मिर्झापूर प्रकरणातील विवाहितेची हत्या की आत्महत्या? शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा; आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन नवर्याला अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झालेल्या 23 वर्षीय विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. मात्र प्रत्यक्षात सदरील तरुणीचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने नातेवाईकांच्या मागणीवरुन मयतेचे शवविच्छेदन करण्यासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय पथकाला पाचारण करण्यात आले होते, त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. मात्र या दरम्यान मयत सायली अविनाश वलवे हिच्या वडिलांनी ट्रॅक्टरची अवजारे घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करीत आपल्या मुलीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केल्याने तालुका पोलिसांनी मयतेचा नवरा व सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून नवरा अविनाश निवृत्ती वलवे याला रविवारी रात्रीच अटक करण्यात आली आहे. मयत सायली वलवेचा मृत्यू संशयास्पद असून तिच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या जखमांसह थेट मेंदूत रक्तस्राव झाल्याची माहिती असून तिचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्येचा बनाव रचला गेल्याचा दाट संशय आहे.
मूळच्या मंगळापूर येथील सायली विजय पवार या तरुणीने वर्षभरापूर्वी मिर्झापूर येथील अविनाश निवृत्ती वलवे याच्याशी प्रेमविवाह केला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता.26) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिने सासुरवाडीतील आपल्या शयनकक्षाच्या खिडकीला ओढणीच्या सहाय्याने फास बांधून आत्महत्या केल्याची खबर मयतेची सासू सुभद्रा निवृत्ती वलवे हिने तालुका पोलिसांना दिली. त्यावरुन पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरु केला. पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी मयतेचा मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याच्या खूणा आढळून आल्याने त्यांना सुरुवातीपासूनच या प्रकरणात घातपात असल्याचा संशय होता. त्यामुळे मयतेच्या शवविच्छेदनासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या आठजणांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.
शवविच्छेदनानंतर वैद्यकिय पथकाने अद्याप कोणताही निष्कर्ष मांडलेला नाही. मात्र दैनिक नायकला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सायली अविनाश वलवे या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. तिच्या शरीरावर आढळलेल्या जखमाही गंभीर स्वरुपाच्या असून डोक्यालाही गंभीर इजा झाल्याने मेंदूत रक्तस्राव झाला आहे. तिला झालेल्या बेदम मारहाणीतच सायलीचा मृत्यू झाला असण्याची व त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचला गेल्याची दाट शक्यता असून विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दाखल प्रकरणातील कलमांमध्ये बदल केला जाणार आहे.
या दरम्यान रविवारी (ता.28) सायंकाळी मयत सायलीचे वडिल विजय महिपतराव पवार (रा.मंगळापूर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आपली मुलगी मिर्झापूर येथे सासरी नांदत असताना सासरकडील मंडळीने सामायिक इराद्याने मयत सायलीला ट्रॅक्टरची अवजारे घेण्यासाठी वडिलांकडून दोन लाख रुपये घेवून येण्याचा वेळोवेळी तगादा लावला. मात्र वडिलांची परिस्थिती मुलीला माहिती असल्याने तिच्याकडून त्यांची मागणी पूर्ण होवू शकली नाही. त्यामुळे रागावलेल्या अविनाश निवृत्ती वलवे (नवरा) याने चापटीने मारहाण करुन तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
आरोपी क्रमांक दोन असलेली मयतेची सासू सुभद्रा निवृत्ती वलवेने ‘तुला स्वयंपाकच जमत नाही, तु लोकांमध्ये चांगलं वागत नाहीस. तु माझ्या मुलाच्या गळ्यात पडली आहेस’ असे वारंवार हिणावत तिचा मानसिक छळ केला. या उपरांतही सुभद्रा वलवेने मुलगा अविनाश याला वेड्यावाकड्या गोष्टी सांगून त्याला तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास भाग पाडले. या सततच्या त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यावरुन तालुका पोलिसांनी मयत सायलीचा नवरा अविनाश निवृत्ती वलवे व सासू सुभद्रा निवृत्ती वलवे या दोघांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 323 (मारहाण करणे), 504 शिवीगाळ व 506 धमकी दिल्यावरुन गुन्हा दाखल केला असून आरोपी क्रमांक एक अविनाश निवृत्ती वलवे याला रविवारी रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांच्याकडे देण्यात आला आहे.
मयत सायली अविनाश वलवेचा मृत्यू अत्यंत संशयास्पद असून मृत्यूनंतर तिच्या आत्महत्येचा बनाव रचला गेल्याची दाट शक्यता आहे. मयतेच्या पोटात चार महिन्याचा गर्भ असल्याचीही चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात शवविच्छेनातून असा कोणताही प्रकार नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. मयत तरुणीच्या शरीरावर मारहाण केल्याच्या गंभीर खूणा असून तिचा इतका अनन्वित छळ करण्यात आला आहे की थेट मेंदूत रक्तस्राव झाल्याचेही शवविच्छेदनातून समोर आले आहे. मात्र प्रवरा ग्रामीण रुग्णालयाकडून अद्याप विच्छेदन अहवाल अप्राप्त असल्याने पोलिसांना त्याची प्रतिक्षा आहे. तो प्राप्त झाल्यानंतर दाखल प्रकरणातील कलमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.