माजी सैनिकाची फसवणूक करणार्याला मुंबईतून अटक 18 लाख 39 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक; सायबर पोलिसांची कामगिरी
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील लोणी येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्याला नगर येथील सायबर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 52 रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला नगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोणी येथील फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. ते ‘वर्क फॉर्म होम’ करता येईल अशा नोकरी, उद्योगाच्या शोधात होते. ऑनलाईन साईटवर माहिती घेत असताना त्यांची फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली. तिने फिर्यादींना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीचे उत्पादने खरेदी केल्यास व विकल्यास तुम्हाला भरपूर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले.
पैसे जमा करण्यासाठी व्हाट्सअॅपवरुन एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे फिर्यादींनी संबंधित कंपनीच्या साईटवरून वस्तू खरेदी करून बँक खात्यावर वेळोवेळी 13 लाख 10 हजार रुपये पाठविले. मात्र फिर्यादी यांना वस्तू मिळाल्या नाही. 10 ते 20 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. परंतु, 10 ते 20 लाखांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रक्कम काढता येईल, असे फिर्यादीला सांगितले गेले. त्यांनी नंतर सात लाख रुपये भरताच कंपनीने बँक खाते बंद केले. ही घटना 8 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये फिर्यादीची एकूण 18 लाख 39 हजार 702 रुपयांची फसणूक झाली आहे.
दरम्यान फिर्यादींनी 10 जानेवारी, 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द भादंवि कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरुण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपी खान याला मुंबई येथून अटक केली आहे.
सहा राज्यांत गेली रक्कम..
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण करत असताना फसवणुकीची रक्कम सहा राज्यांतील विविध बँक खात्यात वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मुंबई येथील भारत मेटेज कार्पोरेशन कांदिवली या खात्यावर एक लाख रुपये रक्कम वर्ग झाली होती. या बँक खातेदाराचा सायबर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेत गजाआड केले.