कोरोनात ज्यांच्यावर जबाबदारी तेच मार्ग काढण्याऐवजी भांडताहेत! माजी मंत्री मधुकर पिचडांनी अकोल्यातील कोरोना स्थितीवर मांडले परखड भाष्य
नायक वृत्तसेवा, राजूर
सद्यपरिस्थितीत अकोले तालुक्याची कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह असून या काळात लोकांना आधाराची गरज आहे. उगाचच संगमनेर-अकोले असा वाद न करता सर्वांनी एकजुटीने एकत्र राहून या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच यातून मार्ग काढण्याऐवजी भांडत आहे हे अत्यंत चुकीचे आहे, असे मत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले आहे.
राजूर येथे निवासस्थानी ते पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले, कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेला अकोलेकरांनी मोठ्या धिराने तोंड दिले. सर्व नियमांचे कोटेकोर पालन केले. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा गंभीर आहे. गुणाकाराने वाढणारा संसर्ग आपल्या सर्वांना मोठ्या धैर्याने-आत्मविश्वासाने थोपवायचा आहे. अत्यंत महत्वाचे काम असले तरच घराबाहेर पडा. कोरोनाला नकारात्मक दृष्टीने न बघता व गांभीर्याने घेवून छोटी-छोटी वाटणारी लक्षणे तातडीने डॉक्टरांना दाखवा व त्यांचा सल्ला घ्या. वयोवृध्द व ज्यांना जुने आजार आहेत अशांनी कोरोना जास्त गांभीर्याने घ्यावा व घरातल्या मंडळींनी त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे. या महामारीच्या काळात जास्तीत जास्त सकारात्मक विचार करा, सोशल मीडियावर पोस्ट करताना खूप विचारांती पोस्ट करावी; जेणेकरुन त्यातून भीती निर्माण होणार नाही. रुग्णांना समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा मिळेल असेच आपले वागणे असावे.
अकोले तालुका हा अत्यंत संवेदनशील असून संकटकाळी सर्वजण एकत्र येवून लढाई करतात ही तालुक्याची परंपरा आहे. आजही आणीबाणीची वेळ असून या संकटात तालुक्यातील प्रत्येक माणसाने या महामारीत प्रत्येकाला मदत करा, कोरोनाकडे अस्पृश्य भावनेने न पाहता सर्वांनी नियमांचे पालन करुन थोपवावे. कोरोनाची अकोल्यातील स्थिती भयावह असून रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिविरसाठी रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. आपल्या जवळच्या अनेक माणसांना कोरोनाने गाठले अन् आपल्यातून नेलेही. हे सर्व मला मनाला वेदना देणारे आहे. तालुक्यातील प्रत्येक माणूस हा माझा आहे, त्यांची दुख:-सुख हे माझं आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या अकोल्यात आदिवासी भागात एखादा आजारी पडला तर त्याला डोली करुन न्यावं लागायचं. रस्ते, पूल, दळणवळणाची साधने नव्हती. आज या सर्व सुविधा असून चार मोठी ग्रामीण रुग्णालये, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र, 80 आरोग्य उपकेंद्र निर्माण केली. हे निर्माण करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती पण अकोल्याची जनता जनार्दन माझ्या बरोबर होती. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने तालुक्यावर येणार्या प्रत्येक संकटाला परतवून लावू शकलो. आयुष्यभर संघर्ष आपल्या वाट्याला आला, परिणामांची चिंता न करता लोकांसाठी काम करीत राहिलो. आजही वयाच्या 80 व्या वर्षी लोकांसाठी काम करण्याची उर्मी ही लोकांमुळेच आपल्याला मिळते. परक्यांबरोबरच स्वकीयांनीही आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीही डगमगलो नाही, घाबरलो नाही. कारण तुम्ही माझ्या सोबत होता, लोक हीच आपली ऊर्जा आहे. घाबरु नका, येणार्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. सकारात्मक विचार करा, खंबीर रहा. विशेष करुन तरुणांनी संयम ठेवा. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा.
प्रशासनाने या काळात तटस्थपणे काम करणे अपेक्षित आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून रहावे. हलगर्जीपणा करु नये. जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यावा. त्याचे प्रभावी असे नियोजन करा. यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा अपेक्षित आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन रुग्णांना वेगळे ठेवून ही साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावे. लोकांनीही प्रशासनाला मदत, सहकार्य करणे आवश्यक असून गर्दी करु नये. आपल्या पातळीवर जवढे शक्य आहे, तेवढे प्रयत्न आपण करीत असून अगस्ति आश्रम येथे अगस्ति साखर कारखान्याच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरु केले आहे. राजूर येथेही वैभव पिचड यांनी कोविड सेंटर सुरु केले आहे. व्यक्तीगत पातळीवरही पिचड कुंटुंबीय रुग्णांना आवश्यक तेवढी मदत करीत असून आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहू, असा ठाम विश्वास दिला.
दुर्देवाने ज्यांच्यावर ही जबाबदारी जनतेने टाकली आहे, तेच ऐकमेकांबरोबर भांडत बसले आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ज्यांच्यावर यांचा दबाव असायला हवा ते प्रशासन यांना जुमानत नाही असे चित्र एकीकडे असून दुसरीकडे जनता कोरोना महामारीत होरपळत आहे. कोरोनाचे राजकारण करु नका जनतेला मदतीचा हात द्या.
– मधुकर पिचड (माजी मंत्री, राजूर)