दरोड्याचा बनाव करुन साडेतीन लाख हडपण्याचा प्रकार उघड! तालुका पोलिसांची दमदार कामगिरी; फिर्यादी वाहनचालकच निघाला दरोड्याचा सूत्रधार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील समनापूर येथून लोखंड घेवून नेवासा फाटा येथे गेलेल्या व मालाचे पैसे घेवून परतणार्या वाहनचालकाला कोंची घाटात लुटण्याचा प्रकार महिन्याभरापूर्वी समोर आला होता. या प्रकरणी ‘त्या’ वाहनाचा चालक सोहेल याकूब शेख याच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास केला असता त्यातील वास्तव समोर आले असून चालकानेच बनाव रचून आपल्या वाहनावर दरोडा पडल्याचे चित्र उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांना गजाआड केले असून त्यांनी लांबविलेली 3 लाख 66 हजार 500 रुपयांची रोख रक्कमही हस्तगत केली आहे. अवघ्या महिनाभरात या गंभीर गुन्ह्याचा दमदार तपास करुन तालुका पोलिसांनी संपूर्ण रक्कम पुन्हा हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात 6 एप्रिल रोजी सदरची घटना घडली होती. समनापूर येथे तुफैल मुक्तार मलिक यांचे लोखंडाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात काम करणारा त्यांच्या वाहनाचा (क्र.एम.एच.17/बी.वा हीींिं://ी.वा/य.661) चालक सोहेल याकूब शेख (वय 29, रा.एकतानगर) हा 6 एप्रिल रोजी वाहनात लोखंड भरुन नेवासाफाटा येथे ते पोहोचवण्यासाठी गेला होता. संबंधित दुकानदाराने येताना मालाचे पैसे घेवून येण्याची सूचनाही त्याला केली होती. त्यानुसार त्याने नेवासाफाटा येथे माल पोहोचवून त्यापोटीची 3 लाख 66 हजार 500 रुपयांची रक्कम संबंधित दुकानदाराकडून घेतली व ती आपल्या वाहनाच्या ड्राव्हरमध्ये ठेवून सायंकाळी सातच्या सुमारास तो नेवासाफाटा येथून संगमनेरच्या दिशेने रवाना झाला.
नेवासाफाट्यापासून काही अंतर श्रीरामपूरच्या दिशेने आल्यानंतर पाठीमागून दोघेजण पल्सर मोटारसायकलवरुन आपला पाठलाग करीत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांच्यावर लक्ष ठेवीत त्याचे वाहन श्रीरामपूरपर्यंत आल्यानंतर शहरातील मोरगेवस्ती येथून एका पल्सरवर बसलेले आणखी दोघेजण त्यांच्यात सामील होवून दोन मोटारसायकलवरील चौघांनी त्याच्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. मात्र संबंधित मालवाहतुकीचा टेम्पो आणि ‘ते’ दुचाकीस्वार यांच्यात अंतर असल्याने वाहनचालकाला त्यांचा फारसा संशय आला नाही. मात्र कोंचीचा घाट सुरु होताच त्या दोन्ही मोटारसायकल त्याच्या वाहनाला ओलांडून पुढे आल्या आणि काही वेळातच त्यांनी सदरील टेम्पो अडवून चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली व गाडीत ठेवलेली 3 लाख 66 हजार 500 रुपयांची रोकड घेवून पुन्हा लोणीच्या दिशेने पलायन केले.
सदरील घटना रात्री उशिराने घडल्याने संबंधित वाहनचालकाने दुसर्या दिवशी (ता.7) सकाळी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात वरीलप्रमाणे हकीकत सांगून तक्रार दाखल केली. त्यानुसार तालुका पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात दरोड्याचे कलम 394 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सदरील प्रकरण रस्तालुटीचे असल्याने व त्यात मोठी रक्कम चोरीला गेल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी तालुका निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह या घटनेच्या तपासाला गती दिली. या दरम्यान सदरील वाहनचालकाने कोणाशी संपर्क केला होता येथून तपासाला सुरुवात झाली आणि पोलिसांसमोर एक-एक धक्कादायक माहिती येवून जमा व्हायला सुरुवात झाली.
हाती आलेल्या तथ्यांना तांत्रिक तपासाची जोड देवून अवघ्या महिन्याभरातच पोलिसांची या घटनेमागील वास्तव उजेडात आणताना वाहनचालकानेच आपल्या साथीदारांसह दरोड्याचा बनाव रचल्याचा आणि त्यातून सदरची रक्कम लाटल्याचा उलगडा केला. त्यानंतर पोलिसांनी सदरील वाहनाचा चालक सोहेल याकूब शेख याला अटक करुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपला साथीदार सैफअली शेरअली शेख (वय 25, रा.नाईकवाडपुरा) याच्याशी संगनमत करुन सदर प्रकार केल्याचे सांगितले. दरोड्याचा बनाव करुन हडपलेल्या रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी करता सदरील रक्कम त्याचा साथीदार आणि त्याचा भाऊ समीर याकूब शेख (वय 24, रा.एकतानगर) या दोघांकडे असल्याचा खुलासा केला. पोलिसांनी विनाविलंब त्या दोघांच्याही घरावर छापे घालीत त्यांना ताब्यात घेतले व त्यांनी घरात दडवून ठेवलेली 3 लाख 66 हजार 500 रुपयांची रक्कमही हस्तगत केली. या प्रकरणात त्या दोघांनाही सहआरोपी करण्यात आले असून सध्या ते कारागृहात कैद आहेत. महिन्याभरापूर्वी घडलेल्या या घटनेचा तालुका पोलिसांनी दमदार तपास करीत त्यामागील वास्तव तर उघड केलेच, मात्र त्यातून अपहार केलेल्या इतक्या मोठ्या रकमेचाही छडा लावून संपूर्ण रक्कम हस्तगत केल्याने तालुका पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.