छत्रपतींच्या जयंतीला संगमनेर पोलिसांचा गनिमी कावा! शिवसेनेचे सगळे गट एकाच मिरवणुकीत; तरुणाईची अलोट गर्दी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्ताने गुरुवारी संगमनेरात अभूतपूर्व घटना घडली. गेल्या चार दशकांपासून तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंती उत्सवाच्या मुख्य मिरवणुकीवर स्थानिक शिवसेनेचा वरचष्मा बघायला मिळत असे. यंदा राज्यातील राजकीय घडामोडींची काळवंडलेली छटा या उत्सवावरही दिसत असताना संगमनेर पोलिसांनीच केलेल्या गनिमी काव्याने मात्र शहरातील जुन्या व नव्या शिवसैनिकांना एकाच मिरवणुकीत सहभागी होण्यास भाग पाडले. शिवसेनेच्या दोन्ही गटांसह सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मंडळाने दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देताना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एकच मिरवणूक काढण्याची अट घातली. त्यापुढे या सर्वांचाच नाईलाज झाल्याने गुरुवारी संगमनेरात अभूतपूर्व प्रसंग पाहायला मिळाला. या संयुक्त मिरवणुकीत प्रत्येक गटाने आपली स्वतंत्र चुल मांडल्याचेही चित्र दिसले, त्याचा तरुणाईच्या उत्साहावर कोणताही परिणाम मात्र झाला नाही.

गेल्या दीड-दोन वर्षात राज्यातील राजकारणात मोठे उलटफेर झाले आहेत. संयुक्त शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. तर, ठाकरेंना शिवसेनेसोबत आपले नाव जोडण्याची वेळ आली. दरम्यानच्या कालावधीत आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांचीही दोन गटात विभागणी झाली. शिंदेंच्या गटाने संयुक्त शिवसेनेसोबत काडीमोड केलेल्या भाजपशी पुन्हा संसार थाटला, तर उबाठा गटाने महाविकास आघाडीचे सूत्र बांधून भाजपसमोरच आव्हान निर्माण केले. यासर्वांचा परिपाक गेल्या अनेक दशकांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या जयंतीवरही दिसून आला.


संगमनेरात 1985 सालापासून संयुक्त शिवसेनेच्यावतीने शिवजयंतीच्या (तीथीनुसार) मुख्य मिरवणूक काढली जाते. यंदा मात्र राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद संगमनेरातही उमटल्याने या मिरवणुकीबाबत काहीशी साशंकता निर्माण झाली होती. त्यातच मिरवणुकीची परवानगी मागण्यासाठी शिवसेनेच्या उबाठा आणि शिंदे या दोन्ही गटांसह सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मंडळानेही अर्ज दाखल केला होता. त्यामुळे यावर्षीच्या मिरवणुकीची परवानगी कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्कंठा ताणली गेली होती. पोलिसांकडूनही अगदी उत्सवाच्या पूर्वसंध्येपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल वाढली होती.


अखेर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी छत्रपतींच्या जयंतीला त्यांच्याच गनिमी काव्याचा आधार घेत मिरवणुकीची परवानगी मागणार्‍या तिघांही अर्जदारांना खिंडीत गाठून सगळ्यांनाच परवानगी देण्याचा मनोदय बोलून दाखवला. त्यामुळे प्रत्येकालाच हायसे वाटू लागले असतानाच त्यांनी परवानगी मिळणार मात्र स्वतंत्रपणे कोणालाही देता येणार नाही असे सांगत परवानगीचे गांभीर्यही वाढवले. आचारसंहिता लागू असल्याने राजकीय दबाव निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. त्यामुळे या सर्वांना पोलिसांच्या दिशादर्शनाचाच अवलंब करण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहीला होता.


त्याबाबत निर्णय घेताना पोलिसांनी ठाकरे मंडळाला आघाडीला, शिंदे गटाला मध्यात तर ठाकरे गटाला शेवटी जागा ठरवून दिली. प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे बँडबाजा वाजवावा किंवा डिजे त्यावर कोणतीही बंधने घातली गेली नाहीत. त्यामुळे तिन्ही गटांनी पारंपरिक वाद्यांसह तरुणाईचे आकर्षण असलेले डिजे व ऑर्केस्ट्राही मिरवुणकीत आणले. त्यामुळे सहभागी झालेल्या शेकडों तरुणांना नाचण्यासाठी वेगवेगळ्या वाद्यांचे जणू पर्यायच उपलब्ध झाले. त्याचा परिणाम भल्यामोठ्या स्वरुपात निघालेल्या या मिरवणुकीत तरुणाई बेधुंद होवून नाचताना दिसली. विशेष म्हणजे शिवसेनेतील बहुतेक सगळ्याच गटांचा सहभाग असतानाही एकही अनुचित घटना घडली नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या वेळेचेही उल्लंघन झाले नाही. त्यामुळे गुरुवारची मिरवणूक संगमनेरकरांसाठी अभूतपूर्व ठरली.


पालिका प्रांगणापासून सायंकाळी सुरु झालेल्या या मिरवणुकीचा समारोप रात्री दहाच्या आंत होईल का याबाबत सुरुवातीपासूनच साशंकता होती. मात्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तिन्ही गटांशी समन्वय साधून मिरवणूक चालती ठेवल्याने प्रत्येक गटाच्या शेकडों अनुयायांचा सहभाग असतानाही मिरवणुकीची वेळेत सांगता झाली. विशेष म्हणजे संपूर्ण मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडल्याचेही समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी रचलेला गनिमी कावा तुफान यशस्वी ठरल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळाली.

Visits: 160 Today: 1 Total: 1110713

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *