शेतकर्यांचा पुन्हा एल्गार; 1 जूनपासून धरणे आंदोलनाचा इशारा पुणतांबा येथील विशेष ग्रामसभेत विविध मागण्यांचे 16 ठराव मंजूर
नायक वृत्तसेवा, राहाता
शेतकर्यांच्या प्रश्नांवर सोमवारी (ता.23) पुणतांबा येथे विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत शेतकर्यांच्या विविध मागण्यांचे 16 ठराव मंजूर करण्यात आले असून सरकारने या मागण्यांची पूर्तता न केल्यास 1 जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पूर्वी प्रथमच जेव्हा आम्ही शेतकर्यांचा संप पुकारला त्यावेळी आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. पण त्यातून आम्ही शिकत गेलो. आता याच अनुभवाच्या जोरावर यावेळचे आंदोलन पुढे नेणार आहोत. सर्व पक्षांचे लोक आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. मात्र, त्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून किसान क्रांती या बॅनरखाली एकत्र यायचे आहे. आंदोलन राज्यातील सर्व शेतकर्यांचे असेल पुणतांबा हे त्याचे केंद्र असेल. सर्वांना सोबत घेऊन आम्ही आंदोलन पुढे नेणार आहोत, असा निर्धार पुणतांब्याच्या ग्रामस्थांनी केला आहे.
सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा झाली. त्यामध्ये शेतकर्यांच्या प्रश्नांवर 16 ठराव करून ते सरकारला पाठविण्यात आले आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर 1 ते 5 जून या काळात गावात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यासंबंधी माहिती देताना डॉ. धनवटे म्हणाले की, मागील वेळी काही चुका झाल्या असतीलही. सर्वच संघटनांना गट असतात तसे शेतकरी संघटनांमध्येही आहेत. हे आंदोलन केवळ पुणतांब्यापुरते नाही. राज्यातील सर्व शेतकर्यांसाठी आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघटनांशी चर्चा करणार आहोत. ज्या संघटना सोबत येतील त्यांच्यासह आंदोलन केले जाईल. हे आंदोलन पक्षविरहित असणार आहे. मागील आंदोलनातून आम्ही अनेक अनुभव घेतले. आता आमच्याकडे अनुभव आणि डेटाही आहे. त्याचा वापर केला जाईल. यापूर्वी झालेल्या आंदोलनापेक्षा यावेळचे आंदोलन अधिक तीव्र आणि परिणामकारक असेल. 2017, 2019 पेक्षाही यावेळचे आंदोलन नक्कीच मोठे होईल. अलीकडेच दिल्लीजवळ शेतकरी आंदोलन झाले त्यांनी आपल्याच आंदोलनातून प्रेरणा घेतल्याचेही धनवटे यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीतील आंदोलन जसे संयुक्त किसान मोर्चा या बॅनरखाली झाले तसे राज्यातील हे आंदोलन किसान क्रांती या बॅनरखाली होणार आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसेल. कोणीही राजकीय नेता याचे नेतृत्व करणार नाही. मात्र, सत्ताधारी असो की विरोधी राजकीय पक्ष आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. सोबत येताना त्यांनी पक्ष बाजूला ठेवून किसान क्रांती म्हणून एकत्र यायचे आहे. अशा पद्धतीने हे आंदोलन होणार असून उद्या पदाधिकार्यांची बैठक होणार आहे, असेही डॉ. धनवटे यांनी सांगितले.