साहेब, आम्ही आपले योगदान विसरणार नाही! निमगाव-शिरापूर येथे जनतेकडून आमदार थोरातांप्रति कृतज्ञता


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण आणि डावा व उजवा कालवा पूर्ण करणारे आमदार बाळासाहेब थोरात हेच खरे जलनायक असून ज्यांनी अडचणी आणल्या ते आता सत्तेच्या जोरावर श्रेय घेऊ पाहत आहे. मात्र धरण आणि कालवे हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केले असून साहेब, आपले योगदान आम्ही कधीही विसरणार नाही असे म्हणत तमाम नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे गावोगावी जंगी स्वागत केले.

संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी व शिरापूर येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उजव्या कालव्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी जंगी मिरवणूक ग्रामस्थांनी काढली. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, रामदास वाघ, विलास कवडे, बापूसाहेब गिरी, कैलास पानसरे, मंदा वाघ, विजय रहाणे, बाळासाहेब रहाणे, रमेश वर्पे, नानासाहेब वर्पे, नंदकिशोर शिंदे, शैला पारासूर, योगेश पारासूर, सुशील पारासूर आदिंसह पंचक्रोशीतील विविध गावांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले, निळवंडे धरण आणि डावा आणि उजवा कालवा पूर्ण करून धरणाचे पाणी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शिवारात आल्याने केलेल्या कामाचे सार्थक झाले आहे. शेतकरी आनंदी होणे ही आपल्या जीवनातील सर्वात समाधानाची बाब आहे. संगमनेर तालुका हा विकासातून पुढे जातो आहे. येथील सहकार, शिक्षण, राजकारण, सर्वधर्म समभाव हा राज्याला आदर्शवत आहे. विकासकामांमध्ये आपण कधीही राजकारण केले नाही. जनतेची मोठी साथ कायम लाभली आहे. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून घेतले आहे. याकामी अकोले तालुक्यातील जनता व माजी मंत्री मधुकर पिचड यांचे मोठे सहकार्य लाभले. मात्र ज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही. उलट अडचणी निर्माण केल्या ते लोक आता सत्ता असल्यामुळे श्रेय घेऊ पाहत आहे. मात्र जनतेला काम कोणी केले हे माहित आहे. सध्याचे सरकार हे गोंधळलेले असून राज्यातील जनता त्रस्त आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असे सांगताना तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित राहावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी निमगाव टेंभी, शिरापूर, वाघापूर, खराडी या परिसरातील कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Visits: 148 Today: 2 Total: 1106205

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *