जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी आजही कायम! संगमनेर तालुक्याने मात्र मोडला एप्रिलचा उच्चांक; आजही समोर आली मोठी रुग्णसंख्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यात उसळलेली कोविड संक्रमणाची लाट काहीशी ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र गेल्या काही दिवसांतील दैनंदिन आकडेवारीतून समोर आले आहे. त्यातून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठीची धडपड काही प्रमाणात थांबली आहे. खालावलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्याने मात्र मागील महिन्यातील सर्वाधीक रुग्णसंख्येचा उच्चांक अवघ्या 20 दिवसांतच मोडीत काढला आहे. जिल्ह्यात आजही निचांकी 2 हजार 637 तर संगमनेर तालुक्यात उच्चांकी 272 रुग्ण समोर आले आहेत. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील 28 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 20 हजार 496 झाली आहे, तर शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत शहरातील 23 जणांसह तालुक्यातील एकूण 99 जणांचा कोविडने बळी गेला आहे.
गेल्या जवळपास अडिच महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमधून दररोज उच्चांकी रुग्ण समोर येत गेल्याने मार्च आणि एप्रिल जिल्ह्यातील कोविड संक्रमणाच्या इतिहासातील सर्वाधीक रुग्णसंख्येचे महिने ठरले. मार्चमध्ये संपूर्ण जिल्ह्यात दररोज सरासरी 604 रुग्ण या गतीने 18 हजार 730 रुग्णांची वाढ झाली. तर एप्रिलमध्ये त्यात चौपटपेक्षा अधिक वाढ होवून दररोज 2 हजार 671 सरासरी रुग्णगतीने तब्बल 80 हजार 134 रुग्णांची वाढ झाली. एकाच महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात मिळून इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासारख्या कोविड रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधांचाही तुटवडा झाल्याने अनेकांनी त्याच्या अभावातच जीव सोडला.
मे महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्याच्या संक्रमणाला ओहोटी लागेल असा वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचा कयास होता. गेल्या 20 दिवसांतील एकत्रित आकडेमोड पाहता एकप्रकारे तो साफ चुकल्यासारखे दिसून येते. 1 ते 20 मे या कालावधीत जिल्ह्यात दररोज सरासरी 3 हजार 364 रुग्णगतीने 67 हजार 277 रुग्णांची भर पडली आहे. मात्र जाणकारांच्या निरीक्षणाचा बारकाईने अभ्यास करता पहिल्या दहा दिवसांत जिल्ह्यात सरासरी 3 हजार 833 च्या गतीने 38 हजार 334 रुग्णांची, तर नंतरच्या दहा दिवसांत सरासरी 2 हजार 894 या गतीने 28 हजार 943 रुग्णांची वाढ झाली आहे. पहिल्या दहा दिवसांपेक्षा दुसर्या दहा दिवसांतील संक्रमणात मोठी घट होवून या कालावधीत जिल्ह्यातील रुग्णांच्या एकूण संख्येत 9 हजार 391 रुग्ण कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जाणकारांच्या म्हणण्यानुसार मेच्या मध्यापासून जिल्ह्याच्या रुग्णगतीचा वेग मंदावल्याचे दिसून येते.
संगमनेर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात कोविड स्थिती पूर्णतः नियंत्रणात होती. 28 दिवसांच्या फेब्रुवारीत संगमनेर तालुक्यात सरासरी अवघे 17.68 रुग्ण या गतीने 495 रुग्णांची वाढ झाली. मात्र याच महिन्याच्या मध्यापासून तालुक्याच्या सर्वदूर साजरे झालेले विवाह सोहळे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आणि मुक्तपणा याचा परिणाम तालुक्यावर संक्रमणाची दुसरी लाट कोसळण्यात झाला. या महिन्यात तालुक्यातील संक्रमणाची गती चौपट गतीने वाढून सरासरी 62 रुग्ण या वेगाने तालुक्याच्या कोविड इतिहासातील सर्वाधीक 1 हजार 919 रुग्ण समोर आले. तर एप्रिलमध्ये तालुक्यावर रुग्णसंख्येचा डोंगरच उभा राहीला. मागील महिन्यात तालुक्याच्या संक्रमणाचा वेग अनपेक्षितपणे 62 वरुन थेट 215 रुग्ण दररोज या गतीवर जावून तालुक्यात एकाच महिन्यात गेल्या वर्षभराहून अधिक म्हणजे 6 हजार 445 रुग्ण समोर आले.
मे महिन्यातही सुरुवातीच्या दहा दिवसांत सरासरीत आणखी मोठी भर पडली आणि तालुक्यात सरासरी 354 रुग्ण दररोज या वेगाने 3 हजार 538 रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्यात भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. नंतरच्या दहा दिवसांत मात्र कधी अधिक तर, कधी कमी या प्रमाणे रुग्णसंख्येचा चढउतार दिसू लागल्याने काहीसे दिलासादायक चित्र निर्माण होवून मागील दहा दिवसांत सरासरी 300 रुग्ण दररोज या वेगाने तालुक्यात एकूण 2 हजार 999 रुग्णांची वाढ झाली आहे. मागील 20 दिवसांचा विचार करता तालुक्यात सरासरी 327 रुग्ण या गतीने 6 हजार 537 रुग्णांची भर पडली असून तालुक्याने एप्रिलमधील रुग्णसंख्येचा उच्चांक मोडीत काढला आहे. मात्र मागील दहा दिवसांत तालुक्याच्या सरासरी रुग्णगतीत घट नोंदविली जात असल्याने कोविड संक्रमणाची दुसरी लाट आटोेक्यात येत असल्याचे अस्पष्ट मात्र दिलासादायक चित्र दिसू लागले आहे.
आज खासगी प्रयोशाळेचे 99 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 173 अशा एकूण 272 अहवालांमधून संगमनेर तालुक्यातील बाधित समोर आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील अवघ्या 28 जणांचा समावेश आहे. त्यात मालदाड रोडवरील रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे समोर आले असून तेथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 व 46 वर्षीय इसम, 53, 46, 42, 37 व 29 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलाचा समावेश आहे. त्या शिवाय साळीवाडड्यातील 45 वर्षीय इसम व 37 वर्षीय महिला, कुरण रोडवरील 82 व 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 75 व 57 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय तरुण, लखमीपूरा भागातील 74 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 10 वर्षीय मुलगी, शिवाजी नगरमधील 28 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 65 व 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 52 व 43 वर्षीय इसम, 34 व 28 वर्षीय तरुण, 38, 36 व 33 वर्षीय महिला आणि 21 वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
मागील 12 मे पासून जिल्ह्याच्या सरासरीत मोठी घट होत असल्याचे समोर आले आहे. एकवेळ जिल्ह्यात दररोज चार हजारांहून अधिक रुग्ण समोर येत होते. मात्र मागील आठ दिवसांत सरसरीत दररोज घट होवून मागील पाच दिवसात अपवाद वगळता रुग्णसंख्या तीन हजारांच्या आंतच राहीली आहे. आजही जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत 2 हजार 637 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 42 हजार 317 झाली आहे. आजच्या रुग्णसंख्येत श्रीगोंद्यात सर्वाधीक 293 रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल संगमनेर 272, पारनेर 231, शेवगाव 216, श्रीरामपूर 185, नगर ग्रामीण 184, पाथर्डी 176, महापालिका क्षेत्र 163, नेवासा 151, राहाता 135, जामखेड 130, राहुरी 122, कर्जत 118, कोपरगाव 112, अकोले 84, इतर जिल्ह्यातील 43, भिंगार लष्करी परिसरातील 21 व इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.