वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उलगडला थोरातांचा सांसारिक गृहपट! कांचनताईंची तुफान फटकेबाजी; पायाकडे पाहूनच निवड केल्याचा हास्यस्फोट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘साहेब आता सत्तरीत आहेत, मी त्यांच्यापेक्षा सात वर्षांनी लहान. साहेब जेव्हा मला पाहायला आले, त्यावेळी मी केवळ त्यांचे पायच बघितले, त्यावरुनच मी त्यांना पसंद केले. मात्र साहेबांनी माझा चेहरा पाहिला असेल..’ अशा कितीतरी अंतरंगी गुपितांनी गेली चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणात राजहंसाप्रमाणे वावरणार्‍या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सांसारिक गृहपट मंगळवारी उलगडला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या पत्नी कांचन थोरात यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरुन तुफान फटकेबाजी करत राजकीय क्षेत्रात वावरणार्‍या नेत्यांच्या अंतर्गत जीवनावरही प्रकाश टाकला. सार्वजनिक कार्यक्रमात अभावाने बोलणार्‍या कांचनताईंची शाब्दिक टोलेबाजी गेली पाच दशकं त्यांनी आपल्या पतीला दिलेल्या खंबीर पाठबळाचेही दर्शन घडवून गेली. त्यांच्या या ‘मोकळ्या’ बोलण्याने कार्यक्रमाची रंगत मात्र शतपटीने वाढली.

राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांच्या स्नेहीजणांसह कार्यकर्त्यांकडून पूर्वसंध्येला फटाक्यांची आतषबाजी व अन्य कार्यक्रमांचेही आयोजन होते. यंदा माजी मंत्री थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान संगमनेरात डॉ. अमोल कोल्हे निर्मित शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी महानाट्याचा प्रयोग संपल्यानंतर थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. कोपरगाव भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीही माजी मंत्री थोरात यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात कांचन थोरात यांनी ‘साहेब आता सत्तरीत’ असल्याचे सांगत बोलण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत असताना साहेब बघायला आले. त्यावेळी त्यांच्यापेक्षा आपले वय सात वर्षांनी कमी होते असे त्या म्हणाल्या. त्यावेळचे संस्कार, मुलगा-मुलगी पाहण्याची पद्धत यावर भाष्य करताना त्यांनी आपण फक्त साहेबांच्या पायाकडे पाहूनच त्यांना पसंत केले, साहेबांनी मात्र माझा चेहरा पाहिला असेल अशी कोपरखळी हाणताच उपस्थितांमध्ये खळखळाट माजला. योगायोग होता म्हणून लग्नंही झाले. पण लग्नानंतर २० वर्ष कधी सिनेमा माहित नाही की नाटक. रोज पाहुणेरावळे यातच दिवसं जायचे. साहेबांनी मला थेट अमेरिका, दुबई कुठेकुठे फिरवले, पण ते ३० वर्षांनंतर.. असं कांचनताईंनी सांगताच पुन्हा एकदा हशा पिकला.

काय करणार? साहेबांकडे वेळच नव्हता. रोजच राजकारण आणि लोकांचा गराडा. घरात आले की साहेबांचा चेहरा पडलेला. मात्र कोणी कार्यकर्ते आल्याचा निरोप मिळाला की लगेच जायचे आणि दोन-दोन तास बोलत बसायचे. फक्त आमच्यासमोर आले की; ‘मी थकलोय, झोपं येते आहे..’ असे म्हणायला सुरुवात होते’ असं ताईंनी सांगताच उपस्थितांमध्ये पुन्हा खळखळाट उसळला. आजचे निमित्त साधून खर्‍याअर्थी मोकळ्या मनाने बोलणार्‍या कांचनताईंनी ‘मी जे बोलतेय ते मनातलं, पाठांतर केलेलं नाही..’ असं सांगत कार्यकर्ते आणि साहेबांच्या मधलं अंतरही नाहीसं केलं. कुटुंबातील सगळ्यांनी आपल्याला नेहमीच खंबीर साथ दिल्याचे कृतार्थ भाव प्रकट करताना मात्र त्या काहीशा कातरल्या.. मात्र लागलीच सावरताना त्यांनी ‘आता मला साहेबांची आठवण येत नाही..’ असे म्हणतं पुन्हा माहौल बदलला आणि मैत्रिणींचा छानशा चमू तयार झाल्याने त्यांच्यातच रमते असं सांगत त्यांनी साहेबांना उंदड आयुष्याचा शुभेच्छा दिल्या.

‘माझं राजकारणातलं काम आपण सगळे जाणता’ अशा आशयाने आपल्या भावना मांडताना बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सौभाग्यवतींचेही काही किस्से सांगत पारिवारीक माहौलमध्ये रंगत भरली. पूर्वी जोर्वेत राहायचो, त्यामुळे गावातून संगमनेरात येवून शिक्षण घ्यायचे, दिवसभर मित्रमंडळींमध्ये राहायचे आणि संध्याकाळी घरी जायचे असा आपला दिनक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. तीर्थरुप आमदार असताना वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्याने घरात आपल्या लग्नाचा विषय सुरु झाला. आपल्याकडे रोजच पाहुणे येतात म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते म्हणाले. मात्र एकदा महाविद्यालयात असताना पाहुणे थेट तिथेच बघायला आहे. गावातील एका व्यापार्‍याने त्यावेळी पाहुण्यांना मुलगा गोरागोमटा आणि वकीलही असल्याचे सांगितले  असे थोरात म्हणताच  उपस्थितांमध्ये पुन्हा हास्य उमटले.

मुलगी पाहायला गेलो, त्यांचे घर, कुटुंबातील सदस्यांची मोठी संख्या पाहूनच आपण ठरवलं होतं की इथं आपलं बरोबर जमेल. त्यामुळे आपण घेतलेला निर्णय योग्यच होता हे आजही आपणास जाणवत असल्याचे थोरात म्हणाले. इतक्या वर्षात आम्हा उभयतांमध्ये कधीही कटकट झाली नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या पत्नीच्या स्वभाव कौशल्यावरही प्रकाश टाकला. अनेकांच्या घरात नवरा कामावरुन घरी आल्यानंतर बायको म्हणते; ‘आले का फिरुन?’. तो बागेत फिरुन नव्हेतर तर, दमून भागून आलेला असतो, मात्र जेव्हा असा प्रश्न समोरुन येतो तेव्हा त्याची अवस्था खूप बिकट होते. पण, आपल्या वैवाहिक जीवनात असा त्रास आपल्याला कधीच झाला नाही असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हास्य कल्लोळ माजला.


आमदार सत्यजीत तांबे यांनी जीजींनी (कांचनताई) आज चान्स घेतल्याचे सांगत आबा (थोरात) म्हणतं होते त्यांच्याकडे माईक देवू नका, ते असं का म्हणाले ते आता समजलं अशी मिश्किल टिपण्णी केली. मात्र आज जीजींनी काय व्हायचंय ते होवू देत असा विचार करुन सगळं बोलून टाकल्याचे सांगत त्यामुळे या पारिवारीक कार्यक्रमाची रंगत वाढल्याचे तांबे यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापल्यानंतर उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत फटाक्यांच्या आतषबाजीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Visits: 113 Today: 1 Total: 255738

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *