भावासह पुतण्याच्या मारहाणीत एकाचा मृत्यू माहेगाव येथील घटना; दोघांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील माहेगाव येथे शेतातून पाईपलाईन नेण्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांत मंगळवारी (ता.6) दुपारी साडेतीन वाजता भांडण झाले. त्यात मोठ्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहाणीत लहान भाऊ गंभीर जखमी झाला. त्याचा नगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी मधला भाऊ दत्तात्रय आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मोठ्या भावास अटक केली आहे.

याबाबत दत्तात्रय पुंजाहरी आढाव (वय 55, रा.माहेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या शेतातील कूपनलिकेचे पाणी ज्ञानेश्वर आढाव यांच्या शेतात घेऊन जाण्यासाठी मी व ज्ञानेश्वर विष्णू पुंजाहरी आढाव (वय 57) याच्या शेतातून जलवाहिनी टाकत होतो. यावेळी आमच्या शेतातून जलवाहिनी नेऊ नका, असे सांगून विष्णू आढाव व त्याचा मुलगा प्रतीक यांनी ज्ञानेश्वर यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

प्रतीक याने ज्ञानेश्वर यांच्या छातीवर खोरे मारून त्यांना खाली पाडले. तसेच दोघांनी जबर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी विष्णू आढाव यास अटक केली असून, प्रतीक आढाव हा फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करत आहे.
