संगमनेरात ‘जोर्वेनाक्या’ची पुनरावृत्ती..! मोठ्या जमावाकडून तिघांना बेदम मारहाण; संगमनेरात पुन्हा तणावाची परिस्थिती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
क्रमांक नसलेल्या पीक-अप जीपने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन कोल्हेवाडीतील एकाला जमावाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हे वाडीतील एक तरुण आपल्या दोन लहान मुलींसह दुचाकीवरुन संगमनेरकडे येत असताना हा प्रकार घडला. या कोवळ्या जीवांसमोरच मोठ्या जमावाकडून त्यांच्या पित्याला मारहाण होत असल्याचे पाहून त्यांनी एकच आक्रोश केला, मात्र जमावाच्या हृदयाला पीळ बसला नाही. या तरुणाच्या मदतीला धावलेल्या तिघा-चौघांनाही जमावाने सोडले नाही. या घटनेत तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर कोल्हेवाडीसह संगमनेर शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यातच वरिष्ठ पोलीस अधिकारी मासिक बैठकीसाठी मुख्यालयात गेले असल्याने इतक्या गंभीर घटनेनंतरही पोलीस ठाण्यात केवळ महिला पोलिसांचीच उपस्थिती आढळून आली, मात्र दुसऱ्या बाजूचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा होवूनही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता. 12) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रस्त्यावर घडली. राहुल सोपान गुंजाळ (वय 38, रा. कोल्हेवाडी) हा तरुण आपल्या दुचाकीवरुन त्याच्या दोन लहान मुलींसह संगमनेरच्या दिशेने येत होता. यावेळी विरुद्ध बाजूने कोल्हेवाडीकडे जाणाऱ्या एका विना क्रमांकाच्या पिक-अप वाहनाचा कट बसल्याने दुचाकीस्वार गडबडला. त्यामुळे त्याने गाडी व्यवस्थित का चालवत नाही? असा जाब विचारला व तो पुढे निघून गेला. मात्र कट मारुनही शिरजोर झालेल्या पिक-अप चालकाने त्याच्याशी हुज्जत घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. काही वेळातच मोठा जमाव गोळा होवून त्याची दंडेलशाही सुरु झाली. या घटनेतून अवघ्या वर्षभरातच जोर्वेनाका प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचेही दिसून आले.

सुमारे शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने एकट्या तरुणाला, त्याच्या तीन व चार वर्ष वयाच्या लहान मुलींसमोरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण झाली. या मारहाणीत नंतर सहभागी झालेल्या बहुतेकांना आपण का मारीत आहोत याचीही कल्पना नव्हती. मात्र केवळ मनात द्वेष असल्यागत येणारा प्रत्येकजण आपला हात साफ करुन घेत होता. या संपूर्ण घटनाक्रमात परिसरातील काही ज्येष्ठांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र मारहाण करणाऱ्या तरुणांनी त्यांना जुमानले नाही. या गदारोळात जीवाच्या आकांताने सैरभैर पळणाऱ्या त्या तरुणाने काहीजणांना फोन करुन मदतीसाठी बोलावले. काही वेळातच कोल्हेवाडीतील तिघे-चौघे धावतही आले. मात्र जमावाने त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार त्या मुरड्या मुलीं समोर घडत असल्याने आपल्या बापाला मोठ्या जमावाकडून होत असलेली मारहाण पाहून त्या मोठमोठ्याने रडत होत्या. मात्र जमावातील कोणालाही त्यांची दया आली नाही. परिसरातीलच एका नागरिकाने त्या दोघींनाही त्यांच्या दुचाकी जवळ हात धरुन ठेवले होते. त्यानंतर काहीजणांच्या मध्यस्थीने त्या तरुणाची जमावाच्या तावडीतून सुटका झाली.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून जखमी झालेल्या राहुल सोपान गुंजाळ (वय 38), संदीप सोमनाथ गुंजाळ (वय 38) व अमोल संजय गुंजाळ (वय 32, सर्व रा. कोल्हेवाडी) या तिघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर संगमनेर शहरात तणाव निर्माण झाला असून पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला आहे.

Visits: 324 Today: 4 Total: 1102770
