उमेदवाराच्या सुरुची भोजनातच उफाळली गटबाजी शिवसेना उबाठा गटातील प्रकार; माजी खासदारांची वाट बिकट..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रामदास आठवलेंसारख्या दिग्गज नेत्याचा दारुण पराभव करीत लोकसभेत पोहोचलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेस, भाजप आणि अपक्ष असा प्रवास करीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या उबाठा गटात प्रवेश करुन उमेदवारी पदरात पाडून घेतली. मात्र निवडणुकीपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या सुरुची भोजनाच्या कार्यक्रमातच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे चित्र मंगळवारी सायंकाळी रायतवाडी फाट्यावर बघायला मिळाले. माजी पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यामध्ये रंगलेल्या या वादाने उबाठा गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून वेळीच ती शमवली गेली नाही तर त्याचा पक्षाला मोठा फटका बसण्याचीही शक्यता आहे.
वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात चर्चेत आलेल्या शिर्डीची जागा आपल्याकडेच राखण्यात उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश मिळाले. त्यामुळे साहजिकच शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्याच यादीत शिर्डीचे उमेदवार म्हणून 2009 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांचा दारुण पराभव करीत लोकसभेत पोहोचलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अर्थात त्या निवडणुकीनंतर वाकचौरे यांनी 2014 साली आश्चर्यकारकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पराभवही पदरी पाडून घेतला आणि नंतर भाजपकडून श्रीरामपूर विधानसभा लढवून 2019 साली अपक्ष लोकसभाही लढवली. मात्र प्रत्येकवेळी त्यांना निराशेचाच सामना करावा लागला.
गेल्या दीड वर्षांपूर्वी राज्यातील राजकीय नाट्यात शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेच्या उबाठा गटात प्रवेश करुन शिर्डीच्या उमेदवारीचा शब्द घेतला आणि गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा ‘आपला माणूस – आपल्यासाठी’ असे घोषवाक्य सोबत घेवून मतदार संघ पिंजायला सुरुवात केली. मात्र शिवसेनेचा त्याग करुन पुन्हा शिवसेनेत दाखल होण्याच्या त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, त्याची प्रचिती आता गावोगावी येत असून प्रचारापेक्षा शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी मिटवण्यातच त्यांचा वेळ खर्ची होत असल्याचे दिसत आहे.
असाच प्रकार मंगळवारी (ता.2) संगमनेरातही घडला. खुद्द भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील शिवसैनिकांना एक छताखाली बोलावून त्यांच्यासाठी सुरुची भोजनाचे आयोजन केले होते. त्यासाठी रायतेवाडी फाट्यावरील एका हॉटेलमध्ये खास शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाचाही बेत आखण्यात आला होता. मात्र भोजनापूर्वी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधीत असतानाच जमलेल्या शे-दीडशे शिवसैनिकांमधील धुसफूस शब्द आणि टोमण्यातून बाहेर पडू लागली. तेव्हाच या सुरुची भोजनात राडा होणार असल्याचे ‘संकेत’ मिळू लागले. एका शिवसैनिकाने तालुकाप्रमुख संजय फड यांच्या कारभाराकडे लक्ष वेधीत त्यांचे शरसंधान केले.
त्यामुळे उभारी मिळालेले सुकेवाडीचे ग्रामसदस्य संतोष कुटेही उभे राहीले आणि त्यांनी थेट पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आणि भ्रष्टाचाराचा संशय असल्याची सांगत नवा वाद निर्माण केला. पक्षाचे संपर्कप्रमुख व समन्वयक हजर असतानाच हा प्रकार सुरु झाल्याने भोजनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी माजी खासदार वाकचौरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहनही केले, मात्र त्यालाही कोणी प्रतिसाद देत नसल्याचे चित्र दिसले.
जवळपास दहा ते पंधरा मिनिटे चाललेल्या या नाट्यानंतर काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी मध्यस्थी करीत वाद मिटवल्यानंतर हॉटेलमध्ये सुरु असलेला गोंधळ थांबला. मात्र या प्रकाराने शिवसेनेच्या उबाठा गटातील गटबाजी उफाळून आल्याचे दिसल्याने जेवनावळी घालूनही वाकचौरेंना त्याचा किती फायदा होईल याच्याच चर्चा अधिक रंगल्याचे दिसून आले. त्यामुळे पक्ष फूटीनंतर शिवसेनेला गटबाजीच्या संकटानेही ग्रासल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून त्यामुळे शिवसेनेला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.