राहुरी पोलिसांच्या विरोधात जनतेचा आंदोलन करत रोष


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात व परिसरात झालेल्या गुन्ह्यांचा तपास लागावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या विरोधात बुधवारी (ता.10) आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या विरोधात उपस्थित सर्वांनीच आपला मोठा रोष व्यक्त केला.

राहुरी फॅक्टरी परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येथील विविध संघटना व्यापारी नागरिक यांच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे यांना निवेदन देऊन दहा दिवसांमध्ये या गुन्ह्यांचा तपास न लागल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी 10 वाजता नगर-मनमाड महामार्गावर डॉ.आंबेडकर चौकामध्ये परिसरातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी आदी मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र, प्रशासनाच्या विनंतीवरून रास्ता रोको न करता रस्त्याच्या कडेला या सर्व नागरिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी रोष व्यक्त करत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांना येणार्‍या समस्या व त्याकडे पोलिसांचे असणारे दुर्लक्ष याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला. या गुन्हेगारीचा तातडीने बंदोबस्त व्हावा, अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. सामान्य नागरिक या वाढत्या गुन्हेगारीला वैतागलेले आहेत. या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत. तसेच देवळाली प्रवरा पोलीस ठाणे व्हावे यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज असून परिसरातील अवैध धंदे लवकरच बंद करणार आहोत, असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 114908

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *