डिजिटल युगात काळ्या फलकाचे आकर्षण वाढवण्याचा प्रयत्न! माजी नगरसेवक धनंजय डाके यांचा उपक्रम; महात्मा फुले चौक ठेवला सतत चर्चेत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी शहरात घडणार्‍या विविध घटनांच्या माहितीचा स्त्रोत म्हणून चौकाचौकात असलेले काळे फलक (ब्लॅकबोर्ड) महत्त्वाची भूमिका बजवायचे. भूतकाळात डोकावून पाहताना अशोक चौक, फे्रंडस सर्कल, चंद्रशेखर चौक येथील अशा फलकांच्या स्मृती आजही संगमनेरकरांच्या मनात आहेत. गेल्या दशकभरात देशात झालेल्या डिजिटल क्रांतीने संगमनेरकरांना आपल्याकडे खेचणारे शहरातील असे असंख्य फलक आज नामशेष झाले आहेत. मात्र असे असतानाही संगमनेर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष धनंजय डाके यांच्या पाठबळातून हा उपक्रम आजही सुरू आहे.

पूर्वी चौकाचौकात असलेले काळे फलक शहरात घडणार्‍या विविध घटना आणि घडामोडी सांगणार्‍या संदेश वाहकाची भूमिका बजावित. त्यामुळे या फलकांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले होते. नव्वदच्या दशकांत शहराच्या मुख्य भागात असलेल्या अशोक चौकातील फलक तर संगमनेरकरांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले होते. लोकसभा अथवा विधानसभेसह त्याकाळात होणार्‍या विविध निवडणुकांची फेरीनिहाय धावती आकडेवारी या फलकावर प्रसिद्ध केली जात. त्याकाळी शहरात असलेली दूरचित्रवाहिन्यांची मर्यादीत संख्या आणि त्यातही वृत्त वाहिन्यांची कमतरता यामुळे निवडणूकीसारख्या नागरी उत्कंठतेच्या प्रसंगात हाच फलक ती शमविण्याचा प्रयत्न करीत असत.

याच कालावधीत मेनरोडवरील नढे भेळ सेंटरजवळ फ्रेंडस् सर्कल मंडळानेही नव्याने काळा फलक उभारुन त्यावर शहरात घडणार्‍या दैनंदिन घटनांसह थेट राज्य व देश पातळीवरील बातम्या लिहून संगमनेरकरांची माहितीची भूक भागवण्याचा उपक्रम सुरु केला. जवळपास दशकाहून अधिक काळ सुरू राहिलेल्या या उपक्रमाने शहरातील अनेकांना भूरळ घातली होती. अगदी दिवंगत उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी हे देखील दररोज सकाळी सातच्या सुमारास येथील फलकासमोर उभे राहून त्याचे वाचन करीत असतं, त्यावरील चांगल्या-वाईट वृत्ताबाबत मंडळाच्या पदाधिकार्‍यांशीही त्यांनी याकाळात अनेकदा संवाद साधला होता.

चंद्रशेखर चौकातील काळा फलकही याच धाटणीत बसणारा होता. अर्थात येथील फलकावर प्रसंगानुरुप विविध घटनांचे आजही चित्रण होते. या फलकाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर त्यावर विविध सणांबाबतची माहिती, शुभेच्छा आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे वाढदिवस, त्यांचे लिखाण लिहून ते वाचकांसाठी उपलब्ध केले जात. यासोबतच रंगारगल्ली, तट्ट्या मारुती (नेहरु चौक), महात्मा फुले चौकातील मारुती मंदिर, साईनाथ चौक, बाजारपेठ, उपनगरातील जनतानगर (जाणताराजा चौक) या ठिकाणीही अशाप्रकारचे काळे फलक होते. मात्र अशोक चौक, फे्रंडस् सर्कल व चंद्रशेखर चौक वगळता उर्वरीत फलकांचा वापर केवळ परिसरातील निधनवाता, अन्य कार्यक्रर्म अथवा शहरात आयोजित विविध उपक्रमांची जाहिरात करण्यासाठीच होत असत.

मात्र गेल्या दशकभरात जगभरात डिजिटल क्रांती झाली आणि त्याच्या वेगवान प्रवाहात गेली अनेक दशके संगमनेरकरांसाठी संदेशवाहक, माहितीचा स्त्रोत व प्रबोधनाचे केंद्र बनलेले हे काळे फलक हळूहळू कमी होत गेले आणि त्यांचे महत्त्वही संपुष्टात आले. आज प्रत्येक नागरिकाच्या हातात इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेला मोबाईल असल्याने मानसाला जग ठेंगणे झाले आहे. मात्र अशा स्थितीतही शहरातील महात्मा फुले चौकात असलेला काळा फलक आजही आपले महत्त्व टिकवून आहे. येथील फलकावर मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या घटना, वर्षभरातील विविध उत्सवाचे रंगीबिरंगी खडूने रेखाटलेले चित्र हातात अत्याधुनिक मोबाईल यंत्र असलेल्यांनाही क्षणभर उभे राहण्यास भाग पाडतो. संगमनेर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष धनंजय डाके यांच्या पुढाकारातून गेली अनेक वर्षे हा उपक्रम आजही सुरू असून या फलकाच्या वैविध्यतेने डिजिटल युगातही काळ्या फलकांचे महत्त्व कायम राखले आहे.


समाजाच्या शेवटच्या घटकांचा विचार करणारा नगरसेवक अशी ओळख असलेल्या धनंजय डाके यांनी गेल्या काही वर्षात या फलकाला नवसंजीवनी देण्यासह अकोले वेस तालिमीचाही जिर्णोद्धार केला. कधीकाळी शहरात अर्धा डझनहून अधिक असलेल्या तालिमही आधुनिक जीमच्या समोर तग धरु शकल्या नाहीत, मात्र अशक्य ते शक्य करण्याचा सतत प्रयत्न करणार्‍या डाकेंनी शेकडो पहिलवान घडवणार्‍या आणि काही पिढ्यांना सदृढ बनविणार्‍या अकोले वेस तालिमीचा कायापालट करुन ती पुन्हा सुरु करण्याची किमया साधली. आजच्या स्थितीत तेथे दररोज सुमारे पन्नास तरुणांना लालमातीत शड्डू ठोकतांना पाहून संक्रमणाचा हा कालावधी पाहणार्‍यांना हायसे झाल्याशिवाय राहत नाही.

Visits: 22 Today: 1 Total: 118034

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *