तब्बल सात दशकांनंतर पालिकेचे प्रांगण ‘शवमुक्त’! अखेर शवविच्छेदनगृह हलवले; आता घुलेवाडीत होणार उत्तरीय तपासण्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या सात दशकांहून अधिक कालावधीपासून संगमनेर नगर पालिकेच्या प्रांगणात कार्यान्वित असलेले शवविच्छेदनगृह अखेर हलविण्यात आले आहे. दहा महिन्यांपूर्वी उत्तरीय तपासणीसाठी एकाचवेळी पाच मृतदेह 12 ते 22 तासांपर्यंत ताटकळल्याने मयतांच्या नातेवाईकांचा संताप झाला होता. त्यावेळी संतप्त नागरिकांनी थेट पालिकेच्या मुख्यालयात जावून अधिकार्यांना जाब विचारत गोंधळही घातला होता. याबाबत दैनिक नायकने ग्रामीण रुग्णालयाच्या अखत्यारित असलेल्या शवविच्छेदनगृहामागील वास्तवावर प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी रुग्णालयाचे स्थलांतर होवूनही पालिकेच्या आवारातील इमारतीचा उत्तरीय तपासणीसाठी होणारा वापर तत्काळ थांबवण्यासाठी वैद्यकिय अधिक्षकांशी पत्रव्यवहारही केला होता. तो आता प्रत्यक्षात उतरला असून बुधवारपासून पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनगृह पूर्णतः बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे मृतदेहांच्या उत्तरीय तपासण्या घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातच होणार असून त्यातून मयतांचे नातेवाईक आणि वैद्यकिय अधिकार्यांनाही दिलासा मिळाला आहे.
गेल्यावर्षी 30 जूनरोजी तालुक्यातील पेमगिरी येथील पुष्पा उत्तम डूबे ही महिला शेततळ्यात तर, जवळे कडलग येथील ज्योती संतोष पाटेकर ही विहिरीत बुडून मरण पावली होती. त्यासोबतच कोकणगाव शिवारात अमोल गजानन सानप व निळवंडे शिवारात अनुकूल सत्यवान मेंढे या दोघा तरुणांच्या अपघाती मृत्यूसह निमगाव टेंभी येथील अश्विन बाबुराव कर्पे या तरुणाने गळफास घेतला होता. एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळांना घडलेल्या या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या पाचही जणांचे मृतदेह त्याच दिवशी उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आले होते. सूर्यास्तानंतर महिलांचे विच्छेदन होत नसल्याने दुसर्या दिवशी (ता.1 जुलै) या पाचही जणांच्या उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सकाळीच सुरु होणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मात्र घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी माध्यान्नापर्यंत पालिकेच्या आवारात फिरकलेच नाहीत.
त्यामुळे घटनेनंतर जवळपास 12 ते 22 तासांपर्यंत प्रतिक्षा करुनही मयतांच्या नातेवाईकांना आपल्या आप्ताचा मृतदेह ताब्यात न मिळाल्याने त्यांच्या संयमाचा अंत होवून संताप उफाळला. या सर्व पाचही मयतांच्या नातेवाईकांनी पालिकेच्या मुख्यालयात जावून आपला रोष व्यक्त केला. त्यावेळी आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना दैनिक नायकने या संपूर्ण प्रकरणामागील वास्तव समोर आणले. त्याची तत्काळ दखल घेत पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी घुलेवाडीच्या वैद्यकिय अधिक्षकांशी पत्रव्यवहार करुन त्यांना परिस्थितीची माहिती देत पालिकेच्या आवारातून रुग्णालयाचे स्थलांतर होवूनही शवविच्छेदनगृह मात्र आहे तेथेच असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबतही दैनिक नायकने आवाज उठवला. त्याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी संगमनेरात येवून परिस्थितीची माहिती घेतली व ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या शवविच्छेदनगृहातील सुविधा वाढवून पालिकेच्या आवारातील विच्छेदनगृह हलविण्याचे आदेश दिले.
घुलेवाडीच्या वैद्यकिय अधिक्षकांनीही तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करुन ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी उभारलेल्या इमारतीत ओटा, रँप, पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा, मर्च्युरी कॅबिनेट ठेवण्यासाठी जागा व सुरक्षा भिंत आदी सुविधा निर्माण करुन देण्याची विनंती केली. गेल्या दहा महिन्यांत यासर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर आता घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातच असलेल्या इमारतीत शवविच्छेदनाची व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. त्याबाबतचे पत्रही मुख्याधिकार्यांना देण्यात आले असून बुधवारपासून (ता.15) पालिकेच्या आवारातील शवविच्छेदन गृहाचा वापर पूर्णतः थांबविण्यात आल्याचे वैद्यकिय अधिक्षकांनी लिहिलेल्या पत्रातून सांगितले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या या निर्णयाने मयतांच्या नातेवाईकांसह परिसरात राहणारे नागरीक व घुलेवाडीतून पालिकेत येवून शवविच्छेदन करावे लागणारे वैद्यकिय अधिकारी अशा सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
सन 1860 साली संगमनेर नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सन 1873 मध्ये पालिकेच्या प्रांगणात सरकारी दवाखाना सुरु करण्यात आला होता. त्यानंतर सत्तर वर्षांनी सन 1943 मध्ये तत्कालीन ब्रिटीश राजवटीने मुंबई इलाख्यातील पाच तालुक्यांमध्ये ‘कुटीर रुग्णालय’ सुरु करण्याचा निर्णय घेतला, त्यात संगमनेरचाही समावेश होता. सरकारच्या निर्णयानुसार 12 जून 1943 रोजी पालिकेच्या प्रांगणात कुटीर रुग्णालयाचे प्रत्यक्ष कामकाजही सुरु झाले. नंतरच्या दहा वर्षांनी सन 1953 मध्ये रुग्णालयाच्या दक्षिणेस शवविच्छेदनगृह बांधण्यात आले. तेव्हापासून तेथे संगमनेर व अकोले तालुक्यातील मयतांची उत्तरीय तपासणी केली जात. पुढे अकोल्यात ग्रामीण रुग्णालय सुरु झाले, त्यामुळे अकोल्यातील मृतदेह संगमनेरात आणण्याची प्रक्रिया थांबली.
फेब्रुवारी 2009 मध्ये घुलेवाडीत ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त नूतन इमारत उभी राहील्याने पालिकेच्या आवारातील कुटीर रुग्णालय घुलेवाडीत स्थलांतरीत झाले. मात्र ‘त्या’ इमारतीत शवविच्छेदन विभाग असूनही पालिकेच्या आवारातील इमारतीचाच विच्छेदनासाठी वापर सुरु राहीला. याबाबत या इमारतीच्या परिसरात राहणार्या रहिवाशांनीही वेळोवेळी आवाज उठवला, तर दहा महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेने पालिकेला सक्रिय केले. त्यातून अखेर तब्बल सात दशकांनंतर पालिकेच्या आवारात होणारी मृतदेहांची उत्तरीय तपासणी पूर्णतः थांबवण्यात आली असून यापुढे त्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील विच्छेदनगृहाचाच वापर केला जाणार आहे.
घुलेवाडीत ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधताना शवविच्छेदन कक्षही बांधण्यात आला होता. मात्र तेथे आवश्यक सुविधा निर्माण केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे 2009 साली रुग्णालयाचे स्थलांतर होवूनही मृतदेहांची उत्तरीय तपासणी मात्र पालिकेच्या आवारातील जुन्या विच्छेदनगृहातच केली जातं. आता रुग्णालयाच्या आवारातील विच्छेदनगृहाच्या नूतनीकरणासह आवश्यक सुविधाही उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पालिकेच्या विच्छेदनगृहाचा वापर पूर्णतः थांबवण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयातच विच्छेदनाची सुविधा सुरु झाल्याने मयतांचे नातेवाईक व उत्तरीय तपासणी करणार्या वैद्यकिय अधिकार्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
डॉ.संदीप कचेरिया
वैद्यकिय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी