शेजार्याकडून जंगलात नेवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग! संगमनेरातील प्रकार; विनयभंगासह ‘पोक्सो’तंर्गत आरोपी झाला गजाआड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
घुलेवाडीत आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या एका 13 वर्षीय मुलीला बस स्थानकावर सोडण्याचा बहाणा करुन शेजार्यानेच तिचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत आरोपीने पीडितेला घुलेवाडीतून थेट तळेगाव परिसरातील जंगलात नेवून महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सदरचा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली व नंतर पीडितेला पुन्हा घुलेवाडीत आणून सोडले. बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारी रात्री उशिराने पीडितेची आई संगमनेरात आल्यावर शहर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करीत आरोपी स्वामी रमेश तामचीकर याला अटक केली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची धक्कादायक घटना बुधवारी (ता.28) दुपारी पावणे चारच्या सुमारास तळेगाव दिघे परिसरातील जंगलात घडल्याचे दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मूळच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात राहणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी घुलेवाडीत राहणार्या आपल्या नातेवाईकांकडे आली होती. तर, तिचे पालक कामानिमित्त मूळगावीच होते. घटनेच्या दिवशी दुपारी पीडित मुलीने परिसरातच राहणार्या स्वामी रमेश तामचीकर याला त्याच्या दुचाकीवरुन संगमनेर बसस्थानकावर सोडता का? अशी विचारणा केली. त्याला होकार देत आरोपीने लागलीच आपल्या दुचाकीवर पीडितेला बसवले.
मात्र घुलेवाडीतून संगमनेरकडे येण्याऐवजी त्याने आपली दुचाकी तळेगाव दिघेकडे जाणार्या रस्त्याने घेत पीडितेला तळेगाव परिसरातील निर्जन असलेल्या जंगली भागात नेले. तेथे जाताच अंगात वासनेचा सैतान जागलेल्या तामचीकरने त्या लहानशा मुलीकडे घाणेरडा कटाक्ष टाकून महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने त्याला तसे करण्यास मज्जाव केला असता आरोपीने तिला जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली. सायंकाळी त्याने पीडितेला पुन्हा घुलेवाडीत तिच्या नातेवाईकांकडे आणून सोडले, त्यावेळी त्याने घडल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची पुन्हा धमकी भरली.
घाबरलेल्या पीडितेने फोनवरुन आपल्या आईला आपबीती सांगितल्यानंतर शुक्रवारी (ता.1) सायंकाळी त्या निफाडहून संगमनेरात आल्या. त्यानंतर रात्री उशिराने आपल्या 13 वर्षीय पीडित मुलीसह त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी स्वामी रमेश तामचीकर (वय 22, रा.घुलेवाडी) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 354, 354 (अ), 504, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. आज त्याला न्यालयासमोर उभे करुन त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील माळी करीत आहेत.