संगमनेरातील कॅफे सेंटर बिघडवणार शहराचे सामाजिक स्वास्थ्य? ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाला नवे वळण; पोलिसांनी सामाजिक भावनेतून कारवाई करण्याची अपेक्षा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील मालदाड रोड परिसरातील एका कॅफे सेंटरमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या संशयावरुन घडलेल्या मारहाण प्रकारानंतर आता या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात ज्या मुलीवरुन एकाला बेदम मारहाण करण्यात आली, त्याच मुलीच्या वडिलांनी आता शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या मफाज मतीनखान पठाण याच्यासह त्याच्या एका अनोळखी साथीदारावर बळजबरीने अपहरण आणि विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मोठ्या कालावधीनंतर संगमनेरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र असे असतानाही वारंवार शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्यास कारणीभूत ठरत असलेल्या आणि गेल्या काही कालावधीपासून विद्यार्थीदशेतील मुला-मुलींसाठी ‘अश्लील कृत्य’ करण्याची राजरोस ठिकाणं ठरत असलेल्या शहरातील असंख्य ‘कॅफे शॉपकडे’ पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. भविष्यात शहराची सामाजिक शांतता खराब करण्याची सर्वाधीक शक्यता असलेल्या या केंद्रांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणीही या निमित्ताने पुन्हा समोर आली आहे.
गेल्या शनिवारी (ता.25) मालदाड रोडवरील डी. ई. लाईट कॅफे या गोंडस नावाच्या ‘कॉफी शॉप’मध्ये दोन तरुण एका तरुणीसोबत गप्पा मारत बसले असतांना त्या कॉफी शॉप बाहेर काही तरुण जमले. हा प्रकार पाहून कॉफी शॉप चालकाने मफाज मतीनखान पठाण याला मोबाईलवरुन फोन करीत तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यानुसार पठाण आणि त्याचा जोडीदार सचिनकुमार महंतो दोघेही कॉफी शॉपमधून बाहेर आले असता, बाहेर जमा झालेल्या पाच-सहा जणांच्या जमावाने त्यांना ओळख विचारुन आपल्या दुचाकीवर बळजोरीने बसवून सुकेवाडी-खांजापूर परिसरात नेत तेथे बेदम मारहाण केली. यावेळी मारहाण करणार्या जमावाने ‘हिंदू मुलींची छेड काढतोस का?, त्यांना घेवून कॉफी शॉपमध्ये बसतोस का?’ असे म्हणत मफाज पठाण याला कंबरेचा पट्टा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली.
अर्धमेल्या अवस्थेत त्याला शहरानजीक आणून सोडल्यानंतर त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने रुग्णालय गाठले. सदरच्या प्रकाराबाबत गावात चर्चा सुरु झाल्यानंतर नवीन नगर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयासमोर मोठा जमाव गोळा झाला. त्यामुळे शहराचे वातावरण तणावपूर्ण बनले. मात्र पोलिसांनी जमावाची मानसिकता ओळखून तातडीने कारवाईला सुरुवात केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणात जखमी पठाण याच्या जवाबावरुन दरोडा, अपहरण, धमकी दिल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यातील करण संपत गलांडे (वय 21, रा.अभंगमळा), सोहम शेखर नेवासकर (वय 22, रा.गणेशनगर), ओंकार राजेंद्र जोर्वेकर (वय 19, रा.अकोले नाका), विश्वास सीताराम मोहरीकर (वय 21, रा.नेहरु चौक), संकेत बाबासाहेब सोनवणे (वय 21), अजीत अंकुश भरते (वय 24, दोघेही रा.कुंभार आळा), निशांत नंदू अरगडे (वय 21, रा.अरगडे गल्ली) व विक्रम खडकसिंग लोहार (वय 22, रा.घुलेवाडी) या आठ जणांना रविवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. रविवारी न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले. तर रविवारी दुपारी या संपूर्ण प्रकरणात नव्याने ट्विस्ट आले आणि ज्या मुलीच्या कारणावरुन हा सगळा प्रकार घडला, त्या मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात हजर होत फिर्याद दाखल केली.
त्यानुसार मफाज मतीनखान पठाण (वय 19, रा.कोल्हेवाडी रोड) हा फिर्यादीच्या मुलीचे कॉलेज सुटल्यानंतर तिचा पाठलाग करीत व तिच्या मोबाईलवर फोन करुन अश्लिल भाषेत बोलून तिला मानसिक त्रास देत होता. घटनेच्या दिवशी शनिवारी (ता.25) आरोपीने त्याच्या अज्ञात साथीदारासह मालदाड रोडवरील डी. ई. लाईट कॅफे येथून बळजबरीने तिला मोटारसायकलवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यावरुन पोलिसांनी मफाज मतीनखान पठाण व त्याच्या अज्ञात साथीदारावर विनयभंगाच्या कलमासह अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अथवा त्याच्या साथीदाराला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
‘लव्ह जिहाद’च्या संशयावरुन घडलेल्या या संपूर्ण प्रकरणात आता मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार ‘लव्ह जिहादचाच’ असल्याचेही समोर येवू लागले आहे. असे प्रकार घडण्याचे हमखास ठिकाणं म्हणून या घटनेतही एका कॉफी शॉपचे नाव समोर आले आहे. असा प्रकार घडणार आहे याची पूर्वकल्पना आल्याने संबंधीत कॉफी शॉप चालकाने आरोपी मफाज पठाण याला मोबाईल फोन करुन पूर्वसूचनाही दिली होती. त्यावरुन सदरचा तरुण वारंवार ‘त्या’ कॅफे हाऊसमध्ये येत असावा असाही संशय आहे. त्यातूनच आसपासच्या दुसर्या समाजातील तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि शनिवारचा प्रकार घडला. या दरम्यान जमावातील काहींनी पठाण याला बळजोरीने काही गोष्टी करण्यास भाग पाडले, त्यामुळे आधी रुग्णालय व नंतर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. मात्र पोलिसांनी तत्पर भूमिका घेतल्याने तो निवळालाही.
गेल्या काही वर्षात संगमनेर शहराच्या विविध भागासह शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात ‘कॅफे’ अथवा ‘कॉफी शॉप’ अशा गोंडस नावाने अश्लील चाळ्यांची असंख्य केंद्र उभी राहिली आहेत. यातील बहुतेक ठिकाणी आतील भागात जोडप्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कप्पे केलेले आहेत. एकदा या कप्प्यात जोडपे गेले की दोन-चार तास ते बाहेर पडत नाहीत. त्यावरुन या कप्प्यांमध्ये काय चालत असेल याची कल्पना येते. विद्यार्थी दशेतील मुला-मुलींना भरकटवण्यात आघाडीवर असलेल्या या अनैतिक केंद्रांमध्ये स्वतंत्र कप्पे हा हेतूच त्यामागील अनैतिकता सिद्ध करतो, त्यामुळे पोलिसांनी ‘कप्पे’ असलेली अशी सर्व ठिकाणं नेस्तनाबूत करण्याची गरज आहे. अकोले पोलिसांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे, संगमनेर पोलीस सामाजिक भावनेतून त्याकडे कधी पाहतील आणि आपले दायित्त्व पूर्ण करतील याकडे आता संगमनेरातील असंख्य पालकांचे लक्ष लागले आहे.
मध्यंतरीच्या काळात पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी शहर व उपनगरातील विविध ठिकाणी असलेल्या अशा अश्लील केंद्रांवर धाडी घालून दोन डझन जोडप्यांना हुडकले होते. यातील अनेकजण नको त्या अवस्थेतही आढळून आले होते. या कारवाईत पोलिसांनी अशा ठिकाणी उभारलेले स्वतंत्र कप्पे उध्वस्त करीत पुन्हा ते निर्माण केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला होता. पण, अधिकारी गेले आणि परिस्थिती पूर्ववत झाली. त्यामुळे विद्यमान पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकारांकडे गांभीर्याने पाहून पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत आणि त्यातून शहराचे सामाजिक स्वास्थ वेठीस धरले जाणार नाही यासाठी ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.