घारगावच्या ज्ञानमंदिरात विकृत प्रवृत्तींचा नंगानाच! अमरत्वप्राप्त ‘खेडकर’ खुर्चीतच; रात्रभर गॅसप्रवाह सुरु ठेवून घातपाताचाही प्रयत्न..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
चोर्या, दरोडे, खून, सर्व प्रकारचे अवैध धंदे, कायमस्वरुपी चोरट्यांचा धुमाकूळ आणि केवळ हप्तेखोरी अशा बिहारी वातावरणात ढकलल्या गेलेल्या पठारभागातून आता अत्यंत धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत चोरटे म्हणून ज्ञानमंदिरात शिरलेल्या विकृतांनी चक्क प्राथमिक वर्गात शिकणार्या बालगोपाळांच्या शालेय पोषण आहाराची नासधूस करुन संपूर्ण शाळेत अक्षरशः तेलाचा सडा मारला. इतक्यावरच न थांबता या समाजविघातक विकृतांनी मुलांच्या पोषणाची अंडी तळून मनसोक्त गिळली आणि त्यानंतर शेगड्या बाहेर फेकून देत रात्रभर सिलेंडरमधून होणारा गॅसचा प्रवाह सुरुच ठेवला, त्याचा आगीशी संपर्क झाला असता तर मोठा अनर्थही घडला असता. जाताजाता चोरट्यांनी संगणक शाळा फोडून त्यातील एलईडी टीव्हीचा संच, संगणकाचा मॉनिटर आणि सीपीयू खोलून त्यातील हार्ड डिस्क चोरुन नेली. या घटनेबाबत घारगाव पोलिसांना कळवूनही त्यांची उदासीनता समोर आल्याने घारगावचे ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून निष्क्रीय पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या बदलीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.
याबाबत घारगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज पहाटेच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडला. चोरटे म्हणून शाळेच्या आवारात शिरलेल्या अज्ञात इसमांनी सुरुवातीला शाळेतील मुलांसाठी पोषण आहार शिजवण्यासाठी वापरल्या जाणार्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मुलांच्या पोषण आहारासाठी असलेली अंडी तळून ढेर्या टमकेपर्यंत चोरट्यांनी ताव मारला. हरामाच्या अन्नावर पोसलेल्या या विकृतांनी जेथे खाल्लं, तेथेच *** आपली प्रवृत्ती दाखवताना, त्यानंतर पोषण आहाराचा तांदूळ, डाळ, अंडी व भाजीपाला अस्तव्यस्त करुन टाकला.
प्लॅस्टिकच्या एका क्रेटमध्ये तेलाच्या १७ पिशव्या सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील एका पिशवीत अंडी तळून खाल्ल्यानंतर या विकृतांनी उर्वरीत सोळा पिशव्या फोडून शाळेच्या भिंतीवर, वर्गात सर्वत्र, बाहेरच्या ओसरीत आणि संगणक प्रयोगशाळेचा दरवाजा तोडून तेथेही सर्वत्र तेलाचा सडा मारुन अन्नधान्य आणि भाजीपाल्याची नासधूस केली. या विकृतांनी केवळ एवढ्यावरच न थांबता पोषण आहार शिजवण्यासाठी वापरात असलेल्या शेगड्या बाहेर फेकून दिल्या, मात्र सिलेंडरमधून होणारा गॅसचा प्रवाह तसाच सुरु ठेवला. त्यामुळे ‘त्या’ खोलीसह लगतच्या वर्गखोल्यांमध्ये सर्वत्र गॅस पसरला होता.
एकंदरीत हा संपूर्ण प्रकार शाळेचे नुकसान करुन ज्ञानार्जनासाठी येणार्या छोट्या-छोट्या बालगोपाळांचा घातपात करण्याचा हेतू दर्शवणारा वाटत असला तरीही संभ्रम निर्माण करण्यासाठी चोरट्यांनी संगणक प्रयोग शाळेतून एक ५२ इंचाचा एलईडी टीव्ही संच, संगणकाचा मॉनिटर आणि संपूर्ण सीपीयू घेवून न जाता चातुर्याने त्यातील केवळ ‘हार्डडिस्क’ काढून घेत विकृत चोरट्यांनी तेथून पलायन केले. हा सगळा प्रकार आज (ता.१०) सकाळी साडेसहा वाजता शाळा उघडल्यानंतर लक्षात आला. या दरम्यान स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरमधून वायु गळती सुरुच होती. सुदैवाने त्याचा आगीशी संपर्क येण्यापूर्वीच सदरचा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळला.
मुलांच्या जीवाशी खेळण्याच्या या अतिशय गंभीर घटनेनंतर शाळेच्या शिक्षकांनी घारगाव पोलिसांना सकाळी सातच्या सुमारास माहिती दिली. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या घारगाव पोलिसांच्या अवघ्या एका कर्मचार्याला तेथपर्यंत जाण्यासाठी दोनतास लागले. या दरम्यान इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात शिकणार्या २०८ विद्यार्थ्यांनाही शाळेत घडलेला प्रकार, त्यावर शिक्षक व गावकर्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि त्या उपरांतही घारगाव पोलिसांची निष्क्रीय आणि मनमानी भूमिका यांचे थेट चित्र बघायला मिळाले. देशाचे भविष्य समजल्या जाणार्या या बालकांवर घारगाव पोलिसांनी उमटवलेली आपली निष्क्रीय प्रतिमा अतिशय परिणामकारक आणि दूरगामी ठरण्याची शक्यता आहे.
आज शाळा असल्याने मुलांना पोषण आहार देणे आवश्यक होते. त्यासाठी गावातील भारत हायस्कूलने पुढाकार घेत आपल्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा पोषण आहार शिजवून दिला. या घटनेबाबत ग्रामस्थांना माहिती मिळाल्यानंतर शाळेत गर्दी झाली. घारगाव पोलीस ठाण्यापासून अतिशय जवळ आणि लोकवस्तीत असलेल्या शाळेत अशाप्रकारची विकृत घटना संतापजनक असतानाही पोलिसांना त्याचे गांभीर्य न समजल्याने लोकांचा संताप उफाळून आला. यावेळी काही ज्येष्ठांनी निष्क्रीय पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या बदलीसाठी आंदोलनाचा इशारा दिला. तर, अनेकांनी त्यांच्या कारकिर्दीचा पाढाच वाचून दाखवला.
खरेतर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांच्याविषयी रोष आहे. अगदी गावातील जत्रायात्रांच्या आयोजकांनाही नागवण्याच्या त्यांच्या आश्चर्यजनक भूमिकेनेही त्यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र तालुक्यातील काही कथीत राजकीय पुढार्यांची मर्जी सांभाळण्यासाठी लोणीकरांनी आपले बळ वापरुन असेकाही अधिकारी चिकटवलेले आहेत. त्यात खेडकरांचा समावेश असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकही हतबल असल्याचे समजते. यावरुन नेत्यांना हजारो माणसं व निष्पाप बालगोपाळांशीही काही घेणं-देणं नसतं, त्यांना फक्त ‘त्या’ माणसांना नियंत्रित करणारे स्थानिक पुढारीच गरजेचे वाटतात असेही या घटनेतून दिसून आले आहे.
सध्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४६ गावांमध्ये सर्वकाही आलबेल आहे. लोणीकरांच्या आशीर्वादाने निष्क्रीय असूनही ठामपणे बसलेल्या संतोष खेडकर महाराजांच्या राज्यात चोर, दरोडेखोर, खुनी यांना निर्भयीपणाने वावरण्याची संधी असून गांजा, दारु आणि वेश्यागमनाच्या शौकिनांचीही बडदास्त ठेवण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पठारभागातील सर्वसामान्य माणसांना सध्या ‘बिहार’मधील वातावरण अनुभवायला मिळत आहे.
आज सकाळी हा प्रकार समोर आला. पोषण आहाराच्या खोलीचे कुलूप तोडून अन्नधान्य, तेल व भाजीपाल्याची नासधूस करण्यात आली. सर्वत्र जमिनीवर व भिंतीवर पिशव्या फोडून तेल उडवण्यात आले. गॅस शेगड्या फेकून देत प्रवाह मात्र सुरुच ठेवल्याने धोका निर्माण होण्यासाठी सिलेंडरमधील संपूर्ण गॅसही उडून गेला आहे. चोरट्यांनी जाताना शाळेचा ५२ इंची एलईडी टीव्ही, मॉनिटर व हार्डडिस्कही चोरुन नेली आहे. आज शाळा सुरु असल्याने भारत हायस्कूलमध्ये आहार शिजवून मुलांना दिला. पोलिसांना सात वाजता कळवल्यावर ९ वाजता ते आले व ११ वाजता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. या दुष्कृत्याचा तपास लागण्याची गरज आहे, अन्यथा मुलांवर त्याचा चांगला परिणाम होणार नाही.
– भाऊसाहेब ढोकरे (शिक्षक, जि.प.शाळा, घारगाव)
पठारभागात अवैध धंदे, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. त्यामुळे पोलिसांचा कोणताही धाकच शिल्लक नसल्याने चोरटे व गुन्हेगार आता मनाला वाटेल तसे कृत्य करु लागले आहेत. घारगावच्या जिल्हा परिषद शाळेत घडलेला प्रकार अतिशय निंदणीय असून मुलांच्या पोषण आहारातील अंडी तळून खाणे व नंतर सगळं तेल भिंतीवर, फरशांवर उडवून आसूरी आनंद घेणं, अन्नधान्य व भाजीपाल्याची नासधूस, गॅसचा प्रवाह सुरु ठेवण्याचा प्रकार यावरुन या घटनेचा उद्देश चोरीचा नसून दुसराच काहीतरी असण्याची शक्यता दिसून येते. त्याचा गांभीर्याने तपास होण्याची गरज असताना पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना मात्र घटनेचे गांभीर्यच समजले नाही. म्हणूनच कळविल्यानंतरही दोन तासांनी आलेला कर्मचारी उद्धटपणे बोलून निघून गेला. निष्क्रीय कारकिर्द असलेल्या पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या बदलीसाठी आता आंदोलन सुरु करणार आहोत.
– बाळासाहेब आहेर, सामाजिक कार्यकर्ते