संगमनेरातील अंमलीपदार्थ तस्करांना शहर पोलिसांचे पाठबळ! तरुणाई ‘गर्दा’च्या सापळ्यात; महिनाभरापूर्वी केवळ पंटरवरच झाली होती कारवाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलीस ठाणे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असे समजून गेल्या काही वर्षापासून शहरात दाखल होणारे काही पोलीस अधिकारी वाट्टेल त्या मार्गाने तुंबड्या भरीत आहेत. या प्रकारातून शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडण्यासह अंमली पदार्थांच्या मुक्त व्यापाराने देशाचे भविष्य समजली जाणारी तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. मात्र पोलिसांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे वेळोवेळी स्पष्टही झाले आहे. असाच प्रकार सोमवारी सायंकाळीही समोर आला असून स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या ‘इनपूट’वरुन झालेल्या कारवाईत अतिशय घातक समजला जाणारा ‘गर्दा’ (हेरॉईन) हस्तगत करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे याच तस्करावर अवघ्या महिनाभरापूर्वीच शहर पोलिसांनी छापा घातला होता. मात्र त्यावेळी छापा घालणार्या अधिकार्याने परस्पर तडजोडीने मुख्य आरोपीला रान मोकळे करुन देत त्याच्या पंटरवर गुन्हा दाखल करण्याची किमया साधली होती. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच ‘त्या’ पंटरने लक्ष्मीनगरमध्ये कोयत्याने वार करुन एकाचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. यावरुन संगमनेरातील गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला शहर पोलिसांचे अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याचे स्पष्ट होत असून पालक, पुढारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
संगमनेर शहरातील हायप्रोफाईल परिसर समजल्या जाणार्या शिवाजीनगर भागातील वैदूवाडी झोपडपट्टीत सोमवारी (ता.1) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई झाली. शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वस्तीत तरुण पिढीला बर्बाद करणारा ‘गर्दा’ (हेरॉईन) विक्री होत असल्याची माहिती संगमनेरपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी संगमनेरात धडक देत शहर पोलिसांच्या मदतीने छापा घातला. यावेळी वैदूवाडीत राहणार्या अंमली पदार्थांचा मोठा तस्कर अंबदास शांताराम शिंदे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला असता त्यांना एका पांढर्या रंगाच्या गोणीत साडेचार किलो वजनाचा गांजा आढळून आला.
त्यानंतर पोलीस पथकाने अधिक कसून तपासणी केली असता त्यांना मानवी शरीरावर भयंकर परिणाम करणारा व अंमली पदार्थांमध्ये अतिशय घातक समजला जाणारा ‘गर्दा’ही (हेरॉईन) आढळून आला. यावेळी अंमली पदार्थाच्या व्यवसायातून जमा झालेली 4 लाख 150 रुपयांची रोख रक्कमही पोलिसांच्या हाती लागली आणि केवळ अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक होते म्हणून मुख्य आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिराने गुन्हे शाखेचे हवालदार सचिन आडबळ यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गर्दा तस्कर अंबादास शांताराम शिंदे (वय 43, रा.शिवाजीनगर) याच्याविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणार्या पदार्थांना प्रतिबंध करणार्या कायद्याचे कलम 8 (क), 20 (ब) ॥, 21 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले.
वास्तविक सुमारे महिनाभरापूर्वी 29 फेब्रुवारी रोजीच शहर पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाच्या पथकाने याच तस्कराच्या घरावर छापा घातला होता. त्यावेळच्या कारवाईत पोलिसांना त्याच्या घरातून 980 ग्रॅम वजनाचा केवळ गांजा आढळून आला. हा परिसर अतिशय गजबजलेल्या मानवी वस्तीचा असल्याने पोलिसांची वाहने वैदूवस्तीत शिरताच बघ्यांची मोठी गर्दीही झाली होती. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणे भाग पडल्याने त्यावेळी मुख्य तस्कराला गुन्ह्यातून वगळून त्याने हजर केलेल्या गोट्या उर्फ प्रशांत पोपट घेगडमल (वय 26, रा.मूळ हिवरगाव पावसा, हल्ली मु.कासारवाडी) या पंटरवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आणि नंतर त्याची जामीनावरही सुटका झाली. त्यावेळी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने मुख्य आरोपीशी तडजोड करुन त्याच्या ऐवजी पंटरवर गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चाही रंगली होती, मात्र ‘हमाम मे सब नंगे’ या म्हणीप्रमाणे शहर पोलीस ठाण्यातील कोणत्याही वरीष्ठ अधिकार्याने त्यामागील सत्याचा शोध घेतला नाही.
या घटनेनंतर अवघ्या 10 दिवसांनी 12 मार्चरोजी पहाटेच्या सुमारास याच पंटरने आपल्या अन्य दहा साथीदारांसह लक्ष्मीनगरमध्ये हुसैन बाबामियाँ शेख या एकोणावीस वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही करण्यात आली व मुख्य आरोपी गोट्या उर्फ प्रशांत पोपट घेगडमल याला अटकही करण्यात आली होती. त्यावरुन शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीसह वाढत्या गुन्हेगारीला शहर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी पाठबळ देत असल्याचे स्पष्टपणे समोर आले असून देशाचे भविष्य समजल्या जाणार्या तरुणपिढीला अंमलीपदार्थांच्या आहारी नेण्यात प्रमुख भूमिका बजावणार्या अशा अधिकार्यांच्या संपत्तीसह त्यांची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. पालक, पुढारी आणि वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून तरुणांचे आयुष्य बर्बाद करणार्या अशा प्रकारच्या व्यवसायांना खणत्या लावण्याची गरज आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ‘वासरात लंगडी गाय’ समजला जाणारा ‘हा’ अधिकारी कोणत्याही प्रकरणात फक्त तडजोडीच करीत असल्याचे आरोप यापूर्वीही अनेकदा झाले आहेत. मात्र त्यानंतरही विविध ठिकाणी कारवाया करण्यासाठी त्यालाच पाठविले जात असल्याने व अशा प्रकरणांचे तपासही त्याच्याकडेच दिले जात असल्याने एकंदरीत त्याच्या या कृत्याला स्थानिक वरीष्ठ अधिकार्यांचे तर समर्थन नाही ना? अशाही चर्चा आता शिवाजीनगरच्या गर्दा कारवाईने उसळण्यास सुरुवात झाली आहे.