‘सूर्यवंशी’च्या दहशतीसमोर नागरीक हतबल! गलोलीचा करतोय वापर; वाहन आडवून साधला निशाणा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वेगवेगळे बेकायदा उद्योग, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, वाटमारी, सतत हाणामार्‍या आणि दादागिरी यामुळे अकोले नाक्यावर प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात नशेत धुंद होवून साई सूर्यवंशी याच्याकडून सुरु असलेल्या दहशतीसमोर नागरीक हतबल झाले असून पोलिसही सटरमटर कारवाई करुन त्याला सोडून देत असल्याने त्याच्या दादागिरीत प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळीही त्याच्याकडून नाहक एकाला गलोलीच्या गोट्यांनी मारहाण झाली असून त्यात किरण बोबडे नावाचा इसम गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत बोबडेंच्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी रात्री उशिराने दाखल झालेल्या तक्रारीवरुन अकोले नाक्यावर उदय झालेल्या साई सूर्यवंशी या सराईत गुंडावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता.26) सायंकाळी सहाच्या सुमारास अकोले नाक्यावरील मालपाणी विद्यालयासमोर घडली. शहरातील चव्हाणपूरा परिसरात राहणार्‍या किरण हरिभाऊ बोबडे यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने ते आपले चारचाकी वाहन (क्र.एम.एच.16/ए.टी.0339) जवळे कडलग येथील आपल्या मित्राच्या घरी लावण्यासाठी निघाले होते. चव्हाणपूर्‍यातून ते आपल्या वाहनासह मालपाणी विद्यालयासमोर आले त्यावेळी रस्त्याच्या मधेामध एक तरुण मद्यधुंद अवस्थेत लोकांना शिवीगाळ करीत असल्याचे त्यांना दिसले.


यावेळी त्याने बोबडे यांच्या वाहनासमोर येवून त्यांना वाहन उभे करण्यास भाग पाडले व काहीही कारण नसताना नाहक त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बोबडे वाहन उभे करुन खाली उतरले असता त्याने आपल्याकडील गलोलमधून खडा मारीत त्यांच्या गाडीची काच फोडली. एवढ्यावरच न थांबता त्याने गलोलच्या सहाय्याने एकामागून एक खडे मारीत किरण बोबडे यांचे डोकेही फोडले. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र परिसरात उपस्थित असलेल्या नागरीकांमधील कोणीही त्यांच्या मदतीसाठी जाण्यास धजावले नाही.


यावेळी बोबडे यांनी ओळखीच्या माणसांनाही नावाने हाका मारीत धावा केला. मात्र ‘हा गुंड आहे, आम्ही आत्ता तुला मदत करण्यासाठी आला तर तो नंतर आम्हाला त्रास देईल’ असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. त्यातून परिसरातील नागरीक साई शरद सूर्यवंशी याच्या दहशतीसमोर हतबल असल्याचेही चित्र दिसून आले. मात्र या दरम्यान कोणीतरी शहर पोलिसांना फोनवरुन सुरु असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांचे वाहन पोहोचले आणि त्यांनी पाठीमागून जात त्याच्या मूसक्या आवळीत त्याला पोलीस ठाण्यात नेले.


या प्रकरणी रात्री उशिराने किरण बोबडे यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अकोले नाका परिसरात राहणार्‍या साई शरद सूर्यवंशी याच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 326, 427, 338, 341, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत त्याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार अशोक पारधी यांच्याकडे देण्यात आला आहे.


अकोले नाका परिसरात राहणार्‍या साई शरद सूर्यवंशी याने गुंडांची टोळी तयार केली असून त्याच्या माध्यमातून त्याने परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे. त्याच्यावर यापूर्वी शस्त्रांचा वापर करुन मारहाण करणे, वाटमारी करणे, हाणामार्‍या करणे, अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणे, परिसरातील लोकांवर दादागिरी करणे यासह वेगवेगळ्या अवैध धंद्यांवरुन गुन्हे दाखल आहेत. आतातर तो थेट भरदिवसा रस्त्यात लोकांना आडवून त्यांना मारहाण करीत त्यांच्या वाहनांचे नुकसान करु लागल्याने नागरीकांमधून मोठा रोष व्यक्त होत आहे. पोलिसांनीही त्याचा गुन्हेगारी इतिहास विचारात घेवून त्याला कायमस्वरुपी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची गरज आहे.

Visits: 343 Today: 2 Total: 1414160

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *