राजकीय संभ्रमात अडकला शिर्डी लोकसभा मतदार संघ! घोलपांचा शिवसेना प्रवेश; तर, काँग्रेसच्या राजेंद्र वाघमारेंकडून बंडखोरीचे संकेत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसभा निवडणुकांचा शंखनाद होण्यापूर्वीच राजकीय संभ्रमात अडकलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघात सध्या सुरु असलेल्या घडामोडींनी गोंधळात आणखी भर घातली आहे. या मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत सरळ लढत होण्याचा अंदाज आहे. दोन्ही आघाड्यांनी आपापल्या उमेदवारांचीही घोषणा केली आहे. मात्र त्यानंतरही माजीमंत्री बबन घोलप यांचा शिवसेना प्रवेश आणि काँग्रेसच्या महिला नेत्या उत्कर्षा रुपवते यांची सुरुवातीपासूनची दावेदारी यामुळे काहीशी अनिश्चितता निर्माण झालेली असताना आता त्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनीही ‘पंजा’च प्रभावी असल्याचा दावा करीत थेट बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शिर्डीचा सस्पेन्स कमालीचा वाढला असून लोखंडे विरुद्ध वाकचौरे की अन्य कोणी अशा चर्चांनाही आता उधाण आले आहे.
मागील तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून संयुक्त शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील उत्कंठा काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. भाजपाने प्रत्येक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यातील सर्व 48 जागांवरील उमेदवारांची लोकप्रियता पडताळणारा सर्व्हे करुनच उमेदवार निश्चित करण्याचे धोरण आखले आहे. या सर्व्हेत शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नावाला विरोध असल्याचा अहवालही प्राप्त झाला. त्यावरुन भाजपने त्यांना उमेदवारी देण्यास सुरुवातीपासूनच विरोध केला. मात्र ज्यांनी ‘साथ’ दिली त्यांची साथ सोडण्याची मानसिकता नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा विरोध डावलून शिवसेनेच्या पहिल्याच यादीत त्यांची उमेदवारी घोषित करुन धक्का दिला. तर, महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे दोन महिन्यांपूर्वीच उबाठा गटात सामील झालेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावाची घोषणा केली.
भाजपचा दबाव आणि कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे महायुतीकडून शिवसेनेचे बबन घोलप व मनसेचे बाळा नांदगावकर यांचीही नावे चर्चेत आली. अशाही स्थितीत लोखंडे यांनी आपली उमेदवारी राखण्यात यश मिळवले. मात्र गेल्या तीन पंचवार्षिक पासून शिर्डीवर दावा सांगणार्या माजीमंत्री बबन घोलप यांच्या शिवसेना प्रवेशाने मात्र त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. घोलप यांनी संगमनेरात येवून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी केलेली चर्चा आणि त्यानंतर शिर्डीसाठी आपण इच्छुक असल्याचा केलेला नवा दावा महायुतीमधील संभ्रमात भर घालणारा ठरला आहे. अर्थात घोलप यांना गेली 15 वर्ष ज्या कारणाने ताटकळावे लागले, तो खटला अद्यापही न्यायप्रविष्ट असून त्याचा निकाल लागलेला नाही आणि त्यांचे सुपूत्र माजी आमदार योगेश घोलप यांनीही अद्याप उबाठाचा हात सोडलेला नाही. त्यामुळे शिर्डीची अनिश्चितता अधिक ठळक झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी असलेली जवळीक लोखंडेंना फायद्याची ठरली असली तरीही त्यांनी मतदार संघात ठराविक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हाताशी धरुन वाढवलेल्या गटबाजीने कार्यकर्त्यांमधील निरुत्साह मात्र आजही कायम आहे. त्यातच शिर्डी मतदार संघात बौद्ध समाजाची लोकसंख्या अडीच लाखांपेक्षा अधिक असतानाही गेल्या तीन निवडणुकांमध्ये समाजाला डावलले गेल्याची भावना मनात घेवून रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीत असूनही लोखंडेंच्या प्रचारापासून अंतर ठेवले आहे. त्यामुळे सुरुवातीला महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचे पारडे काहीसे जड वाटत होते. मात्र दिवंगत नेते प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या, काँग्रेसच्या महिला नेत्या उत्कर्षा यांनी नवीन चेहर्यांना संधी देण्याची मागणी लावून धरताना त्यांच्या नावाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यातच त्यांनी मुंबईतील राजगृहावर जावून वंचित आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतल्याने महाविकास आघाडीतील चलबिचल वाढली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या अधिसूचनेला अवघ्या आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी ‘महाविकास आघाडीचा उमेदवार जनतेच्या मनातील नाही’ असा जोरदार हल्लाबोल करीत ‘शिर्डीत ठाकरेंच्या उमेदवारापेक्षा काँग्रेसचा पंजाच प्रभावी ठरेल’ असे मत थेट काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडेच व्यक्त केल्याने लोखंडे यांच्याप्रमाणेच भाऊसाहेब वाकचौरे यांनाही आघाडीतंर्गत विरोधाचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यातही काँग्रेसच्या कोपरगाव अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी वाघमारेंना डावलल्यास पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील अशी घोषणा करुन गांभीर्य वाढवल्याने महायुती बरोबरच महाविकास आघाडीतही सगळं काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन निवडणूक महिन्यावर येवूनही शिर्डीतील संभ्रम मात्र आजही कायम असल्याचेच चित्र दिसत आहे.
अंतर्गत नकारात्मक अहवाल आणि कार्यकर्त्यांचा विरोध यामुळे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे अडचणीत असताना आता त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचीही साथ मिळाली आहे. उत्कर्षा रुपवते यांनी महाविकास आघाडीने नवीन चेहर्यांना संधी द्यावी अशी जोरकस मागणी करुन वाकचौरेंच्या नावाला विरोध केला असताना आता काँग्रेसच्याच अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनीही विरोधाच्या कुंडात उडी घेतली आहे. त्यांच्याच मर्जीने कोपरगावच्या तालुकाध्यक्षांनी वाघमारेंना डावलले गेल्यास सामुहिक राजीनामे देण्याचे वक्तव्य केल्याने वाघमारे दबावतंत्रानंतर बंडखोरीच्या वाटेवर जाण्याची दाट शक्यता आहे.