सुकेवाडी रस्त्यावरील नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह शरीरावर जखमा असल्याने घातपाताचा संशय; पोलिसांकडून तपास सुरु..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावरील नाटकी नाल्यात 30 ते 32 वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी शहर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटीर रुग्णालयात पाठविला आहे. मृत तरुणाच्या शरीरावर मारहाणीसदृश्य खूणा असून तो जखमी अवस्थेत असल्याने त्याचा घातपात झाल्याची दाट शक्यता असून पोलीस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याने पोलिसांना अहवालाची प्रतीक्षा आहे.


संगमनेर शहरातून सुकेवाडीकडे जाणार्‍या पुनर्वसन वसाहतीच्या काही अंतरावरील नाटकीनाल्यात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती आज (ता.9) सकाळी आठच्या सुमारास शहर पोलिसांना समजली. त्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सदरील तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगरपालिकेच्या कुटीर रुग्णालयात पाठविला. या तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्या असून शरीराच्या काही भागातून रक्तस्राव झाल्याचेही दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला असून घातपाताची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.


सदरचा तरुण या परिसरातच राहतो की अन्य कोठे? तो नेमका कोण आहे? त्याचा कोणी घातपात करुन खून तर केला नाही ना? अशा अनेक शंका यातून निर्माण झाल्या आहेत. पोलिसांनीही घातपाताची शक्यता नाकारली नसून उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याने तूर्त अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. मयत तरुणाची ओळखही अद्यापही स्पष्ट झालेली नाही, त्यामुळे पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे कामही सुरु आहे. त्यासाठी त्याचे छायाचित्रही सोशल माध्यमातून प्रसारित करण्यात आले असून कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सदर तरुणाचा मृत्यू आज पहाटे अथवा तत्पूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस तपासात समोर येणार्‍या तथ्यांच्या आधारावर दाखल गुन्ह्यात बदल केला जाणार आहे. शहरालगतचा सुकेवाडी रस्ता दाट मानवी वस्तीचा परिसर म्हणून ओळखला जातो. याच परिसरात पालिकेने उभारलेली पुनर्वसन वसाहतही असून या भागात नेहमीच लोकांची वर्दळ असते. याच परिसरात आज सकाळी सदरच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 107 Today: 1 Total: 1100529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *