सायखिंडी शिवारात खासगी बस उलटली; पाच जखमी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिककडून पुण्याकडे प्रवासी वाहतूक करणारी खासगी आरामबस चालकाचे नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. शुक्रवारी (ता.3) सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या अपघातात वाहनाचा क्लिनर व चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी नाशिककडून पुण्याकडे जाणारी व खासगी आरामबस (क्र.एमएच.04, जीपी.7865) हॉटेल कृष्णा गार्डनपासून 200 मीटर पुढे अंतरावर चालक शिवदास भिकाजी आव्हाड यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात बसमधील क्लिनर शंकर त्र्यंबक श्रीराम व इतर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना टोलनाक रुग्णवाहिकेने संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करण्यासाठी पाठवले आहे. या घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह डोळासणे महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, उमेश गव्हाणे, नंदकुमार बर्डे, योगीराज सोनवणे, अरविंद गिरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत के्रनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाहेर काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.