवाडी शिवारात घडली. याच परिसरात राहणारे निवृत्त शिक्षक तुळशीराम नाना खेमनर (वय 65) नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती, मात्र रोजची सवय आणि ओळखीचा रस्ता यामुळे कोणत्याही भितीशिवाय ते मॉर्निंग वॉक करीत असताना अचानक पाठीमागून दोन मोटर सायकलवरुन आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी दमदाटी व आपल्याकडील शस्त्रांचा धाक दाखवत त्यांना रोखले.

यावेळी घाबरलेल्या त्या निवृत्त शिक्षकाने मदतीसाठी आरडाओरड करण्याचाही प्रयत्न केला. मात्र आसपास मानवी वस्त्यांचा अभाव आणि त्यातच त्यांच्यापेक्षा तिप्पट संख्येने असलेले चोरटे यामुळे ते घाबरले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दोन्ही हातातील वेगवेगळ्या पाच चांदीच्या अंगठ्या आणि गळ्यात घातलेले सोन्याचे ओम कोरलेले पदक असा एकूण 10 हजार रुपयांचा मुद्देमाल ओरबाडला. यावेळी त्या चोरट्यांनी खेमनर यांच्या खिशात पैसे आहेत का याचीही चाचपणी केली, मात्र सकाळी फिरायला जात असल्याने त्यांच्याजवळ कोणतीही रोकड नव्हती. त्यामुळे मिळालेला ऐवज घेवून चोरट्यांनी तेथून पोबारा केला.

या प्रकरणी रविवारी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीच्या कलम 392, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. गेल्याकाही महिन्यांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या शहर व लगतच्या उपनगरांमधील निर्मनुष्य रस्त्यांवरुन चाललेल्या महिलांना लक्ष्य करुन चोरटे त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवू लागल्याने संगमनेरकर महिलांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. आता याच चोरट्यांनी भल्या पहाटे संगमनेरच्या विविध भागात फिरण्यासाठी निघणार्या नागरिकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

संगमनेर शहरालगतच्या नाशिक रोड, मेडिकव्हर हॉस्पिटल ते व्हाया गंगासृष्टी, राजापूर रोड, अकोले रोड, गंगामाई परिसर, मालदाड रोड, संगमनेर महाविद्यालय, अकोले बायपास रस्ता, पावबाकी रोड, रहाणे मळा अशा सर्वच रस्त्यांवर दररोज ‘मॉर्निंग वॉक’ करणार्यांची मोठी वर्दळ असते. एरव्ही दिवसाढवळ्या महिलांना लक्ष्य करुन त्यांना लुटणार्या चोरट्यांनी आता पहाटेच्यावेळी फिरायला जाणार्यांवरही पाळत ठेवण्यास आणि संधी मिळताच लुटण्यास सुरुवात केल्याने महिलांच्या सुरक्षेसोबतच आता पहाटे ‘मॉर्निंग वॉक’च्या निमित्ताने बाहेर पडणार्यांच्या मनातही चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

गेल्या मोठ्या कालावधीपासून संगमनेर शहर पोलिसांच्या हद्दित एकामागून एक गंठण चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र यातील एकाही घटनेचा तपास लावण्यात शहर पोलीस अपयशी ठरल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावलेले आहे. त्यातूनच आता चोरट्यांकडून ‘मॉर्निंग वॉक’च्या रस्त्यांवरही घिरट्या सुरु झाल्या असून सावज दृष्टीस पडताच त्याला लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे संगमनेरातील केवळ महिलाच नव्हेतर सर्वसामान्य माणसांची सुरक्षाच आता धोक्यात आली आहे.

