तंटामुक्तीचा उपाध्यक्षच करतोय पठारभागात गो-तस्करी! आंबी खालसामधील प्रकार; ग्रामस्थांनीच पोलिसांकरवी केला पर्दाफाश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलिसांच्या कारवायांची भीती आणि त्यातच गायींच्या संवर्धनाबाबत होत असलेली जागृती यामुळे संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यांकडे होणारा जनावरांचा पुरवठा आटला आहे. अशा स्थितीत गो-तस्करीला महत्त्व मिळू लागले असून समाजात प्रतिष्ठेचे समजले जाणारे पद भूषविणारेही आता या व्यवसायात हात धुवून घ्यायला लागले आहेत. असाच धक्कायदायक प्रकार पठारभागातून समोर आला आहे. मंगळवारी आंबी खालसाच्या ग्रामस्थांनी एका पीकअप वाहनातून गोवंशाची चोरटी वाहतूक करणार्या एकाला रंगेहात पकडून दिले. धक्कादायक म्हणजे यावेळी समोर आलेला गोतस्कर दुसरा-तिसरा कोणी नसून त्याच गावच्या तंटामुक्तीचा उपाध्यक्ष हसन सय्यद असल्याचे समोर आले. त्याच्या तावडीतून एका गायीसह चार वासरांची सुटका करण्यात आली. घारगाव पोलिसांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.20) दुपारी एकच्या सुमारास आंबी खालसा शिवारातील आंबी फाटा – कोठे रस्त्यावर समोर आला. आंबी खालसा गावच्या तंटामुक्ती समितीचा उपाध्यक्ष असलेल्या हसन ईस्माईल सय्यद याच्या घराच्या दारात उभ्या असलेल्या पीकअपमधून (क्र.एम.एच.14/ई.एम.6658) कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक होणार असल्याची माहिती काही तरुणांनी घारगाव पोलिसांना कळवली. त्यानुसार पोलिसांनी आंबी खालसात धडक देत थेट संशयीत वाहनाची तपासणी केली.
या कारवाईत पोलिसांना पाठीमागील बाजूस अत्यंत नीर्दयीपणे डांबून बांधलेल्या एका गायीसह चार वासरे आढळून आली. मात्र कारवाई पूर्वीच तंटामुक्तीचा उपाध्यक्ष ‘गायब’ झाला. पोलिसांनी संशयीत वाहन ताब्यात घेवून पोलीस काँन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी हसन सय्यद याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास सहाय्यक फौजदार ए.आर.गांधले यांच्याकडे सोपवला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेली चारही जनावरे गोशाळेत पाठवण्यात आली आहेत.
गावातील तंटे न्यायालयीन कक्षत येवून प्रदीर्घकाळ कायदेशीर लढायांमध्ये खर्च होणारा वेळ वाचावा व ग्रामपातळीवरील सौहार्द टिकून रहावा यासाठी राज्य शासनाने गावपातळीवर तंटामुक्ती समित्यांची रचना केली. या समित्यांच्या माध्यमातून लक्षणीय कामेही झाली आहेत. अशा समित्यांवर निवड होणार्या व्यक्ति गावातील, समाजातील प्रतिष्ठीत असायला हव्यात असा मानक आहे, मात्र तालुक्यातील तंटामुक्ती समिती असो अथवा शहरातील शांतता कमिटी दोन्हींची अवस्था सारखीच आहे. त्याचे दृष्य स्वरुप आंबीखालसामधील घटनेच्या माध्यमातून ठळकपणे समोर आले आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.