भोजापूर चारीच्या पाण्यावरुन ‘आजी-माजी’ आमदारांचे एकमेकांवर आसूड! ‘चाळीस’वर्ष पाऊसच नव्हता का? : आ.खताळ; ‘तुम्हाला’ चारी माहिती होती का? : माजीमंत्री थोरात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यंदा सुरुवातीच्या पावसातच भोजापूर जलाशय तुडूंब झाल्याने लाभक्षेत्रातील पारंपरिक दुष्काळी भागात समाधानाचे वातावरण आहे. अशातच या जलाशयाच्या ओव्हरफ्लोतून यंदा पहिल्यांदाच तिगांव माथ्यापर्यंत पाणी पोहोचल्याने त्यावरुन राजकारणही तापले आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलपूजनातून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधल्यानंतर त्यांनीही पलटवार करीत मंत्री विखे यांच्यासह संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना लक्ष्य केले असून भोजापूरच्या चारीसाठी विखे-पाटलांचे योगदान काय असा सवाल करीत नव्या आमदारांना ‘चारी कोठे आहे याची तरी माहिती आहे का?’ अशी खोचक टीका केली होती. त्याला आता आमदार खताळ यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले असून ‘चाळीस वर्षात पाऊसच झाला नव्हता का?’ असा खडा सवाल उपस्थित करतानाच खोटी आश्वासनं आणि लोकभावनांशी खेळ केल्यानेच जनतेने तुम्हाला जागा दाखवल्याचा राजकीय प्रहार केला आहे. त्यातून भोजापूरच्या पूरचारीतून समृद्धीचा स्वर घेवून धावणारे पाणी पेटले असून एकमेकांवरील राजकीय आसूडांनी संगमनेरचे राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.

रविवारी (ता.3) राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तिगांव माथ्यावरील भोजापूरच्या पूरचारीतून वाहणार्या पाण्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री विखे यांच्यासह आमदार खताळ यांनी चाळीस वर्ष या भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याचा मुद्दा समोर करुन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शरसंधान साधले. यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी रखडलेल्या चारीच्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेल्याचा उल्लेख करीत जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत झालेल्या या चारीच्या विस्तारीकरणासाठी 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव असल्याची माहितीही दिली होती. या चारीचा समावेश दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पातंर्गत करण्यात आल्याने 33 हजार हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलपूजन कार्यक्रमानंतर काही वेळातच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ‘भोजापूर चारीच्या कामात मंत्री विखे-पाटील यांचे योगदान काय?’ असा सवाल उपस्थित करीत या चारीचा संपूर्ण इतिहास मांडला. दुष्काळीभागाला पाणी मिळावे या भावनेतून आपण निळवंडे
धरणासह कालव्यांची कामे पूर्ण केली. कालव्यांच्या वरच्या भागांनाही पाणी मिळावे यासाठी आपण आजही प्रयत्नरत आहोत असे सांगत त्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून, संगमनेर कारखान्याच्या मदतीने भोजपूर चारीचे काम झाल्याचे नूमद केले. या चारीतून दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आपण सातत्याने काम केले. यावर्षी मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि चांगला पाऊस यामुळे यंदा चारीतून पाणी वाहील्याचा आनंद आहे, मात्र या चारीत तुमचे योगदान काय? असा सवाल माजीमंत्री थोरात यांनी जलसंपदामंत्री विखे-पाटील यांचे थेट नाव घेवून उपस्थित केला.

निमोण, नान्नज दुमाला परिसराला पाणी मिळावे यासाठी 1977 मध्ये संगमनेर व प्रवरा कारखान्याने संयुक्तपणे खर्च करुन चारी करण्याचे ठरले होते. मात्र प्रवरा कारखान्याने त्यातून अंग काढून घेतल्याचा आरोपही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला. 1994 साली सहकारमहर्षी थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर कारखान्याने खर्च करुन ही पूरचारी तयार केली. 1996 साली वाटमाईच्या डोंगराजवळ चारीचे पाणी आले. पुढे तिगांव माथ्यापर्यंत चारीचे
पाणी नेता यावे यासाठी 2006 साली श्रमदानातून तिगांवपर्यंत चारीचे काम करण्यात आले. त्याचवर्षी तिगांवला चारीतून आलेल्या पाण्याचे जलपूजन केल्याचा उल्लेखही माजीमंत्री थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे. जलसंधारण मंत्रालय आपल्याकडे असताना 2008 मध्ये चारीची दुरुस्ती, सेतू, काँक्रीटची कामे व लांबीसाठी पाच कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून दरवर्षी निमोण, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगाव बु., तळेगाव, तिगांव व वडझरीपर्यंतच्या गावांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचा दाखलाही जोडण्यात आला आहे.

2021 मध्ये चारीच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी 18 लाखांचा निधी मंजूर झाला. अनेकवेळा जलाशय भरल्यामुळे पिंपळे, पारेगाव बु., चिंचोली गुरव व देवकौठ्यापर्यंत पाणी गेले. यासर्व गोष्टी जनतेला चांगल्या माहिती असल्याची पुष्टीही माजीमंत्र्यांनी जोडली. आपणही गेली अनेक वर्ष विविध मंत्रीपदं भूषविली आहेत, असे विखेंचे नाव न घेता यापूर्वी भोजापूरच्या चारीसाठी तुम्ही कोणते योगदान दिले?, या कामामध्ये आपला एकतरी खडा आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे थेट नाव न घेता नव्या आमदारांना भोजपूरची चारी तरी माहिती आहे का? असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. खोट्या भूलथापा आणि सोशल माध्यमातून चुकीचा अपप्रचार केला जात असल्याची टीकाही माजीमंत्री थोरात यांनी यावेळी केली.

यावर्षी निसर्गाची मोठी कृपा झाली, मे आणि जून महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने भोजापूर धरण लवकर भरले आणि कारखान्याच्या माध्यमातून तयार असलेल्या चारीतून पाणी वाहीले याचा मनस्वी आनंद आहे. ही चारी काय मागील आठ महिन्यात तयार झाली का? असा सवाल करीत त्यांनी आमदार खताळ यांच्या योगदानावरही प्रश्न उपस्थित केले. यावेळी माजीमंत्री थोरात यांनी भोजापूर चारीसाठी सातत्याचा पाठपुरावा, सर्वांना पाणी मिळावे हा आपला आग्रह असून कितीही भूलथापा दिल्यात तरीही त्याला लवकरच योग्य उत्तर देवू असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.

माजीमंत्री थोरात यांनी भोजापूर चारीवरुन केलेल्या टीकेचा समाचार घेताना आमदार अमोल खताळ यांनीही प्रसिद्धीपत्रक जारी करीत ‘भोजापूर चारी आणि पाण्याच्या मुद्द्यावरुन माजी आमदार बाळासाहेब थोरात यांची टीका म्हणजे अस्तित्व टीकवण्यासाठी केविलवाणी धडपड’ अशा कठोर शब्दात
राजकीय आसूड ओढताना पलटवार केला. ज्यांना 40 वर्ष सत्तेत असताना तळेगाव, निमोण आणि पठारभागातील जनतेला पाणी देता आले नाही, त्यांना महायुती सरकारने आठ महिन्यात भोजापूर चारीसाठी केलेल्या कामावर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी ठणकावले. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दुष्काळी भागातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवून त्यांच्या भावनांशी खेळ केल्यानेच लोकांनी घरी बसवल्याचा घणाघात करीत त्यांनी ‘आपल्या चुकांचे आत्मचिंतन करा’ असा खोचक सल्लाही माजीमंत्र्यांना दिला.

आमदार म्हणून जनतेने दिलेली जबाबदारी स्वीकारुन आठ महिने जरी झाले असले तरी या कालावधीत भोजापूरच्या पूरचारीसह तालुक्याच्या विकासकामांसाठी पाठपुरावा केल्याने आज तालुक्यातील विकासकामांना कधीनव्हे ती गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. निसर्गाने साथ दिल्याने आणि यंदा चांगला पाऊस झाल्याने जर भोजापूरच्या पूरचारीला पाणी आले असेल तर गेल्या चाळीस वर्षांच्या तुमच्या कारकीर्दीत भोजापूरच्या पाणलोटात चांगला पाऊसच झाला नव्हता का? असा खोचक सवालही आमदार खताळ यांनी विचारला आहे. संगमनेर कारखान्याने केलेले चारीचे काम केवळ फार्स होता हे आता लपून राहिलेले नसून माजी आमदारांनी फसवलेल्या दुष्काळी भागातील लोकांना यामागील सत्य समजले पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.

स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी दुष्काळी भागातील जनतेला तहानलेले ठेवून त्यांचे शोषण आणि मतांचे राजकारण हाच तुमचा चाळीस वर्षांचा राजकीय अजेंडा होता. नुसत्या चार्या खोदून पाणी येत नसते, त्यासाठी योग्य नियोजन आणि राजकीय इच्छाशक्तिची गरज असते, जी तुमच्याकडे नाहीच अशी उपरोधीक टीकाही आमदार खताळ यांनी केली. तुमच्याकडून आजवर झालेली चार्यांची कामे म्हणजे ठेकेदारांची पोटं भरण्याचा उद्योग
होता अशी घणाघाती कोटी करताना त्यांनी जरा आसपास आपल्याबाबत लोकं काय विचार करताहेत, लोकं सोडा तुमच्या आसपासचे कार्यकर्तेही काय विचार करतात याचा कानोसा घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्यावरुन आता भोजापूर चारीचे पाणी चांगलेच तापले असून त्यावरुन एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे.

