दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली! संगमनेर पोलिसांची कामगिरी; चौघे ताब्यात, दोघे पसार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
हाणामार्‍या, चोर्‍या, सोनसाखळी लांबवण्याचे प्रकार अशा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या संगमनेर शहरातून दिलासादायक वृत्त हाती आले आहे. या घटनेत सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या राहाता तालुक्यातील चौघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून दोघे पसार झाले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांमध्ये तब्बल तिघे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणार्‍या हत्यारांसह अलिशान कार व दोन मोबाईल संच असा 3 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील अटक झालेल्या एकमेव आरोपीला आज न्यायालयात हजर करुन कोठडी मागितली जाणार असून तिघा अल्पवयींनाना बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.12) पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे नाक्यावरील हिंदू स्मशानभूमीजवळ करण्यात आली. यावेळी रात्रीची गस्त घालणार्‍या शहर पोलिसांच्या वाहनाला या परिसरातील एका चिंचेच्या झाडाजवळ संशयास्पद हालचाल दिसल्याने त्यांची नजर त्या भागात खिळली. काहीवेळ निरीक्षण केल्यानंतर झाडाखाली उभ्या करण्यात आलेल्या आलेल्या एका अलिशान कारसह त्या लगत काहीजण दबा धरुन बसल्याचेही पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. मात्र पोलीस येत असल्याचे पाहून त्यातील दोघे तेथून पसार झाले, तर उर्वरीत चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.


यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या टाटा मांझा (क्र.एम.एच.02/बी.झेड.5223) यामध्ये लोखंडी गज, कोयता, चाकू, करवत, लाकडी दांडके, पक्कड व दोन मोबाईल असा एकूण 3 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी आज सकाळी पोलीस काँन्स्टेबल हरिश्‍चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी दरोड्याची तयारी आणि त्यासाठी लपून बसण्याच्या कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सार्थक उर्फ बबलु अनिल निकाळे (वय 18, रा.आंबेडकर नगर, राहाता) याला ताब्यात घेत अटक केली. तर 16 वर्ष सात महिने वयाचा दहेगाव, ता.राहाता, 17 वर्ष पाच महिने वयाचा आंबेडकर नगर, राहाता व 17 वर्ष सहा महिने वयाच्या पिंपळगाव जलाल, ता.येवला येथील तिघा अल्पवयीन दरोडेखोरांना आज अहमदनगरच्या बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यातील रितेश सदाफळ व बुट्ट्या सदाफळ हे दोघे पसार झाले आहेत.


मागील काही महिन्यांपासून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दररोज घडणार्‍या चोर्‍या आणि सोनसाखळ्या लांबविण्याच्या प्रकारांनी संगमनेरकर त्रासलेले असताना प्रदीर्घ कालावधीनंतर शहर पोलिसांकडून पहिली कारवाई झाल्याने नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास ज्या अधिकार्‍याकडे देण्यात आला आहे ते कायम वादग्रस्त आणि संशयास्पद राहिल्याने पकडलेल्या दरोडेखोरांकडून मिळणार्‍या माहितीच्या आधारे कोणत्याही घटनांची उकल होण्याची शक्यता धुसरच आहे.

Visits: 6 Today: 1 Total: 23164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *