संगमनेरात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रीय! 24 तासांत चार घटना; पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बहुतेक प्रकरणात साप सोडून भुई धोपटणार्या संगमनेर शहर पोलिसांकडून आपली लक्तरं दडवण्याचा केविलवाणा प्रकार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाकच संपुष्टात आल्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत असून दीर्घकाळ अंधारात असलेले सोनसाखळी चोरही आता उजळ माथ्याने महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडू लागले आहेत. गेल्या 24 तासांत अशाप्रकारच्या चार घटना समोर आल्या असून त्यातून महिलांच्या निर्धोक वावरण्यावरच मर्यादा आल्या आहेत. अशा घटनांची गांभीर्याने दखल घेवून त्याच्या मुळाशी जाण्याचे सोडून पोलिसांनी मात्र आपलीच लक्तरे दडवण्यासाठी चक्क गुन्हेच दडपण्याचे सूत्र अवलंबण्यास सुरुवात केली असून नाशिक रोडवरील घटनेची नोंद करण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र त्यामुळे चोरट्यांचे मनोबल अस्मानाला भिडले असून बुधवारी सायंकाळी निवृत्त शिक्षिकेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी लांबविण्यात आली आहे. तर आज दुपारी घुलेवाडीतही अशीच घटना घडली. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांनी शहरासह उपनगरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गजबजलेल्या गणेश वसाहतीत घडल्याचे समोर आले आहे. वीज मंडळाच्या नाशिकरोड उपकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या या वसाहतीत मंगला बाळकृष्ण पाराशर या सत्तरवर्षीय निवृत्त शिक्षिका राहतात. बुधवारी बाजारात जावून भरदुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या. यावेळी आपल्या घराच्या कुंपनाला असलेल्या प्रवेशद्वाराचे कुलूप उघडत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोनतोळे वजनाची सोनसाखळी ओरबाडून तेथून पोबारा केला.
या घटनेनंतर श्रीमती पाराशर यांनी आरडाओरड केल्याने आसपासचे नागरिक त्यांच्या मदतीसाठीही धावले, मात्र मनात कोणतीही भीती न बाळगता एकामागून एक घटना साकारणार्या चोरट्यांचा त्यांना माग काढता आला नाही. दुपारी एक वाजता घडलेल्या या घटनेची शहर पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता नोंद करण्यात आली, यावरुन पोलिसांच्या कार्यपद्धतीचाही प्रत्यय येतो. एका पत्रकाराच्या मदतीने संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात जबरी चोरीच्या कलम 392 नुसार गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्याकडे सोपविला. आज भर दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अशीच घटना समोर आली. अवघ्या 24 तासांत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या चौथ्या घटनेने शहरातील महिलांच्या निर्धोक वावरण्यावर मर्यादा आल्या असून उपनगरातही भितीचे वातावरण तयार झाले आहे.
यापूर्वी संगमनेर शहर उपविभागात कार्यरत असलेल्या पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत त्याच्या मुळाशी जावून तपास केला होता. त्यासाठी प्रत्येक घटनेच्या सीसीटीव्ही फूटेजचे तांत्रिक विश्लेषण करुन त्यांनी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील विनोद उर्फ खंग्या चव्हाण याच्या टोळीचा पर्दाफाश करीत त्यातील तिघांच्या मुसक्या आवळण्यातही यश मिळवले होते. त्यांच्या या धडक कारवाईने तेव्हापासून संगमनेर उपनगरातील अशाप्रकारच्या घटनांना जवळपास पायबंद बसलेला असताना आता पुन्हा एकदा पोलिसांच्या निष्क्रियतेचा लाभ घेत सोनसाखळी चोरट्यांचा उपद्रव वाढू लागला आहे.
मंगळवारी (ता.4) रात्री पावणेनऊच्या सुमारास अतिशय दाट लोकवस्तीत आणि शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या एका औषध दुकानात घुसून दोघांनी दुकानमालक महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडली होती. मात्र आपला कार्यभाग उरकून पसार होणार्या दोघाही चोरट्यांनी घटनास्थळापासून शंभर मीटरच्या अंतरावरच काही धाडशी तरुणांनी पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचवेळी नाशिक रस्त्यावरील सह्याद्री महाविद्यालयाजवळही अशीच घटना घडल्याचे सांगत एक जोडपे पोलीस ठाण्यात आले. माळीवाड्यातील घटनेपूर्वी अर्धातास आधी सदरील जोडपे शतपावली करीत असतांना ‘त्या’ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविण्यात आले होते. त्याची तक्रार घेवून आलेल्या या जोडप्याला बराचवेळ ताटकळत बसवून ठेवल्यानंतर थातूरमातूर उत्तरे देत तक्रार न घेताच त्यांना माघारी पाठवण्यात आले. त्या घटनेला आता 48 तास उलटत असतानाही सदर प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला नाही. यावरुन पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित होवू लागली आहे.
शहरात घडणार्या घटनांचे तपास होत नसल्याने मनोबल वाढलेल्या चोरट्यांनी आता थेट पोलीस ठाण्यांचे परिसर लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून आज दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घुलेवाडीतील तालुका पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या एका कापड दुकानाजवळून एका महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविण्यात आले आहे. एकामागून एक घडणार्या या घटनांनी शहरात पोलिसांचे राज्यच संपुष्टात आणले असून श्रीरामपूरच्या सोनसाखळी चोरांनी शहर पोलिसांनाच आव्हान दिले आहे.