प्रांताधिकाऱ्यांचा आदेश धुडकावणाऱ्या तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार? सामाजिक कार्यकर्त्याने पकडलेल्या वाहनावर कारवाईची टाळाटाळ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वलवे यांनी पकडलेल्या बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांनी त्या भागातील कामगार तलाठ्याला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र दोन वेळा त्यांच्याकडून सूचना देऊनही त्याने कोणतीही कारवाई न करता संबंधित वाळू तस्कराला मदत होईल असेच कृत्य केल्याने त्याच्यावर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी संगमनेरच्या तहसीलदारांना बजावलेल्या आदेशात याबाबतचा सविस्तर वृत्तांत कळविला असून शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत पुढील कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वलवे हे गुरुवारी (ता.27) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या घराकडे जात असताना निमज शिवारातून धांदरफळच्या दिशेने जात असलेल्या एका डंपर वजा टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस वाळू भरल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी सदरचे वाहन थांबवून त्यात भरलेल्या साहित्याची तपासणी केली असता वरच्या बाजूने कृत्रिम सँडचा थर आणि त्याखाली प्रवरानदी पात्रातून उचललेली वाळू भरलेली त्यांना दिसली. त्यांनी संबंधित वाहन चालकाकडे परवान्याबाबत चौकशी केली असता त्याने मुदत संपलेला परवाना दाखवीत उडवा उडवीची उत्तरे देत तेथून टेम्पोसह पळ काढला. त्यानंतर साहेबराव वलवे यांनी याबाबत संगमनेरच्या प्रांतांधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करण्याची विनंती केली व ‘त्या’ टेम्पोचा आपल्या दुचाकीवरून पाठलाग सुरू केला.
सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतर कापल्यानंतर साहेबराव वलवे यांनी धांदरफळमध्ये सदरचा टेम्पो आठवला. त्यावेळी रामदास मुळे या धांदरफळच्या कामगार तलाठ्याचा त्यांना फोन आला व त्याने आपण घुलेवाडीत असून लवकरच तेथे येत आहोत, तुम्ही पकडलेला टेम्पो तसाच पकडून ठेवा असे सांगितले. त्यामुळे वलवे यांनी सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्या तलाठ्याची वाट पाहिली मात्र तो काही फिरकला नाही. यादरम्यान वलवे यांनी प्रांताधिकाऱ्यांना वेळोवेळी याबाबत माहिती दिली. त्यांनीही एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा रामदास मुळे या तलाठ्याला धांदरफळात जाऊन त्या वाहनावर कारवाईचे आदेश दिले. मात्र त्याने दोनही वेळा ते धुडकावून लावले. हा सगळा प्रकार पाहून गोंधळलेल्या साहेबराव वलवे यांनी कारवाईसाठी उपोषणाचाही इशारा दिला.
त्यांच्या या इशाऱ्यापूर्वीच खुद्द प्रांताधिकार्यांनी दोन वेळा आदेश देऊनही कारवाई न करणाऱ्या रामदास मुळे या तलाठ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. याबाबत त्यांनी साहेबराव वलवे यांच्या तक्रारीचा संदर्भ देत तहसीलदारांना दिलेल्या आदेशात गुरुवारी घडलेला घटनाक्रम आणि रामदास मुळे या तलाठ्याची त्यामागील भूमिका संशयास्पद असल्याचे आढळून येत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा आदेश दिला आहे. त्यामुळे मुळे आप्पा आता अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही या महाशयांचे धांदरफळ पट्ट्यात विविध मजेशीर किस्से चर्चेत होते. त्यात आता या प्रकरणाच्या माध्यमातून आणखी एका कथेची भर पडली आहे.
या घटनेबाबत विचारणा करणाऱ्या एकाने रामदास मुळे आप्पांना फोन करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आप्पांची जीभ घसरल्याचे दिसून आले. यावेळी आप्पांनी तक्रारदार साहेबराव वलवे यांच्याबाबत अपशब्दांचा वापर केला. त्यावरुन ही कारवाई मुळेआप्पांना चांगलीच झोंबल्याचेही दिसून आले. त्यातच ‘ती’ ऑडिओ क्लिप उघड झाल्यास मुळेआप्पाचा पाय आणखी खोलात जाणार हे मात्र नक्की.
Visits: 25 Today: 2 Total: 113344