संगमनेरात शिवपुत्र संभाजी महानाट्याची जय्यत तयारी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६ वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सर्व नागरिकांसाठी मोफत असून या महानाट्यासाठीची जय्यत तयारी सुरू असून नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

दरवर्षी अत्यंत साध्या पद्धतीने आमदार थोरात हे वाढदिवस करत असून यावर्षी मात्र संगमनेर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मराठ्यांचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते महानाट्य शिवपुत्र संभाजी हे ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी याकाळात जाणता राजा मैदानावर सर्वांना मोफत आयोजित केले आहे. याकरीता तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांना घरोघर पास पोहोच केले आहेत. या महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कवीकलशांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडतेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग असणार आहे.

तडाखेबाज संवाद, १२० फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती, घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत १५० पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत. या महानाट्याची जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी सुरू असून सेट उभारणीसह सर्व काम अंतिम टप्प्यात आले आहे. तरी सर्वांसाठी मोफत असलेल्या या महानाट्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात मित्रमंडळ व गौरव समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शिवपुत्र संभाजी या महानाट्यासाठी रविवारी (ता.४) सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद घुलेवाडी व साकूर गट यांसह शहर प्रभाग क्रमांक १, २ व ५, सोमवारी ५ वडगाव पान व संगमनेर खुर्द गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक ३, ४, ६, मंगळवारी आश्वी, जोर्वे व समनापूर गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक ७, ८, ९, १०, बुधवारी (ता.७) धांदरफळ व बोटा गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३, १४ असे नियोजन करण्यात आले असून यानुसार सर्वांना पास देण्यात येणार आहे.

Visits: 191 Today: 1 Total: 1870631

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *