आमदार सत्यजीत तांबेंनी शपथ घेताच केली कामाला सुरुवात पहिल्याच दिवशी जुनी पेन्शनसह शाळांना अनुदान देण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजीत तांबे यांनी बुधवारी (ता.8) विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली असून पहिल्याच दिवशी कामाचा धडाका सुरू केला आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षण मंत्र्यांची वेळ मागताना विनाअनुदानित शिक्षकांना शाळा तपासणीची अट न ठेवता तातडीने अनुदान द्यावे. यांसह विविध मागण्यांचे पत्र देऊन कामाला सुरुवात केली आहे.
मुंबई येथे विधान परिषदेत सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विविध मागण्यांचे पत्र दिले आहे. गेली बावीस वर्षे समाजकारण आणि राजकारणात अत्यंत सक्रीय व युवकांमध्ये लोकप्रिय असलेले धडाकेबाज नेतृत्व म्हणून सत्यजीत तांबे यांची राज्यभरात ओळख आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्ताने मोठी चर्चा झाली असून या निवडणुकीतही आमदार तांबे यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील अभ्यासपूर्ण मुद्द्यांची सर्वत्र चर्चा झाली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ हा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. डॉ. तांबे यांनी मागील तेरा वर्षे सातत्याने 54 तालुक्यांत संपर्क ठेवून अत्यंत लोकाभिमुख कामे केली आहे. याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील कायम शब्द वगळण्याबरोबरच शिक्षण सेवक मानधन वाढ, अनुदान अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यामुळे या निवडणुकीत टीडीएफ, शिक्षकभारतीसह 105 विविध संघटनांनी सत्यजीत तांबे यांना निवडणुकीत पाठिंबा दिला होता. या धडाकेबाज कामाच्या पद्धतीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील विविध शिक्षक, शिक्षकेतर, शासकीय, अशासकीय कर्मचारी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.