ऊसाचा मालट्रक पेटून चालकाचा दुर्दैवी मृत्यू! खांबा-वरवंडी शिवारातील घटना; विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने लागली आग..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राहुरी तालुक्यातून संगमनेर साखर कारखान्याकडे ऊस घेवून निघालेल्या मालट्रकला खांबा-वरवंडी शिवारात अपघात झाल्याचे वृत्त आहे. या दुर्दैवी घटनेत रस्त्याला आडव्या गेलेल्या विद्युत वाहिनीला ऊसाचा स्पर्श झाल्याने संपूर्ण वाहनात विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे वाहनानेही पेट घेतला. आसपासच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत वीज पुरवठा खंडीत करुन आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले, मात्र या भीषण घटनेने वीजेचा धक्का लागल्याने मालट्रक चालक संतोष राणू मोटे याचा मृत्यू झाला. कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चालकाच्या नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज (ता.31) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खांबा-वरवंडी रस्त्यावर घडली. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून ऊस घेवून संतोष राणू मोटे हा चालक मालट्रक (क्र.एम.एच.14/डी.जे.2251) घेवून संगमनेरच्या सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात कारखान्याकडे निघाला होता. त्याचे वाहन खांबा शिवारात आले असता मालट्रकमध्ये भरलेल्या ऊसाचा रस्त्याला आडव्या टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला.
त्यामुळे मालट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरला व वाहनाला एका बाजूला आगही लागली. या घटनेनंतर आसापासच्या नागरिकांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली व विद्युत प्रवाह खंडीत करुन आग विझवली. दुर्दैवाने या दुर्घटनेत वीजेचा धक्का लागल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत आश्वी पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी संगमनेरला पाठवला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेत वाहनचालकाचा दुर्दैवी बळी गेल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.