संगमनेर शहरालगतच्या परिसरातील आणखी एक कळी ओरबाडली! अज्ञानाचा फायदा घेत शारीरिक संबंध; तरुणावर अत्याचारासह ‘पोक्सो’चा गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोबाईल, दूरचित्रवाहिनीवरील विविध धारावाहिक यांच्या माध्यमातून बालमनावर किती खोलवर परिणाम होतो याचे आणखी एक उदाहरण संगमनेर शहरातून समोर आले आहे. या घटनेत शहरालगतच्या परिसरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून आरोपी तरुणाने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणाची कुजबूज कानावर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या उपरांतही आरोपीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज मध्यरात्रीच्या सुमारास पीडित आईच्या फिर्यादीवरुन सह्याद्री कॉलेजजवळ राहणार्‍या विशाल संपत बोर्‍हाडे या नराधमावर अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पोक्सो) तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 38 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सदरील महिला शहरालगत असलेल्या एका वसाहतीत आपल्या तीन मुलींसमवेत राहते. दीड वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. मात्र अशाही स्थितीत न डगमगता मोलमजुरी करुन त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असताना त्यांच्या वसाहतीत नव्याने खोली घेणार्‍या विशाल संपत बोर्‍हाडे या नराधम तरुणाची नजर त्यांच्या 17 वर्षीय मोठ्या मुलीवर पडली. आई मजुरीसाठी घरातून गेल्यानंतर हा नराधम वसाहतीत येवून ‘त्या’ मुलीला फूस लावित असतं. त्यातूनच दोन वर्षांपूर्वी त्याने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत काहीतरी आमिष दाखवले व तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.


सदरील मुलगी शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12 वीचे शिक्षण घेते. ही संधी साधून त्या नराधमाने महाविद्यालयात जाणार्‍या या मुलीला वेळोवेळी फूस लावून त्याच्या सह्याद्री महाविद्यालया जवळील राहत्या घरी नेवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. ही गोष्ट समजल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पती हयात नसतांना मुलींच्या जीवनात अंधार पडू नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेत नराधम विशाल बोर्‍हाडे याला समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो फार दिवस टिकला नाही.


या दरम्यान गेल्या 4 जूनरोजी आरोपी विशाल बोर्‍हाडे याच्यासह ती अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाले. त्यामुळे घाबरलेल्या त्या माऊलीने सर्वत्र त्यांचा शोधला, मात्र कोणताही थांगपत्ता लागला नाही. पतीचे निधन झालेले, घरात कोणीही पुरुष नाही, तिच्यानंतर दोन लहान मुली, त्यांचे आयुष्य या सगळ्या विचाराने ग्रासलेल्या पीडितेच्या आईने इज्जतीचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून आपल्याच पातळीवर शोध सुरु ठेवला. या दरम्यान तब्बल सहा दिवसांनी सोमवारी (ता.10) त्यांच्या मुलीचा शोध लागला.


यावेळी तिच्याकडे चौकशीत ती आरोपी विशाल बोर्‍हाडेसोबतच असल्याचे समोर आल्यानंतर अखेर तिच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विशाल संपत बोर्‍हाडे (रा.सह्याद्री महाविद्यालयजवळ) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 376 (2) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 4, 6 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून तक्रार दाखल होताच आरोपी पसार झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्‍वास भान्सी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


कोविड संक्रमणाच्या कालखंडात शिक्षण व्यवस्था ठप्प झाल्याने त्यावर पर्याय म्हणून अगदी पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांची ‘ऑनलाईन’ शाळा सुरु झाली. त्यावेळी संक्रमणाच्या कालावधीबाबत अनिश्‍चितता असल्याने अनेक पालकांनी उसनवारी करुन आपल्या पाल्यांना मोबाईल संचही खरेदी करुन दिले. नको त्या वयात हातात मोबाईलसह इंटरनेट आल्याने प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्या मोबाईलचा गैरवापर सुरु केला. त्यातून अल्पवयीन मुलींना फसवण्याच्या आणि त्यातून त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या असंख्य घटना गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत. या घटनेतही दोन वर्षांपूर्वी अवघ्या 15 वर्षांच्या असलेल्या मुलीला विशाल संपत बोर्‍हाडे नावाच्या नराधमाने फसवले आणि तिच्या अज्ञानाचा फायदा घेत वेळोवेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *