दिव्यांगांची हेळसांड थांबवा! दिव्यांग सहाय्यसेनेचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दर बुधवारी दिव्यांगांची तपासणी करून त्याच दिवशी दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र देण्यात येत होते, मात्र सध्या शासनाचा आदेश असताना देखील दिव्यांग प्रमाणपत्र त्याच दिवशी मिळत नाही. त्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगांना दोन ते तीन महिने हेलपाटे मारावे लागतात. यामध्ये दिव्यांगांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी दिव्यांगांची होणारी हेळसांड त्वरित थांबवा अन्यथा संघटनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग सहाय्य सेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे यांनी दिला आहे.

या संदर्भात दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे यांनी अहिल्यानगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग बांधवांचा प्रमाणपत्रासाठी लागणारा ‘ए’ पार्ट आपल्या स्तरावरून भरला जात होता, परंतु सध्या तो ‘ए’ पार्ट त्रयस्थ यंत्रणा अथवा खाजगी व्यावसायिकांकडून भरला जात आहे. त्यासाठी दिव्यांगांना त्याचा मोबदला म्हणून विनाकारण पैसे भरावे लागत आहे. मात्र हे पैसे भरून देखील दिव्यांगांचे काम वेळेत होत नाही. त्यामुळे जुन्या पद्धतीने आपल्या स्तरावरून ‘ए’ फार्म भरण्यात का येत नाही? यातून आपणाला दिव्यांग बांधवांची आर्थिक लूट करायची आहे का? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे तसेच दिव्यांग बांधवांच्या केस पेपर बाबत जी व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी दिव्यांग बांधवाला कुठल्याही प्रकारचे कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. आमच्या दिव्यांग बांधवांकडे कुठल्याही प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यास ऑनलाईन केस पेपर काढणे शक्य होत नाही. व त्याचा बराचसा वेळ त्याच ठिकाणी वाया जातो. आपण आपल्या स्तरावरून जुन्याच पद्धतीने आमच्या दिव्यांग बांधवांना केस पेपर देण्याचे योग्य ते नियोजन करावे, याबाबतीत आठ दिवसात विचार न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, आनंद खरात, पौर्णिमा आढाव, कविता सूर्यवंशी आदी दिव्यांग बांधवांच्या सह्या आहेत.

Visits: 45 Today: 1 Total: 1106614
