गौरी थोरात करणार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व! मिस अॅण्ड मिसेस हेरिटेज स्पर्धा; जगभरातील तीस देशांच्या स्पर्धकांचा सहभाग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुढील पंधरवड्यात मलेशिया येथे होणार्या मिसेस व मिस हेरिटेज इंटरनॅशनल स्पर्धेत मिसेस गटाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी गौरी अशोक तावरे-थोरात यांना मिळाली आहे. संगमनेरचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांच्या त्या पत्नी असून राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून त्या अवघ्या महाराष्ट्राला परिचयाच्या आहेत. 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत क्वालांलपूर येथे होणारी ही स्पर्धो मिस अॅण्ड मिसेस यूनिव्हर्स प्रमाणेच असून या स्पर्धेतील सादरीकरण मात्र वेगळे असते.

राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश मिळवून गौरी थोरात यांना आता भारतीय परंपरा सोबत घेवून थेट आंतरराष्ट्रीय मंचावर त्याचे सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सिंगापूर येथील एका मोठ्या कंपनीचे प्रायोजकत्त्व प्राप्त असलेल्या या स्पर्धेसाठी मृणाल गायकवाड या भारताच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. स्पर्धेत जगभरातील जवळपास तीसहून अधिक देशांमधील स्पर्धक सहभागी होणार असून त्यात प्रामुख्याने रशिया, चीन, जपान, यूक्रेन, पाकिस्तान व न्यूझीलंडसारख्या देशांचाही सहभाग आहे.

गौरी थोरात यांच्या ‘दुर्गराज रायगड’ या विषयावरील मर्हाटमोळ्या सादरीकरणाने त्यांना राष्ट्रीय विजेतेपद मिळाले होते. श्रीमती थोरात यांनी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्याचे आजवर दीडशेहून अधिक प्रयोग सादर केले आहेत. संगमनेरातही त्यांच्या याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील गड-कोट, ऐतिहासिक ठिकाणं व लेण्या यावर त्यांचा दांडगा अभ्यास असून तलवारबाजी, लाठी-काठी व घोडस्वारी यामध्येही त्या अत्यंत तरबेज आहेत. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या गौरी थोरात यांचे माहेर वालचंदनगर व सासर लोणी (देवकर) दोन्ही पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे. त्यांचे पती अशोक थोरात महाराष्ट्र पोलीस दलात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक म्हणूनही सेवा बजावलेली आहे. त्यांच्या पत्नीला आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
