समनापूरमध्ये दारु दुकानाला विरोध करण्यासाठी तरुण आक्रमक आंदोलनकर्ते आणि ग्रामविकास अधिकार्‍यांत शाब्दिक खडाजंगी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील समनापूर येथे देशी दारु दुकानाला ग्रामपंचायत प्रशासनाने परवानगी दिली असल्याने गावातील तरुण चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या तरुणांनी ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामविकास अधिकारी नागरे यांना जाब विचारला असता ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनीच त्या विषयाला संमती दिली असल्यानेच परवानगी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांनी सांगितले. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी व आंदोलनकर्ते तरुण यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली.

समनापूर येथे गावाच्या पूर्वेला कोल्हार-घोटी राज्य मार्गावर देशी दारुचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली असल्याचे देवा शेरमाळे यांना समजले. त्यांनी गावातील तरुणांना व महिलांना एकत्रित करत ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांना धारेवर धरले. गावात तुम्ही देशी दारुच्या दुकानाला कुणाच्या सांगण्यावरून परवानगी दिली याचे आम्हाला उत्तर द्या, अशी आक्रमक भूमिका देवा शेरमाळे, बापू दळवी, मोहसीन शेख, रियाज शेख, शिवाजी शेरमाळे, इरफान पठाण, अशोक चांडे, साजिद शेख, भागवत शेरमाळे, विठ्ठल शेरमाळे यांच्यासह अनेक तरुणांनी व महिलांनी घेतली.

त्यावर ग्रामसभेत सरपंच व इतर सदस्यांसमोर हा विषय घेण्यात आला. त्यास ग्रामसभेत सर्वांनीच परवानगी दिली असल्याचे ग्रामविकास अधिकारी नागरे यांनी सांगितले. आम्हाला दारु नको पाणी हवे या घोषणेने परिसर दणाणून सोडला. यावेळी देवा शेरमाळे यांनी ग्रामपंचायतने आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर ठराव केलेले आहे हे ठरव रद्द करण्यात यावे आणि गावात कुठल्याही प्रकारचे दारुचे दुकान आम्ही सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आणि जर गावामध्ये देशी दारुचे दुकान सुरू झाले तर आम्ही बायका मुलाबाळांसह ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला.

गावांत अनेक ग्रामपंचायत सदस्यांचे देशी दारुचे दुकाने आहेत, त्यास तुम्ही विरोध का करत नाही असे पत्रकारांनी सरपंच कमल बर्डे यांना विचारले असता सदस्य मला कधीच विश्वासात घेत नाही. मी चांगले काम करायला लागले लागले की अडथळे आणतात. माझ्या अडाणीपणाचा ते फायदा उचलत आहे. मी दोन वर्षात कुणाकडूनही पैसे घेतले असेल तर ते त्यांनी दाखवून द्यावे. अनेक निर्णय करताना ते परस्पर करतात, फक्त माझ्या सह्या घेतात असा आरोप सरपंच कमल बर्डे यांनी ग्रामपंचायत सदस्यांवर केला आहे.

Visits: 126 Today: 1 Total: 1582474

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *