घसरलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार? शिर्डीत आडाखे बांधण्यास सुरुवात; महायुतीकडून गड राखला जाण्याची शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा करिष्मा दिसून आला. मात्र यावेळी तशी स्थिती नसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला गेला. त्यावर महायुतीने मोदींना पर्यायच नसल्याचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडल्याने शेवटच्या क्षणी राज्यातील निवडणूक मोदी विरुद्ध गांधीवर येवून थांबली. त्याचा मतदारांवर किती प्रभाव झाला यावर शिर्डीचा निकाल अवलंबून आहे. त्यातच शिर्डीत गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा यंदा सरासरी कमी मतदान झाले. त्यामुळे घसरलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मतं आघाडीचा घात करणारी ठरतील असं मानलं गेलं. प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी वंचितचा उमेदवार मात्र स्पर्धेतूनच बाद झाल्याचे चित्रही बघायला मिळाले. मतदानाच्या पूर्वसंध्येला दोन्ही बाजूने जातीय तुष्टीकरणावरही भर दिला गेला. एकंदरीत मतदारांमधील निरुत्साह परिवर्तनाच्या दिशेने झुकणारा नसल्याने यंदाही महायुतीकडून शिर्डीचा गड राखला जाण्याचीच अधिक शक्यता आहे.


शिर्डीतील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या वयाचा आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या ‘गायब’ भूमिकेचा मुद्दाही चांगलाच चर्चेत आला. त्याला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी सुरुवातीला थोडीफार आघाडीही घेतल्याने शिर्डीच्या निवडणुकीत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. प्रत्यक्षात मतदानाचा दिवस उजेडण्यापूर्वीच वंचितचा उमेदवार स्पर्धेतून बाद झाल्याचे चित्र समोर येवू लागले. मागील निवडणुकीत वंचितसोबत एमआयएमने युती केली होती, यावेळी मात्र वंचित स्वतंत्रपणे लढत आहे. काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाच्या उत्थानासाठी काही आश्‍वासनेही दिली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर यावेळी बहुतेक मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या बाजूला झुकल्याचेही बघायला मिळाले.


निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाल्यानंतर अकोले व संगमनेर तालुक्यात वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांची हवा दिसून येत होती. अकोल्यात एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी पिचड-लहामटे एकत्रितपणे महायुतीसाठी काम करतील का? अशीही शंका निर्माण झाली होती. आमदार डॉ.लहामटे यांनीही आपल्या राजकीय शत्रूंसोबत मंचावर बसण्याचे टाळल्याने त्यांची भूमिका काहीशी संशयास्पद वाटू लागली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कान पिळल्यानंतर ते देखील सक्रिय झाले. अकोले तालुक्याने यापूर्वी कधीही भाजपला साथ दिलेली नाही, त्याचवेळी शिवसेनेच्या उमेदवाराने मात्र येथून मताधिक्क्य घेतल्याची उदाहरणे आहेत. उत्कर्षा रुपवते आणि भाऊसाहेब वाकचौरे या दोन्ही उमेदवारांची नाळही अकोल्याशी जोडली गेल्याने येथील मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार याची उत्सुकता होती. मात्र प्रत्यक्षात अकोल्यातील मतदानाचा आकडा साठीच्या पुढेही सरकला नसल्याने येथून कोणत्याही उमेदवाराला विजयी मताधिक्क्य मिळण्याची शक्यता धुसरच आहे.

संगमनेर विधानसभा मतदार संघ यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारासोबत उभा राहील्याची उदाहरणे आहेत. यावेळीही तशीच स्थिती असली तरीही मागील वेळेप्रमाणे यंदाही फारमोठे मताधिक्क्य मिळण्याची अपेक्षा नाही. शिवसेनेच्या दोन्ही गटात उफाळलेली गटबाजी संगमनेरसह संपूर्ण शिर्डी मतदार संघातही दिसून आली. त्याचाही फटका दोन्ही उमेदवारांना बसेल अशी स्थिती होती. मात्र दोघांमधील एकाची निवड करताना संगमनेरकरांनी केंद्रीय नेतृत्त्वाचा विचार केल्याचे मतदानातून दिसून आले. संगमनेर मतदार संघात गेल्या चार दशकांपासून बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा प्रसंग वगळता थोरात यांनी आपल्या मतदार संघाकडे पाठ फिरवल्याने संगमनेरकर मतदार वाकचौरेंना कितपत थारा देतील हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. थोरातांच्या राजकीय उत्तराधिकारी डॉ.जयश्री थोरात यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. मात्र त्यातून त्यांनी लोकसभेपेक्षा विधानसभेचीच मत पेरणी केल्याच्याही चर्चा समोर आल्या.


शिर्डी विधानसभा मतदार संघ विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात झालेल्या एकूण मतदानातील 70 ते 80 टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला झाल्याचा अंदाज आहे. कोपरगाव मतदार संघाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. सुरुवातीला महायुतीच्या प्रचारापासून अंतर राखणार्‍या स्नेहलता कोल्हे यांचे मन वळवण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. त्याचा परिणाम कोपरगावमधून आमदार आशुतोष काळे आणि स्नेहलता कोल्हे या दोघांनीही सदाशिव लोखंडे यांचे मताधिक्क्य वाढवण्यासाठी काम केले. त्यामुळे शिर्डी आणि कोपरगाव या दोन मतदार संघातून महायुतीला निर्णायक आघाडी मिळण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर मतदार संघातील विद्यमान आमदार लहु कानडे यांचा मतदारांवरील प्रभाव बोलका आहे. ऐन निवडणुकीच्या आधी माजी आमदार भानुदास मुरकूटे यांनी महायुतीच्या बाजुने कौल दिला होता. विखे समर्थक दीपक पटारे यांचाही या मतदार संघात चांगला प्रभाव आहे. त्यामुळे श्रीरामपूरात दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळण्याचा अंदाज आहे.


नेवासा मतदार संघातील माजीमंत्री शंकररराव गडाख यांनी मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जीवाचे रान केल्याचे दाखले असून त्याचा प्रभाव भाऊसाहेब वाकचौरे यांचे मताधिक्क्य वाढण्यात होवू शकतो. मात्र नेवाशातून मिळणारी अतिरीक्त मतं संगमनेर, शिर्डी, कोपरगाव व श्रीरामपूर मतदार संघातून मिळणारे मताधिक्य कापण्यास पुरेशी ठरणार नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे शिर्डीतील पारडे जड असल्याचे दिसून येते. सुरुवातीला तिरंगी वाटणार्‍या लढतीतून वंचितच्या उत्कर्षा रुपवते बाद ठरल्याने त्यांना मिळणारी मते महाविकास आघाडीचे फारशे नुकसान करणारी नसतील, मात्र चुरशीच्या लढतीत चार विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या पारड्यात पडणारी मते सदाशिव लोखंडे यांना लाखभर मतांच्या फरकाने विजयी करणारी ठरु शकतात.


शिर्डी लोकसभा मतदार संघ गेल्या तीन पंचवार्षिकपासून भाजप-शिवसेना महायुतीसोबत आहे. यावेळीही या मतदार संघातील मतदारांमध्ये परिवर्तनाबाबत कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. कोणत्याही मतदार संघात गेल्यावेळी पेक्षा अधिक होणारे मतदान परिवर्तन घडवणारे समजण्यात येते. मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघात यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास सात टक्के कमी मतदान झाले आहे. त्यातच सुरुवातीला तिरंगी वाटणारी लढत शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या दोन गटातच केंद्रीत झाल्याने शिर्डीची लढत रंगतदार होवून विजयाचे अंतर लाखभर मतांवर येण्याची दाट शक्यता आहे.

अखेर पेमरेवाडीत मतदान झाले..
संगमनेर तालुक्यातील पठारभागात असलेल्या पेमरेवाडीसाठी भोजदरीकडे जाणारा 3.8 किलोमीटर रस्ता मंजूर होवूनही ठेकेदाराने केवळ 1.8 किलोमीटर रस्त्याचे काम करण्याची तयार दाखवल्याने पेमरेवाडीतील नागरीक संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी (ता.13) मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी वाडीत जावून ग्रामस्थांशी चर्चा केली व त्यांची समस्या सोडवण्याची ग्वाही देत त्यांना मतदानाचे आवाहन केले. त्यानंतर दुपारी अडीच वाजल्यानंतर पेमरेवाडीतील मतदानाला सुरुवात झाली.

शिर्डी मतदार संघात 63.03 टक्के मतदान..
18 व्या लोकसभेसाठी जिल्ह्यात सोमवारी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत शिर्डी लोकसभा मतदार संघातील 16 लाख 77 हजार 335 मतदारांपैकी 10 लाख 57 हजार 298 (63.03 टक्के) मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शिर्डीत सर्वाधीक 65.77 टक्के मतदानाची नोंद संगमनेर मतदार संघात झाली. तर, सर्वात कमी 59.82 टक्के मतदान अकोले मतदार संघात नोंदवले गेले. श्रीरामपूर येथे 64.08, शिर्डीत 63.77 टक्के, नेवाशात 63.29 टक्के तर कोपरगावमध्ये 61.18 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

अहमदनगर मतदार संघात 63.77 टक्के मतदान..
अतिशय लक्षवेधी लढत ठरलेल्या अहमदनगर दक्षिण मतदार संघातही सोमवारी 19 लाख 81 हजार 866 मतदारांमधील 12 लाख 63 हजार 781 (63.77 टक्के) मतदारांनी आपले पवित्र कर्तव्य बजावले. या मतदार संघातील राहुरीमध्ये उच्चांकी 69.79 टक्के तर अहमदनगर शहरात निचांकी 57.60 टक्के मतदानाची नोंद झाली. कर्जत-जामखेड मतदार संघात 65.81 टक्के, पारनेरमध्ये 63.97 टक्के, शेवगावमध्ये 62.74 टक्के, तर श्रीगोंदा मतदार संघात 62.54 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *