जलसंपदा अधिकार्यांवर नियमांच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करा! खासदार सदाशिव लोखंडे यांची पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे मागणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याला मुदतवाढ देण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील दुरावा कायम असल्याचे दिसून येते. या खात्याचे मंत्री जयंत पाटील अहमदनगर जिल्ह्यात आले असताना शिवसेनेचे स्थानिक खासदार सदाशिव लोखंडे यांना टाळण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या लोखंडे यांनी या दौर्यात जमावबंदी आदेशाचा भंग झाल्याची तक्रार करून संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी (ता.22) संगमनेर तालुक्यात निळवंडे कालव्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. या लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोखंडे यांना मात्र निमंत्रित करण्यात आलेले नव्हते. याचाच राग त्यांना आला असावा. त्यामुळे मंत्री परतताच लोखंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. थेट मंत्र्यांना जबाबदार न धरता त्यांनी जलसंपदा विभागाच्या स्थानिक अधिकार्यांविरूद्ध तक्रार करून त्यांच्यावर जमावबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात लोखंडे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. नगरच्या जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचा आदेशही दिलेला आहे. असे असूनही जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक व कार्यकारी अभियंता गिरीष शिंघानी यांनी आढळा नदीवरील जलसेतूचा पाहणी दौरा आयोजित केला. यावेळी राज्यातील तीन मंत्र्यांसह 60 ते 70 लोक उपस्थित होते. त्यामुळे जमावबंदी आदेशाचा भंग झाला असल्याने या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे.
लोखंडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना टर्गेट केले असले तरी यामागे निळवंडेचा श्रेयवाद आणि राज्यपातळीवरील शिवसेना राष्ट्रवादीतील नव्या वादाचे कारण असल्याचे मानले जाते. जलसंपदा विभागातील एक वरिष्ठ अधिकारी निवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांची चौकशी सुरू असल्याचे कारण देत मुदतवाढ देता येऊ शकणार नसल्याचा प्रतिकूल शेरा फाईलवर मारला आहे. त्यामुळे हे प्रकरण रखडले. यावरून राष्ट्रवादीने शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. दोन आमदार जादा असले म्हणून शिवसेनेने जास्त उड्या मारू नयेत, अशा शब्दांतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. नगर जिल्ह्यात नेमक्या याच खात्याशी संबंधित मंत्र्यांच्या दौर्यावेळी शिवसेनेच्या खासदाराला टाळण्यात आले. त्यानंतर या खासदाराने जमावबंदीच्या आदेशाचा भंग झाल्याचे कारण देत गुन्हा दाखल केल्याची मागणी केली. यावरून सेना-राष्ट्रवादीतील वाद घुमसत अल्याचे सांगण्यात येते.