संगमनेरकरांच्या ग्रामदैवत मंदिराला मिळणार नवी झळाळी! साडेसदतीस लाखांचा भरीव निधी; पालकमंत्री राधाकृष्ण विखे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातीतील मोठ्या मारुतीच्या ऐतिहासिक मंदिराच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी देण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संगमनेरातील एका कार्यक्रमात घोषणा केली. येथील मारुती मंदिराला मोठा इतिहास आहे, महिलांच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या या मंदिराचे नूतनीकरण व्हावे व त्यासोबतच लगतच्या श्रीराम मंदिराचाही जिर्णोद्धार व्हावा यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून ३७ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संगमनेरच्या ग्रामदैवताच्या या ऐतिहासिक मंदिराला आता नवी झळाळी मिळणार आहे.

संगमनेर तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मोठे मारुती मंदीर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराची मूळ बांधणी अतिशय जुन्या काळातील असून हनुमान जयंती उत्सवालाही मोठी पराक्रमी परंपरा आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघणारा रथोत्सव ही या देवस्थानाची विशेष ओळख संपूर्ण राज्यात असल्याने या मंदीराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदीराच्या विश्वस्त समितीला दिली होती. मंदीराच्या सभागृहाचा प्रस्ताव जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडे आराखड्यासह प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. त्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली असून, मंत्री विखे यांनी सभागृहाच्या कामासाठी ३७ लाख ४९ हजार रुपयांच्या निधी मंजूर केला.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून मंदीराचे सभागृह विकासित होणार आहे. यासाठी ८५ टक्के म्हणजे ३१ लाख ८६ हजार आणि नगर पालिकेचा १५ टक्के हिस्सा ५ लाख ६२ हजार अशाप्रकारे निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वारसास्थळ असलेल्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.

Visits: 257 Today: 3 Total: 1102268
