संगमनेरचे सामाजिक ‘स्वास्थ’ बिघडवण्याचे पुन्हा षडयंत्र? ‘वादग्रस्त’ पोस्ट व्हायरल; तेढ निर्माण करणार्यावर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगभरातील असंख्य मोबाईल वापरकर्त्यांकडून वेगवेगळ्या सोशल साईट्सचा विधायक वापर होत असल्याची उदाहरणे नेहमीच समोर येत असतात. त्याप्रमाणे काही विकृतांकडून या प्रभावी माध्यमांचा गैरवापर होवून समाजातील जातीय सलोखा नष्ट करण्याचेही वारंवार प्रयत्न होत असतात. संगमनेरातून पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार समोर आला असून शहरातील एकाने ‘इन्स्टाग्राम’ या सोशल नेटवर्क साईट्चा वापर करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त सोशल पोस्ट केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शहरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी मन्सूर शेख नावाच्या आयडीवरुन आयडीजो आयान शेख या नावाने सदरचा मजकूर प्रसारित करणार्या अज्ञाताविरोधात एका वर्गाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारातून कोणीतरी अज्ञात व्यक्ति शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचे षडयंत्र राबवित असल्याचा वास येत असून पोलिसांनी गांभीर्य ओळखून या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याची गरज आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सोमवारी (ता.24) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समोर आला. गुंजाळवाडी शिवारातील ओंकार भालेराव हा तरुण आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरील वेगवेगळ्या पोस्ट पहात असताना ‘मन्सूर शेख 1587’ या आयडीवरुन ‘आयडीजो आयान शेख’ याच्या नावाने प्रसारित झालेल्या एका वादग्रस्त पोस्टवर त्याची नजर खिळली. या पोस्टमध्ये अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना क्रूरकर्मा टीपू सुलतान याच्याशी करण्यात आली होती. याच पोस्टमध्ये संबंधिताने ‘बाप’ आणि ‘बेटा’ असा उल्लेख करुन कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावनांनाही हात घातल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

याबाबत भालेराव याने शहरातील काही हिंदुत्त्ववादी संघटनांच्या पदाधिकार्यांना माहिती दिल्यानंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. काही
कार्यकर्त्यांनी थेट शहर पोलीस ठाण्यात जावून प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना याबाबतची माहिती देत कठोर कारवाईची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी तत्काळ संबंधितावर दोन समुदायात द्वेष निर्माण करुन एका गटाच्या भावना दुखावल्याप्रकरणी अज्ञात इसमावर गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. सायंकाळी सातच्या सुमारास समोर आलेल्या या प्रकारानंतर जवळपास दोनतास शहर पोलीस ठाण्यात हिंदुत्त्ववाद्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काहीकाळ तणावासारखी स्थितीही निर्माण झाली होती.

टीपू सुलतनाने त्याच्या राजवटीत लाखों हिंदूंची कत्तल करण्यासह तलवारीच्या धाकावर लाखों लोकांचे धर्मांतरणही घडवून आणले होते. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल शंभर वर्षांनी म्हैसूरच्या गदीवर बसलेला हा सुलतान अतिशय धर्मांध वृत्तीचा क्रूरकर्मा होता. त्याच्या नावावर मानवताही लाजेल इतकी दूष्कृत्य नोंदवली गेली आहेत. या देशातील भूमीपुत्रांचा छळ करणारा, त्यांची हत्या करणारा हा शासक मात्र आजही देशातील काहींच्या मनातला ‘हिरो’ आहे. याच शासकाला मराठ्यांच्या फौजांनी थेट म्हैसूरात घुसून पाणी पाजले होते. मात्र दुर्दैवाने या देशात राहुनही काही अर्धवट बुद्धीची मंडळी आजही या क्रूरकर्म्याचे महिमामंडन करुन समाजातील सौहार्द नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वरकरणी सदरची पोस्ट इतिहासाचे कोणतेही ज्ञान नसलेल्या एका अर्धवटरावाने केल्याचे दिसत असले तरीही त्यामागे एखादे पद्धतशीर षडयंत्र असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. गेल्या वर्षभरात संगमनेर शहर व परिसरात अशाच किरकोळ गोष्टीतून दोन समाजातील दरी रुंद
करण्याचे वारंवार प्रयत्न झाले आहेत. मात्र प्रत्येकवेळी संगमनेरकरांनी ते धुडकावले आहेत. यावेळीही या प्रकारातून फारसं काही घडलं नसलं तरीही वेळीच अशा सापांची तोंडं चिरडणं मात्र क्रमप्राप्त आहे. पोलिसांनीही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून सदरची पोस्ट खरोखरी ‘अर्धवट’रावाकडून करण्यात आली की, त्याचा वापर करुन भलताच कोणीतरी आपले इप्सित साधतोय याचा तपास लावण्याची गरज आहे.

परकिय आक्रमकांमध्ये औरंगजेब हा मुघल बादशहा सर्वात शक्तिशाली मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हयात असेपर्यंत मात्र त्याची दक्षिणेत उतरण्याची कधीही हिंमत झाली नाही. सन 1680 साली राजांच्या निधनानंतर तो महाराष्ट्रावर चालून आला. तेथून पुढे सलग 27 वर्ष लाखोंची फौज घेवून सह्याद्रीला धडका मारुनही त्याला मुठभर यश मिळवता आले नाही. अवघ्या हिंदूस्तानचा बादशहा म्हणवणार्या औरंगजेबाला लाखोंची फौज आणि कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुनही शेवटी मराठी मातीतच त्याला जीव सोडावा लागला आणि त्याच्या देहाचीही येथेच माती झाली, हा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा. मात्र काही अर्धवटरावांना इतिहासच माहिती नसल्याने त्यांच्याकडून केल्या जाणार्या अशा पोस्टमागे कोणतातरी विघातक हेतू असण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनीही त्याच दृष्टीने तपास करुन सामाजिक सौहार्दाला बाधा पोहोचवणारे मूळच उपटण्याची गरज आहे.

