संगमनेरातील महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ शहर पोलिसांत पतीसह चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशभर महिलांचा सन्मान व्हावा, नेतृत्व करण्याची संधी मिळावी आणि प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळावी म्हणून एकीकडे केंद्र ते अगदी ग्रामपंचायत पातळीवर प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु, दुसरीकडे सुसंस्कृत आणि लौकिक असलेल्या संगमनेर शहरातील विवाहित महिलेचा वीरगाव (ता.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) येथील सासरच्या मंडळींनी लग्नात माहेरच्यांनी हुंडा दिला नाही म्हणून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावे, या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की शहरातील मालदाड रोड येथील सुवर्णा संजय भुसारी (वय ३४) हिचा वीरगाव येथील संजय यशवंत भुसारी याच्याशी विवाह झाला. परंतु, सन २००९ पासून लग्न व्यवस्थित केले नाही, लग्नात हुंडा दिला नाही, तुला शेती काम करता येत नाही आणि माहेरच्यांकडून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावे. या मागणीसाठी पतीसह सासू सुमन यशवंत भुसारी, सासरा यशवंत कोंडाजी भुसारी व नानासाहेब यशवंत भुसारी यांनी १ मार्च, २०२३ पर्यंत शारीरिक व मानसिक छळ केला.

याकाळात सतत शिवीगाळ करुन मारहाणही केली. यामुळे वैतागून गेलेली विवाहिता सुवर्णा हिने शहर पोलिसांत धाव घेऊन संपूर्ण हकीगत सांगितली. यावरुन पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ७७/२०२४ भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. हासे हे करत आहे.

देशाचे सर्वोच्चस्थान राष्ट्रपतीपदी महिला विराजमान आहे. याशिवाय अनेक मोठ्या पदांवर महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. मात्र, समाजात आजही हुंड्यासाठी आणि इतर कारणांवरुन महिलांचा छळ होत असल्याच्या वरील घटनेवरुन समोर येत आहे. यावरुन ही मानसिकता कितीही प्रबोधन केले तरी बदलेल की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

Visits: 21 Today: 1 Total: 115793

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *