मिर्झापूरच्या तरुणाचा मृतदेह 24 तासानंतरही अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत…
मिर्झापूरच्या तरुणाचा मृतदेह 24 तासानंतरही अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत…
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील मिर्झापूर येथून दोन दिवसांपासून गायब असलेल्या तरुणचा टाकेवाडी येथील तलावात सोमवारी (ता.14) मृतदेह आढळला. परंतु हा घातपाती मृत्यू असल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी करून यातील दोषींना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मृतदेह तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतरही अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत राहिला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मिर्झापूर येथील सत्तावीस वर्षीय तरुण तुषार सुभाष दिवटे हा दोन दिवसांपासून गायब होता. त्याचा शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद करुन तपास सुरू असतानाच सोमवारी दुपारी टाकेवाडी येथील तलावात त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी संगमनेर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये आणला. दरम्यान, याची माहिती तरुणाची आई अलका दिवटे या नातेवाईकांना घेऊन संगमनेरात आल्या. त्यांनी तुषारच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करुन त्याचा घातपाती मृत्यू असल्याचा आरोप केला. जोपर्यंत यातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. याबाबत पोलिसांना तक्रार अर्ज देऊन संशयितांची नावेही दिली.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे कॉटेज हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी तुषारच्या नातेवाईकांशी चर्चा करुन समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चेच्या फेर्या झडूनही पोलीस अधिकार्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. आपल्या मागणीवर तुषारची आई ठाम राहिली आणि रात्री उशिरा मृतदेह ताब्यात न घेता ते निघून गेले. त्यानंतर आज एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे समजते; परंतु यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यामुळे तुषारचा मृतदेह तब्बल 24 तासानंतरही अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत राहिल्याने तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.