शेतीच्या वादातून वृद्धास गुप्तीने मारण्याचा प्रयत्न

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील वरुडी पठार येथील भाऊसाहेब यशवंत फटांगरे या वृद्धास शेतीच्या बांधावरुन गुप्तीने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता.17) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वरुडी पठार येथील देवराम खंडू फटांगरे, सुनीता देवराम फटांगरे व शंकर देवराम फटांगरे हे सामाईक बांधाजवळ पत्र्याचे शेड टाकण्याचे काम करीत असताना भाऊसाहेब फटांगरे हे तिघांना म्हणाले की, तुम्ही बांधाजवळ शेड टाकू नका. तुमची जमीन मोजणी करून घ्या व तुमचे जमिनीत शेड टाका असे म्हणाल्याचा राग येवून तिघांनी फटांगरे यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच यातील देवराम फटांगरे याने गुप्तीने भाऊसाहेब फटांगरे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाऊसाहेब फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 63/2021 भादंवि कलम 323, 504, 506, 34 व आर्म अॅक्ट 4 (25) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करत आहे.
