पोलिसांनाही ग्रामोत्सवात सहभागी करुन घेणारा संगमनेरचा ऐतिहासिक रथोत्सव!..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सकाळी साडेसातची वेळ.. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बँण्डवर वाजणार्‍या विविध भक्तिगीतांमुळे प्रसन्न बनलेले वातावरण.. पोलीस कर्मचार्‍यांची सुरु असलेली लगबग.. अचानक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याचे पूर्ण शासकीय गणवेशात आगमन.. रंगीबेरंगी गोंडे, सोनेरी झालर अशा आकर्षक पद्धतीने सजवलेला भगवा ध्वज हाती घेतलेल्या पोलीस कर्मचार्‍याची धावपळ.. आणि लागलीच या झेंड्याचा स्वीकार करीत वाजत-गाजत मिरवणुकीने निघालेले प्रभारी अधिकारी, त्यांचे सहकारी आणि कर्मचारी.. हा सोहळा प्रथमच पाहणार्‍याच्या डोक्याला मुंग्या याव्यात.. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत गेली 95 वर्षे अखंडपणे अव्याहत सुरु असलेली, गावच्या उत्सवात पोलिसांनाही सहभागी करुन घेणारी ही जगावेगळी परंपरा बहुधा अवघ्या देशभरात संगमनेर वगळता अन्यत्र नाहीच..


संगमनेरच्या सामाजिक जीवनातील सर्वात मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा रथोत्सव. धर्म-पंथ, जात-पात असा कोणताही झेंडा हातात घेण्याचा अधिकार नसलेल्या, धर्मनिरपेक्ष वागण्याची कडवी ताकीद असलेल्या पोलीसांकडून चक्क गावफेरी काढून वाजत-गाजत आणलेला भगवा झेंडा प्रभारी पोलीस अधिकार्‍याच्या हाताने ‘विजय रथावर’ चढवण्याची साडेनऊ दशकांची ही अखंड परंपरा.


सन 1927 ते 1929 अशा सलग तिन वर्ष रंगारगल्लीतील भडंगबुवा मशिदीपासून रथ पुढे नेता येणार नाही अशी भूमिका घेत वारंवार रथयात्रेत अडथळा निर्माण करणार्‍या ब्रिटीशांना धडा शिकवण्यासाठी झुंबराबाई अवसक या झुंझार महिलेने 23 एप्रिल, 1929 रोजी ब्रिटीशांचा बंदी हुकूम मोडीत मारुतीरायाची तसबीर रथात नेऊन ठेवली आणि बघता-बघता संगमनेर परिसरातील शेकडों स्त्रियांनी पदर खोसीत हा रथ विजेच्या गतीने रंगारगल्ली पर्यंत ओढला. त्यावेळी जवळपास पाचशे पोलिसांचा कडक बंदोबस्त असतांनाही हा प्रकार घडल्याने अपमानीत झालेल्या ब्रिटीश अधिकार्‍यांनी बैलगाड्या, सरकारी मोटारी यांचा अडथळा करीत हा रथ सोमेश्वर मंदिराजवळ अडविला. त्यामुळे प्रचंड हमरा-तुमरी माजली, गुलाल-बत्ताशे, खोबरे-खडीसाखरेचा मारा सुरु झाला. मात्र सरकार काही नमते घेईना.


तब्बल दोन महिने हा खेळ असाच सुरु होता. रंगारगल्लीत स्थिरावलेल्या रथात विराजमान मारुतीयासमोर शहरातील अबालवृद्ध एकत्र होऊन दररोज पूजा-अर्चा, भजन-संध्या करु लागले. अखेर पोलिसांना संगमनेरकरांच्या एकोप्यासमोर गुडघे टेकावे लागले. दोन महिन्यांनी त्यांनी हा रथ पुढे नेण्यास परवानगी दिली. मात्र संगमनेरकर दरवर्षीच्या या आडकाठीला पूर्णत: वैतागल्याने पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची हमी मागण्यात आली. गोंधळलेल्या ब्रिटीशांनी लागलीच सरकारकडून पुन्हा हा रथ अडविला जाणार नाही, रथाच्या मार्गात कोणताही बदल केला जाणार नाही आणि सरकारकडून या रथाचा संपूर्ण सन्मान करतांना दरवर्षी वाजत-गाजत प्रभारी अधिकार्‍याच्या हस्ते रथाला ध्वज अर्पण केला जाईल अशा आशयाचा लेखी करार करुन दिला.


प्रचंड बंदोबस्त असतांनाही संगमनेरच्या स्त्रीशक्तीने एकतेचे दर्शन घडवित रथयात्रेची परंपरा अखंडीत राखली. त्यामुळे ब्रिटीशांनी महिलांच्या प्रतिनिधी म्हणून झुंबराबाई अवसक यांचा साडी-चोळी देऊन सत्कारही केला. तेव्हापासून आजपर्यंत सरकारकडून पोलिसांच्या माध्यमातून दरवर्षी वाजत-गाजत हा मानाचा ध्वज रथावर चढु लागला. ब्रिटीश राजवट गेली, भारत सरकार.. लोकशाही अस्तित्वात आली. मात्र विजय रथाची ही परंपरा गेली 95 वर्षे अखंडीतपणे.. अव्याहतपणे आजही सुरुच आहे.


इतकी मोठी प्रगल्भ पार्श्वभूमी असलेल्या या उत्सवात अधिकृतपणे सहभागी होता आले, मिरवणूकीने ध्वज नेतांना आपणही या ऐतिहासिक रथाच्या इतिहासात अनाहुतपणे नोंदलो गेलो आहोत ही भावना मनी उचंबळुन येत होती. माझी पोस्टींग येथे नसती तर मी या दिव्य, संस्मरणीय आनंद सोहळ्याला मुकलो असतो. नागरीकांकडून जागो-जागी आमचे, मानाच्या ध्वजाचे स्वागत, प्रत्यक्ष रथावर झेंडा चढवण्याचा सन्मान आणि मारुतीरायाची आम्हा पोलीसांच्या हस्ते झालेली आरती यामुळे आम्हा पोलिसांचे जीवन सार्थकी लागले ही माझी भावना आहे.
भगवान मथुरे
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

Visits: 109 Today: 2 Total: 439799

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *