नगरच्या गुन्हे शाखेचा शहरातील जुगार अड्डड्यावर मोठा छापा! शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरु असलेल्या अड्ड्यावर 23 जुगार्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून इंदिरानगर परिसरातील जय जवान चौकात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने घातलेल्या छाप्यात शहरातील नामचीन व्यक्तिंसह तब्बल 4 लाख 83 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी शहरातील 23 जणांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले होते. या वृत्ताने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी इतका मोठा जुगार अड्डा सुरु असूनही शहर पोलिसांना त्यांची भणक न लगल्याने आश्चर्य आणि संशयही व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक शंकर चौधरी यांना संगमनेर शहरातील जय जवान चौकात असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या बाजूला रविंद्र देवराम म्हस्के व गोविंद दासरी हे दोघे जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार चौधरी यांच्यासह गुन्हे शाखेच्या पो.ना.चव्हाण, पो.कॉ.साळुंखे आदींनी रात्री दिडच्या सुमारास तेथे छापा घातला.

यावेळी तेथील एका बियरबारच्या जवळील निर्माणाधीन इमारतीच्या आडोशाला मोठ्या संख्येने तीन वेगवेगळ्या वर्तुळात माणसं बसल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला दिसून आले. सदर इसम जुगार खेळत असल्याची खात्री पटल्यानंतर पथकातील कर्मचार्यांनी त्यांना जागीच बसण्याच्या सूचना देत झाडाझडती घेतली असता तेथे हजर असलेले इसम तीन वेगवेगळे रिंगण करुन तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळत असल्याचे स्पष्ट झाले.

त्यातील पहिल्या रिंगणात निखिल अशोक शहा (वय 29, रा.मालदाड रोड), राजेंद्र संताजी कानवडे (वय 25, रा.निमगाव पागा), सुनील केशव धात्रक (वय 39, रा.मालदाड रोड), गणेश बारकू धामणे (वय 32, रा.इंदिरानगर), विजय एकनाथ अरगडे (वय 39, रा.मालदाड रोड), दशरथ शिवराम भुजबळ (वय 48, रा.इंदिरानगर), प्रतिक संजय कांबळे (वय 19, रा.इंदिरानगर) व ओमकार सुनील गोडसे (वय 19, रा.भरीतकर मळा) आदी आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता सदरचा जुगार अड्डा रविंद्र देवराम म्हस्के (रा.मालदाड रोड) व गोविंद दासरी (रा.कामगार वसाहत) या दोघांच्या मालकीचा असल्याचे समोर आले.

त्या सर्वांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे पत्ते, 1 लाख 25 हजार रुपये मूल्याच्या तीन मोटर सायकल क्र.एम.एच.17/सी.जे.1216, क्र.एम.एच.17/बी.ए.9969 व क्र.एम.एच.17/1919 सह 55 हजार रुपयांचे पाच मोबाईल व 17 हजार 110 रुपये रोख रक्कम मिळून आली. दुसर्या रिंगणात शुभम दत्तात्रय काळे (वय 25, रा.मेनरोड), प्रकाश जाते (वय 25, रा.गणेशनगर), नवनाथ रेवनाथ हडवळे (वय 24, रा.गुंजाळ आखाडा), शिवम विजय कोकणे (वय 28, रा.मालदाड रोड), संदीप विजय शिंदे (वय 25, रा.गणेशनगर), अनिल बबन गायकवाड (वय 29, रा.शिवाजीनगर) व निलेश अशोक काळे (वय 30, रा.कोल्हेवाडी रोड) जुगार खेळतांना आढळले. त्यांच्याकडून 1 लाख एकोणतीस हजार रुपये किंमतीचे सहा मोबाईल, 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.17/बी.टी.5424) व 13 हजार 720 रुपये रोख असा एकुण 1 लाख 92 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तर याच ठिकाणी तिसरे रिंगण करुन जुगार खेळणार्या गौरव कैलास जेधे (वय 27, रा.जेधे कॉलनी), अमजद दाऊद सय्यद (वय 40, रा.सय्यदबाबा चौक), राहुल लक्ष्मण हांडे (वय 22, रा.शिवाजीनगर), शुभम गोरख रहाणे (वय 23, रा.गुंजाळवाडी), अजहर अन्सार खान (वय 32, रा.सय्यदबाबा चौक) व सुरेश अंबादास पगारे (वय 54, रा.घुलेवाडी) आदींना ताब्यात घेत त्यांची झडती घेण्यात आली. त्यात 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, 75 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी व 11 हजार 750 रुपये रोख असा एकुण 96 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला.
या ठिकाणी सुरु असणार्या तीनही ठिकाणांहुन गुन्हे शाखेच्या पथकाने 1 लाख 94 हजार रुपये किंमतीचे 13 मोबाईल संच, दोन लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाकी व रोख रक्कम असा एकुण 4 लाख 83 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पो.ना.सचिन आडबल यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन वरील 23 जणांवर मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांमध्ये हडकंप माजला आहे.
![]()
या कारवाईतून गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात ‘सब कुछ अलबेल’ असल्याचे अभासी चित्र फाडून वास्तवतेचे दर्शन घडवले आहे. शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून अगदी गजबजलेल्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा सुरु असतांनाही शहर पोलिसांना त्याची भणक लागू नये याबाबत शहरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

