तरुणांनो, दुचाकीवर स्टंटबाजी कराल तर याद राखा! शहर पोलीस सरसावले; अल्पवयीनांच्या हाती दुचाकी देणार्यांवरही कारवाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही दिवसांपासून शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांसह नूतनीकरण झालेल्या महामार्गावर दुचाकीवरुन स्टंटबाजी करण्यासह बेदरकारपणे वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांमध्ये काहीअंशी विकृतीचाही शिरकाव झाल्याने हुल्लडबाज तरुणांच्या चाळ्यांचा फटका पादचार्यांसह मुक्या जीवांनाही बसत आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अशा तरुणांना कायद्याच्या चौकटीत घेण्यास सुरुवात केली असून शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अचानक भेटी देवून अशाप्रकारचे कृत्य करणार्यांवर धडक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच शहरातील रस्त्यांवरील अशा हुल्लडबाजांची संख्या आटली असून अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी सोपवणार्या पालकांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर गेल्या काही वर्षात शिक्षणाची पंढरी म्हणून उदयास आले आहे. संगमनेरात अगदी शाळापूर्व वर्गांसह वैद्यकीय, उच्च तंत्र व अभियांत्रिकी शिक्षणासह बहुतेक सर्व प्रकारचे व्यावसायिक शिक्षण देणार्या विविध संस्था नावारुपाला आल्या आहेत. कधीकाळी केवळ पाठ्यक्रमापुरते मर्यादित असलेले शिक्षण आज व्यापक प्रमाणात मिळू लागल्याने सायकल, दुचाकी, बस अथवा खासगी प्रवासी वाहनाने शिक्षणासाठी संगमनेरात येणार्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा वेळांना बसस्थानक ते संगमनेर महाविद्यालयापर्यंतचा पुणे-नाशिक महामार्ग पायी चालणार्यांसह दुचाकीवरुन येणार्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः ओसंडलेला असतो.
वाढत्या गरजा आणि शिक्षणातील स्पर्धा यामुळे आजचे विद्यार्थी जवळपास दिवसभर व्यस्त राहत असल्याने अनेक पालकांनी कायद्यांकडे दुर्लक्ष करीत आपल्या अल्पवयीन पाल्यांना चक्क महागड्या बाईक्स (दुचाकी) खरेदी करुन दिल्या आहेत. मात्र त्याचवेळी वाहतुकीच्या नियमांबाबत मात्र पालकांसह विद्यार्थीही ठणठणपाल असल्याने गेल्या दशकभरात पालकांनी मोठ्या हौशेने आपल्या पाल्यांना घेवून दिलेल्या दुचाकीने घात केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मात्र त्यातून कोणीही बोध घेण्यास तयार नसल्याने शहरात अल्पवयीन दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्यातून दुर्दैवी घटनाही समोर येत आहेत.
मागील काही दिवसांत तर विद्यार्थ्यांशिवाय काही टवाळखोर आपल्या बापजाद्यांनी घेवून दिलेल्या लाखांच्या किंमतीच्या रेसर बाईक्स घेवून शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात त्यांच्या विचित्र आवाजाच्या सायलन्सरने गोंगाट करतानाही दिसू लागले आहेत. त्यामुळे शिक्षण मंदिरात ज्ञानाचे धडे गिरवणार्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही विद्यार्थी अशा टवाळखोरांच्या नादाने स्वतः स्टंटबाजी करु लागल्याने दररोज शेकडोंच्या संख्येने शाळा-महाविद्यालयाच्या दिशेने पायी चालत जाणार्या विद्यार्थ्यांसह पादचार्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
अशाप्रकारची हुल्लडबाजी आणि स्टंटबाजी रस्त्यावरील मोकाट मुक्या पशुंच्याही जीवावर बेतू लागली असून आज (ता.२९) सकाळी सह्याद्री महाविद्यालयाजवळ अशाच विकृत स्टंटबाजीने कुत्र्याच्या पिल्लाचा जबडा फाटून तो रक्तबंबाळ झाल्याचे संतापजनक चित्रही बघायला मिळाले. रेसर बाईक्स वेगाने चालवणे, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात त्यावर बसून स्टंटबाजी करणे, सरळ वाहने चालविणार्यांना कट मारणे, वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवून संकेत धुडकावणे व मनाला वाटेल तशी दुचाकी चालवणे अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोठी भर पडत असल्याने त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारीही केल्या आहेत.
त्याची दखल घेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आज सकाळपासूनच पोलीस पथकांना वेगवेगळ्या भागात कारवाईच्या सूचना दिल्या असून पोलिसांनी मोठ्या महाविद्यालयांच्या परिसरात अचानक तपासणी मोहीम राबवून टवाळखोरांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. यावेळच्या कारवाईत अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणार्या पालकांवरही कायद्याचा बडगा उगारला जात असून अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात पाचारण करुन त्यांना वस्तुस्थितीचे दर्शनही घडवले जात आहे. या सर्वांचा परिणाम आज सकाळपासून शहरातील रस्त्यारस्त्यावर मोकाट फिरणार्या स्टंटबाजांनी आपल्या महागड्या दुचाकी घरातच ठेवल्याने शहरातील रस्त्यावरुन येणारे विचित्र आवाज, वार्याच्या वेगाने दुचाकीवरुन धावणारी टोळकी व स्टंटबाज दिसेनासे झाले आहेत.
खरेतर अशा घटनांना अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणार्यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिका प्रशासनही जबाबदार आहे. नूतनीकरण होवून प्रशस्त झालेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथही (पादचारी मार्ग) तयार केला आहे. मात्र त्यावर अतिक्रमणधारकांनी ताबा मिळवून दुकाने थाटल्याने नाईलाजाने विद्यार्थी आणि पादचार्यांना रस्त्यावरुनच चालावे लागते. त्यातच फूटपाथवर अतिक्रमण करणार्यांच्या दुकानांच्या पुढे थांबणारी वाहनेही भररस्त्यातच अस्ताव्यस्त उभी रहात असल्याने बसस्थानक ते संगमनेर महाविद्यालय हा रस्ता नूतनीकरणानंतरही सामान्य संगमनेरकरांसाठी त्रासदायकच ठरत आहे.
सार्वजनिक जीवनात कसे वावरावे याचे संस्कार घरातूनच होत असतात. त्यामुळे रस्त्यावरुन वाहने चालवताना त्याचा कोणाला त्रास होणार नाही, धक्का लागून कोणाला दुखापत होणार नाही यावर वाहनचालकांनी सतत लक्ष ठेवले पाहिजे. दुर्दैवाने इतक्या घटना घडत असतानाही पालक वाहतूक नियमांची कोणतीही माहिती नसलेल्या अल्पवयीन पाल्यांना महागड्या बाईक्स घेवून देतात आणि त्यातून अशाप्रकारच्या घटना घडत असतात. मात्र आपली स्टंटबाजी जर कोणाच्या सुरक्षेला, जीविताला त्रासदायक ठरणार असेल तर कायदा त्याचे काम करील. शहरात सध्या काही तरुणांकडून विचित्र आवाजाच्या सायलेन्ससरचा आवाज काढीत बेदरकार वाहने चालवण्यासह स्टंटबाजीचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्याची दखल घेत आम्ही धडक कारवाया सुरु केल्या असून यावेळी पालकांनाही कायद्याची जाणीव करुन देत आहोत.
– भगवान मथुरे (पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर)