संगमनेरात शिवपुत्र संभाजी महानाट्याची तयारी पूर्ण धगधगता इतिहास पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा पोहोचली शिगेला
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरातील जाणता राजा मैदानावर रविवार ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६ वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सर्व नागरिकांसाठी मोफत असून या महानाट्यासाठीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. स्थानिक २०० कलाकारांचा सहभाग असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
सुसंस्कृत नेतृत्व अशी ओळख असणारे आमदार थोरात यांनी दरवर्षी अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात. यावर्षी मात्र संगमनेर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मराठ्यांचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते महानाट्य शिवपुत्र संभाजी हे ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी याकाळात जाणता राजा मैदानावर सर्वांना मोफत आयोजित केले आहे. याकरीता तालुक्यासह शहरातील सर्व नागरिकांना घरोघर पास पोहोच केले आहेत.
या भव्यदिव्य महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कवी कलशांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडतेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग असणार आहे.
हे महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांकरीता बसण्यासाठी सुमारे २० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर एलईडी व्यवस्था, तडाखेबाज संवाद, १२० फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती, घोडे, बैलगाड्यांचा वापर, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत २०० पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत. तरी सर्वांसाठी मोफत असलेल्या या महानाट्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात मित्रमंडळ व गौरव समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.