पक्षाला ‘घोडा’ लावणारेच ‘निष्ठा’ सांगत आहेत : मंत्री विखे पाटील म्हाळुंगी पुलाचा भूमीपूजन सोहळा; राजकीय कोपरखळ्यांनी उपस्थितांमध्ये हशा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सरकार म्हणून काम करताना सामान्य माणसांचे हित डोळ्यासमोर ठेवावे लागते. म्हणूनच केंद्र आणि राज्यातील सरकारने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. मात्र काहींचे कोणतेही योगदान नसताना केवळ श्रेय लाटण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. जनतेच्या पैशांची लुट सुरु असताना आपण बघ्याची भूमिका घेवू शकत नाही. त्यामुळे म्हाळुंगीचा पूल खचलाच कसा याची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. मात्र त्यासाठी पुलाचे बांधकाम थांबणार नाही याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले आहे. आपल्याला सरकारच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची संधी मिळाली आहे. ज्यांना काही न करता त्याचे श्रेय घ्यायचे असेल त्यांनी जरुर घ्यावे असा उपरोधीक टोला लगावत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता संगमनेरचे लोकप्रतिनिधी, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर तोफ डागली.

गेल्या दीड वर्षांपासून खचलेल्या अवस्थेत असलेल्या साईनगर पुलाच्या भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, भाजपा शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सरचिटणीस जावेद जहागिरदार, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष अमोल खताळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश काळे, बाजीराव दराडे व रेखा गलांडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना महसूलमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, कोणतेही योगदान नसलेल्या काहींनी केंद्र सरकारच्या कोविड लसिकरणावरही आपले फलक लावून श्रेय लाटण्याची धडपड केली. कोट्यावधी गोरगरीबांना आनंद देणारा ‘आनंदाचा शिधा’ देण्याची योजना राज्य सरकारने सुरु केली. यांनी कधीही गोरगरीबांचा विचार केला का? असा सवाल करीत विखे यांनी ज्यांना शिधा गोळा करायची सवय असते, त्यांच्याकडून वाटपाची अपेक्षा कशी करता येईल अशी कोपरखळीही हाणली.

म्हाळुंगी नदीच्या पुलाशी आपले भावनीक नाते असल्याचे सांगत त्यांनी खचलेल्या पुलाचा शुभारंभ दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी केल्याची आठवणही करुन दिली. नशिबाने दुसर्यांदा आपल्याला ही संधी मिळाली असून काही नाकर्त्या लोकांच्या कर्तृत्वाचा हा परिणाम असल्याची जहरी टीकाही त्यांनी केली केली. कामात खोडा घालणारी अनेक माणसं असतात. ज्यांना गल्लीतही कोणी विचारीत नाहीत ते सोशल माध्यमात दिशादर्शन करीत असल्याचा दाखला देत त्यांनी स्वतःला ‘नेते’ म्हणवून घेणार्यांनी म्हाळुंगी पुलाचे काम मार्गी लावण्याची गरज असताना ते काम आपल्या हातून होत असल्याची राजकीय कडीही जोडली.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे सांगताना त्यांनी लवकरच संगमनेर बसस्थानकासमोर शिवरायांचे भव्य स्मारक होणार असल्याची घोषणा केली. इतक्या वर्षांनंतरही या ऐतिहासिक शहरात शिवस्मारक उभारता येवू नये याबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. कोणीतरी आपणास फलकांची छायाचित्रे पाठवल्याचे सांगत ‘त्या’ फलकांवरुन सोनीया व राहुल गांधी यांची छायाचित्रे ‘गायब’ झाल्याचा उल्लेख करीत त्यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शरसंधान साधले. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत हे समजायला मार्ग नसला तरीही आमच्याकडे ‘हाऊस फुल्ल’ झाल्याचे सांगत त्यांनी कथीत पक्षांतराच्या चर्चेवरुन थोरातांची खिल्लीही उडवली.

काहीजण आमच्यावर पक्ष बदलल्याची टीका करतात, पण आम्ही जे केले ते ‘डंके की चोटपर’ असे म्हणतं त्यांनी 1985 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे दाखलेही दिले. ज्यांनी एकाच पक्षात असताना खासदार विखेंच्या विरोधात कम्युनिस्टांचे काम केले, पक्षाशी बंडखोरी करुन पक्षालाच ‘घोडा’ लावला, नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष लढले तेच आता निष्ठेच्या गप्पा मारीत असल्याचे सांगत त्यांनी जोरदार हल्ला चढवला. तुमच्या अपक्ष उमेदवाराला आम्ही निवडून आणल्याचे सांगताना मंत्री विखे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात असतांना तुमचे हात बांधलेले होते, मात्र तोंड उघडे असूनही त्यावेळी आपली बांधिलकी महाविकास आघाडीशी असून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचे एकदा तरी वक्तव्य केले का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संगमनेर तालुक्यात आज 60 टँकर सुरु असल्याचा दाखला देत इतक्या वर्षात ज्यांना लोकांना प्यायला पाणीही देता आले ते राज्याने ‘संगमनेर पॅटर्न’ राबवावा असे सांगत असल्याची टीकाही विखेंनी केली. संगमनेरातील सगळ्याच क्षेत्रात माफियागिरी वाढली असून टँकर, वाळु, क्रशर, मुरुम, भू माफियांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे टीकास्त्र सोडताना या सगळ्यांना उध्वस्थ केल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचेही मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले. संगमनेर तालुक्याला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शहरात कवी अनंत फंदींचे सुंदर स्मारक आणि त्या अनुषंगाने विकास कामे व्हावीत. तसेच, शाहीर विठ्ठल उमप यांच्या चिकणी गावातही त्यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

संगमनेरच्या सहकारी औद्योगिक वसाहतीत तोच चेअरमन आणि तोच व्हा.चेअरमनचा खेळ सुरु असून यांनी इतक्या वर्षात संगमनेरात कोणते उद्योग आणले असा सवाल करतांना यांच्या बाकीच्या उद्योगातूनच यांना सवड मिळत नसल्याने ते कोठून उद्योग आणणार अशी कोपरखळीही त्यांनी लगावली. विकास कामांसाठी निधीची चिंता करु नका, फक्त चांगल्या माणसांना निवडून द्या असे आवाहन करताना त्यांनी शिर्डीसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींसाठी आपण सोळाशे एकर जमिन दिल्याचे सांगितले. नगरमध्ये रोजगार मेळावा घेतला, ज्यात सहाशे कंपन्यांचा सहभाग असल्याचा दाखल देत त्यातून 15 हजार तरुणांना रोजगार मिळाल्याचे ते म्हणाले. यापुढील मेळाव्याच्या पूर्वी संगमनेरच्या तहसील व प्रांत कचेरीच्या बाहेर व बसस्थानकावर फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री विखेंनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळाचा उल्लेख करुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवरही जोरदार हल्ला चढवला. आघाडीच्या अडीच वर्षात राज्यातील माणसं हवालदिल झाली होती. कोविडचे जीवघेणे संकट उभे असताना राज्याचे मुख्यमंत्री ‘बिळात’ जावून बसल्याची जहरी टीका करताना त्यांनी फक्त ‘माझे कुटुंब, तुमची जबाबदारी’ इतकीच घोषणा केल्याचे ते म्हणाले. आघाडीतील अन्य मंत्र्यांनीही कोणतीच कामे केली नाही, त्यामुळे राज्यातील जनता सरकारने वार्यावर सोडल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय बुडाले, माणसं हवालदिल झालेली पाहुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवण्याचा जगातील पहिला निर्णय घेतला. त्यावेळच्या स्थितीनुसार घेतलेला हा निर्णय आता 2029 पर्यंत कायम राहणार असून देशातील गोरगरीबांना दोनवेळचे अन्न मिळाले पाहिजे या विचाराचे सर्वात मोठे उदाहरण पंतप्रधान मोदींनी उभे केल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या अनुषंगाने कृती समितीच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र सकाळच्या सत्रात प्रशासनाने बळाचा वापर करुन आंदोलनासाठी उभारलेला मांडव आणि फलक हटवले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भूमीपूजन सोहळ्याला विरोध नसल्याचेही वारंवार सांगितले. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करीत आपली कारवाई पूर्ण केली. सायंकाळी कार्यक्रमाच्यावेळी गोंधळ घातला जाण्याची शक्यता गृहीत धरुन पोलिसांनी आंदोलनकर्त्या चौघांना जागेवरच ताब्यात घेत महिला पोलिसांच्या गराड्यात बसवून ठेवल्याचेही चित्र यावेळी बघायला मिळाले.

