पोपेरेवाडी येथील शाळेला मिळाले अग्निपंखचे बळ ‘पद्मश्रींना सलाम’ उपक्रमांतर्गत केला शाळेचा कायापालट

नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील अग्निपंख फाऊंडेशनने पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांना सलाम करण्यासाठी पोपेरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण शाळा आता सर्व आधुनिक सुविधांनी परिपूर्ण झाली आहे. यामध्ये सौर ऊर्जेवर डिजिटल शाळा, सुंदर आणि बोलक्या भिंती, एलसीडी टीव्ही, शालेय एज्युकेशन सॉफ्टवेअर्स, वृक्ष लागवड, खेळाचे साहित्य यांचा समावेश आहे. ही बदललेली शाळा बघून विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य उमललेले दिसले.

या शाळेचे उद्घाटन नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते करण्यात झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यशाचे शिखर सर करणारा प्रशांत डगळे याच्या आईवडीलांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहीबाई पोपेरे होत्या.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले, की अग्निपंख फाऊंडेशनने दुर्गम भागातील अहमदनगर जिल्हा परिषदेची पोपेरेवाडी शाळा डिजिटल करुन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना सलाम केला आहे. सामाजिक जाणीवेतून केलेले हे काम इतर संस्थांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श घेऊन काम केले इतरही प्राथमिक शाळांचा चेहरामोहरा बदलेल. मधुकर रहाणे म्हणाले, की भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने काम करत असलेल्या अग्निपंख फाऊंडेशनचे उपक्रम मी अडीच वर्षांपासून पाहत आहे हे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अग्निपंखच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.

पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या, माझा अनेकांनी मान-सन्मान केला. अग्निपंख फाऊंडेशनने आदिवासी कुंटुबांतील लेकरांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी पोपेरेवाडीची शाळा डिजिटल केली अशा सन्मानाची खरी गरज आहे. प्रास्ताविक दिलीप काटे यांनी केले. यावेळीफाऊंडेनशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे, नागवडे साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल जंगले, गटविकास अधिकारी आर. के. शेळके, प्रभारी गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, भाऊ कासार, भास्कर कानवडे, नवनाथ दरेकर, रासदास ठाकर, राजकुमार इथापे, आरिफ शेख, गोपाळ डांगे, संजय लाकुडझोडे, बी. बी. गोरे, किसन वर्हाडे, अमोल गव्हाणे, शुभांगी लगड, मधुकर काळाणे, गणेश कवीटकर, सरपंच शांताबाई पोपेरे, योगेश नवले, विवेक दातीर, दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र पोटे यांनी केले तर आभार पोपेरेवाडी शाळेचे शिक्षक विष्णू भांगरे यांनी मानले.
