तांभेरे प्रकरणी राहुरी पोलिसांची होणार चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर करणार तपास

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील तांभेरे येथे निळा झेंडा लावल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी अनुसूचित जाती वर्गातील नागरिकांना बेकायदा डांबून ठेवले. याप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे राजू आढाव यांची लेखी तक्रार व विनंती ग्राह्य धरून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडून या घटनेचा तपास काढून घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राजू आढाव यांनी दिली.

अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजावरील बहिष्कारासारखा गंभीर गुन्हा दडपून टाकून गावातील आंबेडकरी समाजातील लोकांवर गुन्हा दाखल नसताना न्यायालयाची दिशाभूल करून दोनवेळेस पोलीस कोठडी घेऊन लोकांना पोलीस निरीक्षक दराडे यांनी बेकायदेशीर डांबून ठेवले होते. याबाबत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजू आढाव यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे लेखी तक्रार देऊन पुराव्यासह बाजू मांडली. त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून तपास सोपविला होता.

परंतु आढाव यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून संदीप मिटके यांच्या तांभेरे प्रकरण चौकशी अधिकारी नेमणुकीवर लेखी तक्रारीद्वारे हरकत घेऊन व पोलीस अधीक्षकांची समक्ष भेट घेऊन या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे द्यावा, अशी मागणी केली होती. आता याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे सोपविण्यात आला असून राहुरी पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
